सूर्याच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या डागांची संख्या सुमारे अकरा वर्षांच्या चक्रानुसार कमी-जास्त होते. इंग्रज खगोलज्ञ वॉल्टेर माँडर याला पूर्वीच्या सौरचक्रांचा अभ्यास करताना, १६५० ते १७१५ या काळात सौरडागांची संख्या अतिशय कमी झाल्याचे लक्षात आले. माँडर याने १८९० च्या दशकात शोधनिबंधांद्वारे आपली ही निरीक्षणे जाहीर केली. त्या काळात पुरेशी निरीक्षणे केली न गेल्यामुळे, सौरडागांची संख्या कमी आढळली असण्याची शक्यता प्रथम व्यक्त केली गेली. परंतु अमेरिकी खगोलज्ञ जॉन एडी याने १९७० च्या दशकात या शक्यतेचे पुराव्यासह खंडन केले. या संशोधनासाठी एडी याने, प्रत्यक्ष निरीक्षणांतून गोळा केल्या गेलेल्या माहितीचा, तसेच जुन्या झाडांच्या खोडचक्रांतील (ट्री रिंग) कार्बनच्या समस्थानिकांच्या पृथकरणाचा आधार घेतला. जॉन एडीने या सौरडागांच्या अभावाच्या काळाला ‘माँडर मिनिमम’ हे नाव दिले. यासंबंधीची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे माँडर मिनिमम हा, सन १५०० ते १८५० या ‘छोटे हिमयुग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालखंडाचा भाग आहे. या साडेतीन शतकांच्या कालखंडात उत्तर गोलार्धाने अतिशय तीव्र हिवाळे अनुभवले.

सूर्यावर घडणाऱ्या घटना आणि पृथ्वीवरील घटना यांचा असा संबंध असल्याची शक्यता, माँडर मिनिममचा शोध लागण्यापूर्वी सुमारे तीन दशके अगोदरच दिसून आली होती. १८५९ साली सौरडागांची संख्या कमाल स्थितीत पोचली असताना, रिचर्ड कॅरिंग्टन हा ब्रिटिश खगोलज्ञ आपल्या दुर्बिणीने सौरडागांच्या एका मोठय़ा समूहाचे निरीक्षण करत होता. तेवढय़ात त्याला या सौरडागांजवळ दोन वाढत्या आकाराचे तेजस्वी ठिपके दिसू लागले. या ठिपक्यांचे तेज काही सेकंदांत वाढून ते अतिशय तेजस्वी झाले. त्यानंतर पुन: त्यांचे तेज कमी होत, अवघ्या पाच मिनिटांत ते दिसेनासे झाले. कॅरिंग्टनने ‘सौरज्वाला’ उफाळताना पाहिली होती! यानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे, दुसऱ्या दिवशी पहाटे जगातील अनेक ठिकाणांहून, अत्यंत तीव्र अशा विविधरंगी (ध्रुवीय प्रकाशाची (ऑरोरा) नोंद झाली. या वेळी अनेक ठिकाणची तारसेवासुद्धा खंडित झाली. या सौरज्वालेने पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ निर्माण करून तारसेवेच्या विद्युतमंडलात ढवळाढवळ केली होती! पृथ्वीवरील व्यवहारांत व्यत्यय आणणाऱ्या, अशा कित्येक घटनांची नोंद आतापर्यंत केली गेली आहे. या सर्व घटनांतून सूर्य-पृथ्वी यांच्या संबंधांचा अभ्यास करणारी खगोलभौतिकशास्त्राची स्वतंत्र शाखा उदयाला आली आहे.

मृणालिनी नायक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org