26 January 2021

News Flash

नवदेशांचा उदयास्त : स्वातंत्र्यानंतरची सिंगापुरी संपन्नता

सिंगापुरात इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर व्यवस्थेवर आधारित संसदीय लोकशाही आहे

साठच्या दशकातले ली कुआन यू

सुनीत पोतनीस

९ ऑगस्ट १९६५ रोजी सिंगापूरचा, मलेशियाच्या राष्ट्रसंघातून बाहेर पडून एक स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून उदय झाला. नवजात प्रजासत्ताक सिंगापूरचे (रिपब्लिक ऑफ सिंगापूर) युसूफ बिन इशाक हे पहिले राष्ट्राध्यक्ष आणि ली कुआन यू हे पहिले पंतप्रधान म्हणून निर्वाचित झाले.

सिंगापुरात इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर व्यवस्थेवर आधारित संसदीय लोकशाही आहे. एकच सदन असलेली तिथली संसद सिंगापूर प्रशासनाचे कायदेमंडळ म्हणून काम करते. येथील राजकारणात कृतिशील असलेल्या ४३ राजकीय पक्षांपैकी पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी (पीएपी) हा सत्तारूढ पक्ष सर्वाधिक प्रभावशाली राहिला आहे. या पक्षाचे कार्यक्षम, प्रभावशाली नेते ली कुआन यू हे सिंगापूरच्या पंतप्रधानपदी ३१ वर्षे म्हणजे सन १९५९ ते १९९० या काळात राहिले. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अगदी अल्पकाळातच सिंगापूरने औद्योगिक, आर्थिक आघाडय़ांवर जे उत्तुंग यश मिळवले, त्यामागे ली कुआन यू यांचे नियोजन आणि कठोर परिश्रम होते. कुआन यांनी सत्तरच्या दशकात केलेल्या व्यापार व औद्योगिक विकासाभिमुख नियोजन आणि प्रशासनामुळे अल्पावधीतच, म्हणजे ऐंशीच्या दशकात सिंगापूर जगातल्या अतिप्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसले. जागतिक अर्थतज्ज्ञांनी सिंगापूरच्या या विकासाला ‘आधुनिक चमत्कार’ म्हटलेय!

सिंगापुरातील प्रमुख उद्योगांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, रसायन उद्योग, हॉटेल उद्योग, पर्यटन आणि बँकिंग हे आहेत. येथील अर्थव्यवस्था ही व्यापाराधारित अत्यंत विकसित भांडवली अर्थव्यवस्था आहे. १९६५ ते १९९५ दरम्यान सिंगापूरची अर्थव्यवस्था दरवर्षी सरासरी सहा टक्के दराने विकसित झाली. त्यामुळे सिंगापूरकरांच्या राहणीमानात झपाटय़ाने आमूलाग्र सुधारणा झाली. सिंगापुरात अमेरिका, जपान आणि युरोपातील मिळून सात हजार बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. सिंगापूरचे व्यापारी बंदर हे जगातल्या कायम गजबजलेल्या बंदरांपैकी एक आहे. सिंगापूरची अर्थव्यवस्था जगातील सर्वात खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक समजली जाते.

इंग्रजी, मलाय, चिनी आणि तमिळ या राजभाषा असलेल्या प्रगतिशील सिंगापूर देशाचे मलाय भाषेतले घोषवाक्य आहे : ‘माजुलाह सिंगापुरा’.. म्हणजे प्रगतिशील सिंगापूर! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सिंगापूर हे संयुक्त राष्ट्रे (यूएन), जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ), राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स), पूर्व आशियाई शिखर परिषद वगैरे जागतिक संघटनांचे सन्माननीय सदस्य बनले आहे.

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 12:03 am

Web Title: article on singapore post independence prosperity abn 97
Next Stories
1 कुतूहल : मिलेटसचा थाल्स
2 नवदेशांचा उदयास्त : सिंगापूर ‘देशा’चे स्वातंत्र्य..
3 नवदेशांचा उदयास्त : सिंगापूरवर जपानचा अंमल
Just Now!
X