आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे, तिला ‘आकाशगंगा’ असे म्हटले जाते. आकाशात पाहिले, तर ही आकाशगंगा म्हणजे एक धुरकट पट्टा दिसतो. गॅलिलिओने सन १६१० साली या पट्टय़ाचे दुर्बिणीतून निरीक्षण केले व आकाशगंगा म्हणजे प्रत्यक्षात ताऱ्यांची दाटी असल्याचे स्पष्ट केले. १७५० साली प्रसिद्ध केलेल्या विश्वाच्या उत्पत्तीसंदर्भातील आपल्या ग्रंथात इंग्रज खगोलज्ञ थॉमस राइट याने ‘आकाशगंगा म्हणजे चकतीच्या स्वरूपात एकवटलेले असंख्य तारे’ असल्याचे म्हटले. गुरुत्वाकर्षणाद्वारे एकत्र बांधली गेलेली ही ताऱ्यांची चकती स्वतभोवती फिरत असण्याची शक्यता त्याने व्यक्त केली.

आकाशगंगेचा नक्की आकार कसा आहे, हे ओळखण्याचा प्रयत्न इंग्रज खगोलज्ञ विल्यम हर्शेल याने १७८४-८५ या काळातील निरीक्षणांद्वारे केला. दुर्बिणीद्वारे केलेल्या या निरीक्षणांसाठी त्याने आकाशगंगेचे ६८३ भाग पाडले व प्रत्येक भागातील ताऱ्यांची संख्या मोजली. हर्शेलने ताऱ्यांची मूळ तेजस्विता ही समान मानली. प्रत्येक ताऱ्याच्या तेजस्वितेत पडणारा फरक हा फक्त त्या ताऱ्याच्या आपल्यापासूनच्या बदलत्या अंतरामुळे पडत असल्याचे मानून, त्याने विविध ताऱ्यांची आपल्यापासूनची तुलनात्मक अंतरे काढली. या अंतरांवरून त्याने आकाशगंगेचा नकाशा बनवला. या नकाशात सूर्याचे स्थान आकाशगंगेच्या केंद्राजवळ असल्याचे त्याला आढळले. प्रत्यक्ष (निरपेक्ष) अंतरांच्या माहितीअभावी हर्शेलला आकाशगंगेची प्रत्यक्ष व्याप्ती किती ते मात्र कळू शकले नाही.

आकाशगंगेची प्रत्यक्ष व्याप्ती किती, याचे उत्तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मिळाले. अमेरिकी खगोलज्ञ हार्लो श्ॉपली याने १९१७ साली माउंट विल्सन येथील दुर्बीण वापरून अनेक गोलाकार तारकागुच्छांचा अभ्यास केला. तेव्हा ज्ञात असलेल्या सुमारे शंभर गोलाकार तारकागुच्छांची अंतरे मोजल्यावर त्याच्या लक्षात आले, की यातील सुमारे एक-तृतियांश तारकागुच्छ हे एका गोलकाच्या स्वरूपात विखुरले असून या गोलाकाचे केंद्र धनू तारकासमूहात आहे.

या संशोधनावरून शॉपली याने निष्कर्ष काढला की, आपल्या आकाशगंगेचे केंद्रस्थान धनू तारकासमूहात असून, आपला सूर्य या केंद्रापासून सुमारे ५० हजार प्रकाशवर्षे अंतरावर वसला आहे. आपली आकाशगंगा ही प्रचंड आकाराची असल्याचे शॉपलीचे संशोधन दर्शवत होते. कालांतराने जरी हे अंतर ३० हजार प्रकाशवर्षे असल्याचे सिद्ध झाले असले, तरी शॉपली हा आकाशगंगेच्या प्रचंड व्याप्तीचा निश्चित स्वरूपाचा अंदाज करणारा पहिला संशोधक  ठरला.

मृणालिनी नायक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org