29 March 2020

News Flash

मनोवेध : तणाव व्यवस्थापन

तणाव वाढला की शारीरिक, मानसिक लक्षणे जाणवू लागतात. त्याकडे लक्ष दिले नाही तर आजार होतात.

डॉ. यश वेलणकर

कोणतेही संकट जाणवले, की शरीरात अनेक बदल होतात. हे बदल त्या संकटाशी लढण्यासाठी किंवा त्यापासून पळून जाण्यासाठी स्नायूंना अधिक ऊर्जा मिळावी यासाठी होतात. ही व्यवस्था जंगलात राहणाऱ्या माणसासाठी योग्य होती. आज जाणवणारी अनेक संकटे शरीराने पळून सुटणारी नसतात. शरीरातील हे बदल हालचालींना प्रवृत्त करणारे आणि माणूस मात्र खुर्चीत बसून संकटाच्या विचारात गुंतलेला, अशी बऱ्याचदा स्थिती असते. त्यामुळेच तणावाचा परिणाम म्हणून होणारे शारीरिक आजार वाढत आहेत.

उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, दमा, मायग्रेन, अपचन, हायपरअ‍ॅसिडीटी, तोंडात/ आतडय़ात होणाऱ्या जखमा, थायरॉइडच्या समस्या, अंगदुखी, सततचा थकवा.. असे अनेक आजार मानसिक तणावामुळे होऊ शकतात. शरीर-मनाच्या युद्धस्थितीत शरीरात जे बदल होतात, त्यातील एखादा बदल कायमस्वरूपी होतो; त्याला आपण ‘आजार’ म्हणतो. उदाहरणार्थ, संकट जाणवले की रक्तावरचा दाब वाढतो. तो सतत वाढत राहिला, की त्याला ‘हायपरटेन्शन’ म्हणतात.

मानसिक तणावामुळे होणारे आजार टाळायचे असतील, खऱ्या अर्थाने बरे करायचे असतील, तर ‘मी आत्ता युद्धस्थितीत आहे’ याचे भान यायला हवे. सजगतेचा नियमित सराव केल्याने ते येते. बऱ्याच माणसांना ही सजगता नसते. त्यामुळे, ‘माझ्यावर कोणताच तणाव नाही,’ अशा भ्रमात ते राहतात.

मानसिक तणाव म्हणजे- परिस्थितीची गरज माझ्या क्षमतांपेक्षा अधिक आहे, याची जाणीव! अशी जाणीव योग्य वेळी आली तर क्षमता वाढवण्यास प्रेरणा देते. वीणेच्या तारेवर योग्य ताण असेल तरच तिच्यातून सुंदर सूर निघतात. तसेच मानसिक तणावाचे आहे; तो योग्य प्रमाणात असेल तर माणूस कार्यमग्न राहतो, प्रगती करतो. मात्र तारेवरील ताण अधिक वाढला, की ती तुटते. तसेच तणाव वाढला की शारीरिक, मानसिक लक्षणे जाणवू लागतात. त्याकडे लक्ष दिले नाही तर आजार होतात.

असे आजार झाले की, त्यावर दिली जाणारी बरीचशी औषधे ही युद्धस्थितीत शरीरात तयार होणाऱ्या रसायनांना अटकाव करणारी असतात. याचसाठी ‘हायपरटेन्शन’वरील औषधे आयुष्यभर घ्यायला हवीत, असे डॉक्टर सांगतात. ते योग्यच आहे. कारण शरीरात युद्धस्थितीतील रसायने रोज पाझरत असतील, तर त्यांना अटकाव रोज करणे गरजेचे असते.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 12:11 am

Web Title: article on stress management abn 97
Next Stories
1 कुतूहल : जागतिक तापमानवाढ
2 मनोवेध : शरीराची युद्धस्थिती
3 कुतूहल : बीजगोळे
Just Now!
X