– डॉ. यश वेलणकर

मेंदूविषयक संशोधनात मेंदूतील तात्कालिक बदल (म्हणजे स्टेट्स) आणि रचनात्मक बदल (म्हणजे ट्रेट) असा फरक केला जातो. ध्यान करीत असताना मेंदूत तात्कालिक बदल होतात, हे सिद्ध झाल्यानंतर रचनात्मक बदल होतात का याबाबत संशोधन सुरू झाले. डॉ. अ‍ॅण्ड्रय़ू न्यूबर्ग हे या क्षेत्रातील प्रमुख संशोधक आहेत. त्यांनी अनेक वर्षे ध्यानसाधना करणाऱ्यांच्या मेंदूचे ध्यान करीत नसताना परीक्षण केले. सामान्य माणसापेक्षा वर्षांनुवर्षे ध्यान करणाऱ्या साधकांच्या मेंदूत दोन फरक त्यांना आढळले :

(१) त्यांचा ‘थलॅमस’ नावाचा मेंदूतील भाग अधिक विकसित झालेला दिसला. मेंदूचे माहिती संकलनाचे केंद्र म्हणून हा भाग काम करतो. पंचज्ञानेंद्रिये जी माहिती गोळा करतात, ती येथे संकलित होते आणि नंतर तीवर प्रक्रिया करण्यासाठी ‘कॉर्टेक्स’ या भागाकडे पाठवली जाते. मेंदूतील हा भाग अधिक विकसित झाल्यानेच जुन्या साधकांची पंचज्ञानेंद्रियांची संवेदनशीलता अधिक वाढते, असे शास्त्रज्ञांना वाटते. ध्यानाने सजगता वाढते या वैयक्तिक अनुभवाचे हा मेंदूतील बदल म्हणजे तटस्थ प्रत्यंतर आहे.

(२) दुसरा फरक म्हणजे, जुन्या साधकांचा मेंदूतील ‘परायटल लोब’ ध्यान करीत नसतानाही अधिक सक्रिय दिसला. मेंदूचा हा भाग विश्वाच्या संबंधात ‘स्व’चे भान देणारा असतो. हा भाग अधिक सक्रिय असतो याचा अर्थ ‘स्व’ची सीमा अधिक वृद्धिंगत होऊन ‘मी’पणा कमी होतो. दुसऱ्याची भूमिका आणि भावना समजून घेणे अधिक सहजतेने होते.

वर्षांनुवर्षे हजारो तास ध्यानसाधना करणाऱ्या माणसांच्या मेंदूतील हे बदल ध्यानाचा परिणाम स्पष्ट दाखवणारे आहे. प्रपंचात व्यग्र माणसांना हजारो तास ध्यान करणे शक्य नाही. पण त्यांनाही थोडा वेळ नियमितपणे ध्यान केल्याने फायदा होतो का आणि त्याचे प्रत्यंतर मेंदूमध्ये दिसते का, हे पाहण्यासाठी डॉ. रिचर्ड डेव्हिडसन यांनी विद्यार्थी, डॉक्टर, प्राध्यापक यांना साक्षी ध्यान आणि करुणा ध्यान शिकवले. या स्वयंसेवकांनी रोज २० मिनिटे साक्षी ध्यान आणि १० मिनिटे करुणा ध्यान केले. दीड महिन्यानंतर त्यांच्या मेंदूतील डावा ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ ध्यान करीत नसतानाही अधिक सक्रिय झाला आहे असे आढळले. मेंदूतील हा भाग आनंद या भावनेशी निगडित आहे. ध्यानाच्या सरावाने सामान्य माणसांचा आनंद वाढतो, उदासी कमी होते, याचा पुरावा मेंदूतही दिसून आला.

yashwel@gmail.com