डॉ. यश वेलणकर

आधुनिक माणसावर मानसिक तणाव वाढला आहे. याचे कारण माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणूनच जन्माला येतो आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या शेतीयुगात कौटुंबिक व्यवसाय परंपरेने ठरलेले होते. त्यामुळे ‘सुताराघरी सुतार, कुंभाराघरी कुंभार जन्माला येतो’ अशी समजूत होती. त्याच्यासमोर शिक्षणाचे, करिअरचे विविध पर्याय नसायचे. त्यामुळे निवड करण्याचा तणावही नसायचा. आता शिक्षणाचे, शाळांचे, नोकरी-व्यवसायाचे, लग्नसंबंधांचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे चाकोरीबद्ध जगावे न लागता निवड करण्याची संधी आहे. मात्र निवड करून निर्णय घेता येत नसतो, मन गोंधळलेले असते, अशा वेळी शरीरात युद्धस्थितीतील रसायने पाझरत राहतात. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ लागतात.

आंतरिक संघर्ष आणि बा संघर्ष असे याचेही दोन प्रकार आहेत. आंतरिक संघर्ष म्हणजे स्वत:चा स्वत:ला निर्णय घेता येत नसतो. हे करू की ते करू, अशी मनात दुविधा असते. गोंधळलेले मन अस्वस्थ असते. मनात परस्परविरोधी विचार येत राहतात. त्यामुळे झोप लागत नाही. बा संघर्ष हा प्रतिकूल परिस्थितीशी असू शकतो किंवा माणसांतील मतभेदामुळे निर्माण होतो. असा संघर्षदेखील नेहमी वाईटच असतो असे नाही. असा संघर्ष केल्यानेच माणसे परिस्थिती बदलू शकतात. त्यासाठी स्वत:मध्ये नवीन कौशल्ये विकसित करावी लागतात. बाह्य़ संघर्ष मतभेदामुळे आहेत- म्हणजे दोन वेगवेगळी मते आहेत. या दोन मतांचा समन्वय साधून अधिक चांगला तिसरा पर्याय निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताच संघर्ष वाईट नाही, मात्र तो सतत राहता नये. नाही तर तो त्रासदायक होतो. तसे होऊ नये म्हणून युद्धस्थितीतील शरीरमन शांतता स्थितीत आणणे गरजेचे असते. त्याचसाठी काही जण दारू पितात, सिगरेट ओढतात. पण त्यांचे व्यसन लागते, शरीरावर दुष्परिणाम होतात.

शरीरमनाला अशा अनावश्यक युद्धस्थितीतून बाहेर काढण्याचा सर्वाधिक निरोगी उपाय म्हणजे सजगतेचा सराव होय. अशा सरावाने आत्ता मन गोंधळलेले आहे असे साक्षीभाव ठेवून पाहता येते. निर्णय घेण्यासाठी शांतपणे विचार करायला हवा असे ठरवता येते. आवश्यकता असेल तर त्यासाठी समुपदेशकाची मदत घेता येते. समुपदेशकाने निर्णय देणे अपेक्षित नसते, पण विविध पर्यायांचे फायदे-तोटे मांडणे सोपे जाते. जाणीवपूर्वक विचार करण्याचे कौशल्य विकसित केले, की संघर्षांचा तणाव त्रासदायक राहत नाही.

yashwel@gmail.com