10 April 2020

News Flash

कुतूहल : बीजगोळे

प्रत्येक फळामध्ये बी असते. नव्या तंत्रज्ञानामुळे बीशिवायही फळे उपलब्ध होऊ लागली आहेत; पण ती फळे तितकीच मधुर असतातच असे नाही

(संग्रहित छायाचित्र)

उत्तम मधुर फळ खाल्ले की ते परत हवेसे वाटते. त्याचे झाड, त्या फळाच्या उपलब्धतेचे ठिकाण यावर आपण काही वेळा चर्चाही करतो. पण आपण त्यासाठी नक्की काय करू शकतो?

प्रत्येक फळामध्ये बी असते. नव्या तंत्रज्ञानामुळे बीशिवायही फळे उपलब्ध होऊ लागली आहेत; पण ती फळे तितकीच मधुर असतातच असे नाही. आपण खाल्लेल्या फळामध्ये जर बी असली, तर त्या बीपासून पुन्हा त्याचे झाड जन्माला येऊ शकते. त्या झाडापासून परत ती सुमधुर फळे मिळू शकतात. त्यासाठी अनेक प्रकारे बी-संकलन करून त्याची लागवड करण्याच्या बऱ्याच मोहिमा शाळा/ महाविद्यालयांतून सुरू असतात. या मोहिमांत या बिया जमवून, नंतर पावसाळ्यात जंगलात उधळून दिल्या जातात. त्यांपैकी अनेक बिया या जंगलातील अनेकविध पक्षी, प्राणी आणि कीटकांना खाद्य म्हणूनही उपयोगी पडतात. तर काही सुकून जातात, काही पाण्याच्या जागी पडतात आणि रुजतात. त्यापैकीही काही ‘सक्षम तोच जगेल’ या जंगलच्या न्यायाने मृत्युमुखी पडतात. काही प्राण्यांच्या पायाखाली तुडवल्या जातात, वणव्यात जळून जातात, चरणाऱ्या प्राण्याच्या भक्ष्यस्थानी पडतात.

त्यावर आता उपाय शोधण्यात आला आहे तो ‘सीड बॉम्ब’चा!  या सर्व बियांवर चिखलाचा लेप लावून या बिया थोडय़ाशा संरक्षित केल्या जातात आणि मग हे ‘सीड बॉम्ब’ जंगलात किंवा उजाड डोंगरउतारांवर उधळले जातात. हा तसा आकर्षक पर्याय असल्यामुळे सगळीकडे ‘सीड बॉम्ब’ची निर्मिती होऊ लागली आहे. खरे तर यांना ‘बॉम्ब’ म्हणू नये; कारण हे बॉम्ब फुटत नाहीत, तर त्यांना कोंब फुटतात! म्हणून त्यांना ‘बीजगोळे’ म्हणता येईल. परंतु या ‘सीड बॉम्ब’चाही उपयोग मर्यादित आहे. जंगलांतील अनेक सजीव घटक या मातीवेष्टित बियांनाही आपले खाद्य बनवतात. महत्त्वाचे असे की, पाण्याच्या जवळ न पडलेले  अथवा पाण्याची उपलब्धता नसलेल्या बीजगोळ्यांना कोंब फुटत नाहीत.

खरे तर आपल्याला एखादे फळ वा फूल आवडले, तर त्याच्या झाडाचे सॅपलिंग म्हणजे बालरूप तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा.

घराच्या परसात टाकलेल्या बियांची झाडे बनण्याची प्रक्रिया आता इतिहासजमा झाली आहे. त्यामुळे आवडलेल्या झाडाच्या बीजाला जपायला हवे. त्या बीजाचे झाड करायला हवे. ते झाड वर्षभर वाढवायला हवे आणि त्यानंतर हे थोडेसे मोठे झालेले झाड निसर्गात लावायला हवे. म्हणजे आपण लावलेल्या झाडांपैकी जास्त झाडे वाचतील, मोठी होतील आणि ती सुमधुर फळेही देतील!

आपल्या घरात, घराच्या एखाद्या कोपऱ्यात बीपासून छोटी झाडे तयार करणारी नर्सरी फुलवायला हवी. छोटय़ा झाडांचे संगोपन (बेबीसीटिंग) करायला हवे. तरच झाडे जगतील, नव्हे अधिक चांगली जगतील!

– विद्याधर वालावलकर मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2020 12:09 am

Web Title: article on seedling abn 97
Next Stories
1 मनोवेध : स्वयंसूचना
2 कुतूहल : पर्यावरण चळवळीचा पाया
3 मनातील सुगंध
Just Now!
X