ध्वनिनिर्माण आणि ध्वनिसंवेदन सर्व सजीवांत आढळत नाही. अर्वाचीन संशोधनात मात्र वनस्पतीदेखील ध्वनिप्रक्षेपण व आकलन करून प्रतिसाद देतात हे सिद्ध झाले आहे. ध्वनीची ग्रहणशक्ती व आकलनक्षमता ध्वनिलहरींच्या वारंवारतेचा (फ्रिक्वेन्सी) पल्ला या स्वरूपात मोजतात. मानवी श्रवणशक्तीचा पल्ला २० ते २०,००० हर्ट्झ आहे. या पल्ल्याहून कमी वारंवारतेचा आवाज ‘इन्फ्रासोनिक’ म्हटला जातो, तर याहून अधिक वारंवारतेच्या आवाजाला ‘अल्ट्रासोनिक’ असे म्हणतात. हत्ती, डॉल्फिन यांसारखे प्राणी ‘इन्फ्रासोनिक’, तर मांजरी, कुत्रे, वटवाघळांसारखे प्राणी ‘अल्ट्रासोनिक’ आवाज ऐकू शकतात. अधिक वारंवारता असणारा ध्वनी ‘उच्च तारत्व (हाय पिच)’ असून कमी अंतर कापू शकतो. सूर्यपक्षी, बुलबुल, लार्क यांसारखे गाणारे पक्षी उच्चरवात गातात. तर भारद्वाजसारखा पक्षी लघुरवात ओरडतो. पण त्याचा आवाज काहीशे मीटर्स ऐकू जातो. ध्वनिलहरींच्या कंपनांची बरोबरी करू शकणारी कंपने निर्माण झाली तर ‘अनुनादन (रेझोनन्स)’ होऊन ध्वनिवर्धन (आवाजाची शक्तीवाढ) होते.

अपृष्ठवंशीय प्राण्यांत अवयवांच्या वेगवान हालचाली (माश्या, डास यांच्या पंखांच्या) व अवयव एकमेकांवर घासून (सिकाडा, रातकिडे, टोळ) ध्वनिनिर्मिती केली जाते. पृष्ठवंशीय प्राण्यांत यासाठी वाताशयाची कंपने (स्विम ब्लॅडर) करून स्वरयंत्रातील स्वरतंतूंची कंपने घडवून आवाज निर्माण केला जातो.

ध्वनिसंकेत हवेतून, पाण्यातून व घन पदार्थातूनही क्षेपित होतात. अडथळ्यांना वळसा घालून जाऊ शकतात. उजेडात व अंधारातही वापरता येतात. रसायनांच्या तुलनेत अधिक वेगाने प्रवास करतात व कमी वेळ अस्तित्वात राहतात, ज्यामुळे कमी वेळात अधिक संकेत पाठवता येतात. ध्वनिसंकेतनिर्मिती ऊर्जेची मागणी अधिक करते. या होकारार्थी आणि नकारार्थी गुणधर्मासह संदेशनासाठी ध्वनिसंकेत अनेक प्राणी वापरतात.

कांगारू आणि सशांसारखे प्राणी जमीन थोपटून, तर अनेक प्राणी-पक्षी ध्वनिसंकेतांनी धोक्याची सूचना स्वकीयांना व इतर प्राणी-पक्ष्यांना देतात. वटवाघळे रात्री संचार करतात; पण ते अंधारात पाहू शकत नसल्याने त्यांना ‘अल्ट्रासोनिक’ आरोळ्या ठोकून त्याचा प्रतिध्वनी ऐकून मार्गातले अडथळे टाळावे लागतात. वृक्षांच्या सालीतील कीटकांचा आवाज वेधून सुतार पक्षी त्यांना वेचून खातात. अस्वलांसारखे अनेक प्राणी गुरगुरून आपल्या पिलांपासून दूर राहण्याची धमकी इतरांना देतात. घुबडे उंदरांच्या आवाजावरून त्यांची शिकार रात्रीच्या अंधारात करतात.

– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org