वाळवंटासारख्या शुष्क, रखरखीत, वालुकामय प्रदेशातही निसर्गाने जैवविविधता बहाल केली आहे. याच जैवविविधतेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे उंट! या रेताड प्रदेशातून उंट सहजरीत्या वाहतूक करू शकतो. तसेच उंट हा वाळवंटासारख्या प्रतिकूल प्रदेशात उपलब्ध असणारे पाणी आणि अन्न यांचा वापर अतिशय काटकसरीने करतो. या वैशिष्टय़ांमुळेच त्याला ‘वाळवंटातील जहाज’ असे संबोधले जाते. प्राचीन काळापासून उंटाने संरक्षण आणि युद्धांमध्येदेखील महत्त्वाची भूमिका बजावल्याचे उल्लेख आहेत.

हवामान बदलाच्या परिस्थितीत उंट हा शाश्वत अन्नपुरवठय़ाचे साधन म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उंटाचे दूध. भूक भागवण्याच्या क्रियेबरोबरच कर्करोग, मधुमेह यांसारख्या विकारांवरदेखील हे दूध उपयुक्त ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. उंटाचे हेच महत्त्व अधोरेखित करण्यासाठी  २२ जून हा दिवस ‘जागतिक उंट दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यामागील मुख्य उद्देश हा हवामान बदलाच्या परिस्थितीत अन्नसुरक्षा क्षेत्रात उंटाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी जनतेला आणि धोरणकर्त्यांना सजग करण्याचा आहे.

फैजलाबाद येथे उंटावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल रझिक काकर यांच्या मते, उंटाचे दूध, मांस आणि इतर उत्पादने ही अन्नसुरक्षेच्या संदर्भात प्रभावी पर्याय ठरू शकतात. तरीही उंट या उपयुक्त प्राण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे जगभरातील उंटांची संख्या कमी होत असून, त्यातील एक प्रजाती अस्तित्वाच्या बाबतीत ‘धोकादायक’ स्थितीत आहे.

भारतातील उंटांच्या संवर्धनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत ५ जुलै १९८४ रोजी भारत सरकारने बिकानेर येथे उंटांवर एक प्रकल्प संचालनालय सुरू केले आहे. त्याचा पुढला टप्पा म्हणून २० सप्टेंबर १९९५ रोजी ‘राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र’ सुरू झाले आहे. राजस्थान, गुजरात आणि हरियाणाच्या काही भागांत पसरलेल्या उष्ण वाळवंटीय भागातील मर्यादित संख्येत असलेल्या ड्रॉमेडरी उंटांच्या (कॅमेलस ड्रॉमेडेरियस) संशोधनावर या केंद्राने लक्ष केंद्रित केले आहेच, त्याचबरोबर लडाखसारख्या थंड वाळवंटातील नुब्रा व्हॅली भागात आढळणाऱ्या दोन कुबड असलेल्या (कॅमेलस बॅक्ट्रियानस) उंटांच्या समस्येवरदेखील संस्थेचे संशोधन कार्य सुरू आहे.

– कविता वालावलकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org