निरीक्षकाचे स्थान बदलले तर दूरच्या वस्तूचे स्थान बदलले दिसते. स्थानातील या बदलाला पराशय म्हणतात. वस्तू जितकी जवळ, तितका हा पराशय अधिक. खगोलशास्त्रात, आकाशातील ग्रहताऱ्यांचे दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून निरीक्षण करून पराशयाचे मापन केले जाते व त्यावरून त्रिकोणमितीद्वारे त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर काढता येते. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात हिप्पार्कसने, दोन ठिकाणच्या सूर्यग्रहणांच्या स्थितीवरून चंद्राच्या पराशयाचे मापन केले व त्यावरून त्याने चंद्राचे तुलनात्मक अंतर काढले. दुर्बीणपूर्व युगातील डॅनिश खगोलनिरीक्षक टायको ब्राहे याने १५७७ साली दिसलेल्या एका धूमकेतूचे एकाच ठिकाणाहून, परंतु वेगवेगळ्या वेळी निरीक्षण करून पराशय मोजण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी स्वतभोवती फिरत असल्याने, बदलत्या वेळेनुसार निरीक्षणाचे स्थान आपोआपच बदलत होते. परंतु ब्राहेला या निरीक्षणांत धूमकेतूचे स्थान काही बदललेले आढळले नाही. यावरून धूमकेतू हे वातावरणाच्या पलीकडे, किंबहुना चंद्राच्याही पलीकडे असल्याचे स्पष्ट झाले. इटालीचा खगोलज्ञ कॅसिनी याने १६७२ साली मंगळाची, पॅरिस व फ्रेंच गियाना येथून निरीक्षणे करून मंगळाचा पराशय मोजला आणि त्यावरून मंगळाचे पृथ्वीपासूनचे अंतर काढले.

तारे हे खूप दूर असल्याने, ताऱ्यांचा पराशय मुळातच अत्यल्प असतो. त्यामुळे हा पराशय मोजण्यासाठी, एकमेकांपासून अतिदूर असणाऱ्या दोन स्थानांवरून ताऱ्याचे निरीक्षण करावे लागते. एखाद्या ताऱ्याची जर सहा महिन्यांच्या कालावधीने निरीक्षणे केली, तर ती पृथ्वीच्या कक्षेच्या व्यासाइतक्या दूर असणाऱ्या दोन स्थानांवरून केलेली निरीक्षणे ठरतात. ही कल्पना वापरून ताऱ्यांचे पराशय मोजण्याचे प्रयत्न सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरू होते. दीड शतकाच्या अशा प्रयत्नांनंतर, ताऱ्याचा पराशय सर्वप्रथम मोजण्यात जर्मनीचा फ्रेडरिक बेसेल यशस्वी ठरला. बेसेलने यासाठी हंस तारकासमूहातील ‘६१ सिग्नी’ या ताऱ्याची निवड केली. कारण या ताऱ्याची अंतराळातील स्वतची गती पृथ्वीवरून मोजता येण्याइतकी मोठी आहे. त्यामुळे हा तारा आपल्यापासून फार दूर नसून त्याचा पराशयही मोजता येण्याइतका मोठा असण्याची शक्यता होती. बेसेलने आपली ही निरीक्षणे १८३८ साली क्योनिशबर्ग वेधशाळेतल्या दुर्बिणीद्वारे केली. मोजलेल्या पराशयावरून हा तारा आपल्यापासून सुमारे दहा प्रकाशवर्षे दूर असल्याचे गणित त्याने मांडले. पृथ्वीच्या सूर्यप्रदक्षिणेमुळे झालेला ताऱ्याच्या स्थानातला हा बदल, कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित ग्रहमालेच्या सिद्धांताचा बळकट पुरावा ठरला.

मृणालिनी नायक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org