– डॉ. यश वेलणकर

रिकामे मन सैतानाचे घर असते, कारण त्या वेळी त्रासदायक, भीतिदायक विचार अधिक येतात. ‘बी पॉझिटिव्ह.. सकारात्मक विचार करा..’ अशी आठवण सतत करून द्यावी लागते. याचे कारण आपला मेंदू ‘निगेटिव्ह बायस्ड’ आहे. त्याच्यात वाईट स्मृतीसाठी अधिक जागा आहे. दु:ख देणाऱ्या आठवणी तो पकडून ठेवतो. चांगल्या स्मृती मात्र कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांसारख्या असतात. त्या मेंदूत फार राहत नाहीत. भीतीचे विचार मनात अधिक येतात. याचे कारण आपल्या उत्क्रांतीमध्ये आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते.

आपले पूर्वज लाखो वर्षे जंगलात राहत होते. त्या काळात या माणसांकडे कोणतीच शस्त्रे नव्हती; त्या वेळी जे बिनधास्त होते ते हिंस्र प्राण्यांकडून मारले गेले. जे भित्रे होते; वाघ, साप अशा जंगली पशूंच्या भीतीने पळ काढणारे होते ते वाचले. आपण सर्व जण या घाबरून जाणाऱ्या पूर्वजांचे वंशज आहोत. त्यामुळेच भीती वाटणे, नकारात्मक विचार येणे नैसर्गिक आहे. यालाच मेंदूची नकारात्मकता म्हणतात. आजच्या माणसाचे बरेचसे शारीरिक, मानसिक त्रास या नकारात्मक मेंदूमुळे आहेत. मेंदूची ही नकारात्मकता साक्षी ध्यान आणि करुणा ध्यान यांच्या सरावाने कमी होते.

आपल्याला असे वाटते की, आपण दुसऱ्याला न आवडणारी एक कृती केल्यास त्याची भरपाई एका चांगल्या कृतीने होईल. पण आजचे मानसशास्त्रातील संशोधन असे सांगते की, हे गणित येथे उपयोगी नाही. एका चुकीच्या कृतीला पुसून टाकण्यासाठी एक नाही, तर पाच चांगल्या कृती कराव्या लागतात. पती-पत्नीच्या नात्यात हा अनुभव सर्वानाच येत असतो. वाईट ते मनात सहज राहते, चांगल्याची मुद्दाम आठवण करावी लागते. त्यामुळे अपयशाचे, आघातांचे प्रसंग पुन:पुन्हा आठवतात.

हे बदलण्यासाठी सुखद प्रसंगाची आठवण, तो विचार मनात अधिक वेळ धरून ठेवायला हवा. मोरावळा मुरवत ठेवतो तशी आनंदाची स्मृती मेंदूत मुरवायला हवी. तो प्रसंग झाल्यानंतर लगेच आपण हे करू शकतो. आंघोळीचा आनंद असेल, काही रुचकर खाण्याचा असेल किंवा कुणाच्या भेटीचा असेल; ‘आत्ता मी आनंदी आहे’ हा विचार दोन मिनिटे मनात धरून ठेवायचा. असे आपण आनंदी असतो, त्या वेळी शरीरात काही सुखद संवेदना जाणवत असतात; त्यांच्याकडे लक्ष द्यायचे, त्यांचाही स्वीकार करायचा. असे केले की, ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ ही स्थिती बदलते!

yashwel@gmail.com