अक्षय ऊर्जा म्हणजे जे स्रोत कधीही संपुष्टात येणार नाहीत. त्यांचे पुनर्भरण निसर्गात सतत सुरू राहते. भारत विषुववृत्तापासून जवळ असल्यामुळे आणि वर्षांकाठी सरासरी २६० ते ३०० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध होत असल्याने, सूर्यापासूनच्या ऊर्जेचे प्रमाण भारतात विपुल आहे. भारताच्या विशाल भूप्रदेशावर ४.७ किलोवॅट-तास (एक किलोवॅट-तास म्हणजे एक युनिट) प्रति चौरस मीटर-प्रति दिन या दराने वर्षभरामध्ये सुमारे पाच हजार ट्रिलियन किलोवॅट-तास (युनिट) इतकी ऊर्जा सूर्यामार्फत आपल्याकडे पोहोचत असते.

त्यामुळे भारतात सौरऊर्जेच्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करणे सहज शक्य आहे. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेने पाणी व अन्य द्रव पदार्थ गरम करून त्याच्या वाफेवर चालणारी जनित्रे किंवा सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशकिरणांपासून थेट वीज निर्माण करणारे फोटोव्होल्टाइक प्रकल्प वापरात आणले जातात. सर्व इमारतींची छपरे जरी सौरऊर्जानिर्मितीसाठी वापरायची ठरवली, तरी फोटोव्होल्टाइक पद्धतीने मोठय़ा प्रमाणामध्ये वीजनिर्मिती होऊ शकते.

वाऱ्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या बाबतीत तर आधीच भारताचा जगामध्ये पाचव्या क्रमांकावरून अलीकडेच चौथा क्रमांक आला आहे. भारतात विपुल प्रमाणात असलेल्या पहाडी क्षेत्रांमध्ये त्याचबरोबर किनारपट्टीच्या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या जनित्रांची उभारणी करणे शक्य आहे. छोटे जलविद्युत प्रकल्प हा ऊर्जेचा आणखी एक स्रोत भारतामध्ये शक्य आहे. पहाडी आणि हिमालयाच्या क्षेत्रामध्ये बारमाही पाणी वाहत असताना ही जनित्रे वर्षभर चालू राहण्याचीही शक्यता खूप असते.

बायोमास ऊर्जा हा अक्षय ऊर्जेचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. हरियाणा प्रांतातील शेतकरी त्यांच्या शेतातील पीककापणी झाल्यानंतर उरलेली धांडे जाळून टाकतात. यातून खूप मोठय़ा प्रमाणात ऊर्जा वाया जातेच, शिवाय दिल्लीसारख्या आसपासच्या शहरांना हवेच्या प्रदूषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेतामध्ये, रानावनात मिळणारा हा कोरडा बायोमास- पाने, फुले आणि इतर तथाकथित वाया गेलेले बायोपदार्थ, स्वयंपाकातील उष्टे/खरकटे, हॉटेल्स-मेसमध्ये निर्माण होणारा बायोमास किंवा शिजवलेले अन्न आणि इतर प्रक्रियांतून उरणारा बायोमास.. या सगळ्यांवर प्रक्रिया करून मोठय़ा प्रमाणावर वीजनिर्मिती करणे शक्य आहे. याव्यतिरिक्त समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा मिळवण्याचे तंत्रज्ञानदेखील भारतात विकसित होत आहे.

– डॉ. संजय मंगला गोपाळ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org