– डॉ. यश वेलणकर

‘स्किझोफ्रेनिया’ या आजाराविषयी समाजात अनेक गैरसमजुती आहेत. त्या दूर करून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना आधार देण्याचे काम ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन’ पुणे येथे करते. त्यांची निर्मिती असलेल्या ‘देवराई’ या मराठी सिनेमात या आजाराचे चित्रण केलेले आहे. इंग्रजीत ‘ब्युटीफुल माइंड’ हा सिनेमाही स्किझोफ्रेनिया झालेल्या संशोधकावर आहे.

गणित आणि अर्थशास्त्रामध्ये संशोधन करणाऱ्या डॉ. जॉन नॅश यांना त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी स्किझोफ्रेनियाचा त्रास होऊ लागला. आपल्याला रशियाच्या केजीबीच्या गुप्तहेरांनी वेढले असून ते आपल्याला ठार करण्याचा कट रचत आहेत असे त्यांना वाटू लागले. ते अस्वस्थ, भयग्रस्त राहू लागले. गणित विषयातील व्याख्याने देत असताना त्यांचे बोलणे असंबद्ध आणि विसंगत होत आहे असे त्यांच्या सहकाऱ्यांना जाणवू लागले. अखेर त्यांना मनोरुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

दहा वर्षे रुग्णालयामध्ये अधूनमधून राहावे लागल्यानंतर पत्नीचे प्रेम, सहकारी मित्रांचा आधार आणि गणित, अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास यामुळे त्यांचा त्रास कमी झाला. अर्थशास्त्रातील ‘गेम थिअरी’मधील कूट समस्या सोडवल्याबद्दल त्यांना १९९४ साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर केलेल्या एक भाषणात ते म्हणतात की, ‘‘मला अजूनही रशियाचे हेर दिसतात; पण ती खरी माणसे नसून मला होणारा भास आहे हे माझ्या लगेच लक्षात येते. त्यामुळे त्यांची भीती मला वाटत नाही.’’

डॉ. नॅश यांनी त्यांचा हा जो अनुभव शब्दबद्ध केला आहे, नेमके तेच ‘माइंडफुलनेस थेरपी’मध्ये शिकवले जाते. नॅश यांनी माइंडफुलनेस थेरपी घेतली असण्याची शक्यता नाही. कारण ही थेरपी या आजारासाठी गेल्या दहा वर्षांत वापरली जाऊ लागली आहे. नॅश यांनी त्यांच्या अनुभवातून जे जाणले, त्याचाच अनुभव माइंडफुलनेस थेरपी या रुग्णांना देते. मनात येणारे शब्द, ऐकू येणारे आवाज आणि दिसणारी दृश्ये हे सर्व विचारांचेच प्रकार आहेत आणि मनातील विचार हे खरे असतातच असे नाही, याची जाणीव होणे महत्त्वाचे असते. विचारापासून स्वत:ला अलग करण्याचे कौशल्य विकसित झाले, की त्यामुळे जे काही दिसते आहे, ऐकू येते आहे ते सत्य नसून भास आहेत, याचे भान रुग्णाला येऊ लागते आणि त्याचा त्रास कमी होऊ लागतो.

yashwel@gmail.com