03 June 2020

News Flash

कुतूहल : प्राण्यांमधील परहितनिष्ठा

परहितनिष्ठेची वर्तणूक गटात, कळपात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये बहुधा जास्त दिसून येते. हा नैसर्गिक निवडीचा भाग असावा.

संग्रहित छायाचित्र

 

प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये परमार्थ किंवा परोपकाराची भावना निर्माण झालेली आढळते. ती जपण्यासाठी प्राणी नि:स्वार्थी वृत्तीने, निरपेक्षपणे काम करतात. अशा वागणुकीचा फायदा त्यांना स्वत:ला न होता, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे भाऊबंदांची तंदुरुस्ती अथवा प्रजोत्पादनाची क्षमता वाढविण्यात होतो. प्राण्यांमध्ये अशा प्रकारच्या वर्तणुकीची अनेक उदाहरणे दिसून येतात. हे प्राणी दूरच्या नात्यापेक्षा जवळच्या नात्यातील सभासदाबद्दल अधिक परोपकारी असतात. सामाजिक उत्क्रांतीचा विचार करता, काही प्राणी स्वत:ची क्षमता बाजूला ठेवून वस्तीतील इतरांची क्षमता वाढविण्यासाठी काम करतात. परहितनिष्ठेची वर्तणूक गटात, कळपात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये बहुधा जास्त दिसून येते. हा नैसर्गिक निवडीचा भाग असावा.

या परमार्थाचे उत्तम उदाहरण मधमाश्यांच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आढळून येते. मधमाश्यांच्या पोळ्यात राणी माशी, कामकरी माशी आणि ड्रोन (फर्टाइल नर) अशा तीन प्रकारच्या माश्या असतात. राणी माशी आणि ड्रोन केवळ पुनरुत्पादन क्रियेत सहभागी होतात. कामकरी माश्या मात्र स्वत:चा पुनरुत्पादनाचा हक्क सोडून मध गोळा करून आणणे, पोळं बांधून काढणे, सर्व सदस्यांचे रक्षण करणे अशी सर्व कामे करतात. परंतु या वर्तणुकीचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लाभ मधमाश्यांच्या गटातील इतर सभासदांना होतो. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्येसुद्धा परहितनिष्ठेची अनेक उदाहरणे दिसतात. लांडगे जेव्हा शिकार करतात तेव्हा त्यांच्या गटातील आजारपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे शिकारीला न येऊ शकलेल्या सदस्यांसाठी शिकारीचा हिस्सा आवर्जून घेऊन जातात. मुंगुसासारखे प्राणी आपल्या गटातील आजारी, अशक्त सदस्यांना मदत करतात. अशाच प्रकारची वर्तणूक डॉल्फिन्समध्येही आढळते. समुद्री प्रवासात डॉल्फिन्सनी संकटग्रस्त मानवाला मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

पक्ष्यांच्या अनेक प्रजातींमध्ये मदतनीस पक्षी असतात, जे पिल्लांना वाढविण्यात मदत करतात. परहितनिष्ठा परस्परांच्या फायद्यासाठीसुद्धा असू शकते. जसे एक माकड दुसऱ्या माकडासमोर स्वत:च्या अंगसफाईसाठी बसते; परंतु काही वेळाने त्यांच्या भूमिका बदलतात. हा भूमिकेतील बदल, उत्क्रांतीच्या दृष्टीने, जोपर्यंत एकमेकांची फसवणूक होत नाही तोपर्यंतच फायद्याचा ठरतो. ती एक विशिष्ट रणनीती असू शकते. या सगळ्याचे सविस्तर वर्णन उत्क्रांतीतील ‘गेम थिअरी’मध्ये सापडते.

डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 12:07 am

Web Title: article on selflessness in animals abn 97
Next Stories
1 मनोवेध : भावनांच्या पातळ्या
2 कुतूहल : जैविक घडय़ाळाची लय
3 मनोवेध : सकारात्मक राग
Just Now!
X