18 July 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : आधार हवा असतो

मुलं लहान असेपर्यंत आई-बाबांचा मार खाऊनही त्यांच्याच गळ्यात पडतात. कारण आई-बाबा हेच त्यांचं सर्वस्व असतं.

(संग्रहित छायाचित्र)

श्रुती पानसे

मुलं लहान असेपर्यंत आई-बाबांचा मार खाऊनही त्यांच्याच गळ्यात पडतात. कारण आई-बाबा हेच त्यांचं सर्वस्व असतं. पण त्यांच्यापैकी कोणी जर मुलांचं कधीही ऐकून न घेणारे, कधीही त्यांना समजून न घेणारे असतील तर स्वत:चेच आई-बाबा असूनही प्रेम निर्माण होऊ शकत नाही.

काही घरांमध्ये मारण्यानेच शिस्त लागते या सुविचारावर इतका विश्वास असतो की लहान मुलांना अक्षरश: फटके देणं, ढकलणं, लाथ मारणं, उदबत्तीचे चटके देणं, अंधारात कोंडून ठेवणं, घराबाहेर ठेवणं, या शिक्षा नियमितपणे पालक करत असतात. याचा परिणाम मुलं पालकांपासून दुरावतात.

आणखी एक घटना मेंदूत घडते ती म्हणजे जर शिकणारी मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणावर आणि अभ्यास आत्मसात करण्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो. शिकण्यामुळे त्यांच्या मेंदूचे न्यूरॉन्स आत्तापर्यंत जोडलेले आहेत, ते तुटण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळेच मारण्यामुळे मुलांना शिस्त लागते असं ज्यांना वाटत असेल त्यांनी हे लक्षात घ्यायलाच हवं की शिस्त लावण्याचे आणि अभ्यास करायला लावण्याचे मार्ग असू शकतात.

ज्या आईबाबांचा संताप अनावर होत असेल आणि त्या भरात ते मुलांवर हात उचलत असतील तर अशांनी स्वत:वर योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत. ज्यामुळे आपला संताप आपल्या नियंत्रणात राहील. याचं कारण मुलं लहान असेपर्यंत जसे आहेत तसे आई-बाबा स्वीकारतात. मोठे झाल्यावर मात्र त्यांच्यापासून शक्य तितकं लांब राहतात. वाढत्या वयामध्ये मुलांना आई-बाबांच्या आधाराची, त्यांच्याबरोबर सल्लामसलत करण्याची, आपल्या आयुष्यात आलेले बरे वाईट प्रसंग कोणाला तरी सांगण्याची किंवा ज्या विषयांमध्ये उत्तर सुचत नाही,  समस्या कशी सोडवायची हे समजत नाही, अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी आई-बाबांसारखे चांगले मित्र असू शकत नाहीत. पण नेमकं आधीच्या अनुभवांमुळे मुलं त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. मुलांना आई-बाबांचा आधार मिळत नाही. यात मुलांचं मोठंच नुकसान होतं.

काही पालकांना लहानपणापासून त्यांच्या पालकांचा मार मिळालेला असतो आणि त्यामुळे आपल्या मुलांशी आपण असंच वागायचं असतं हे त्यांच्या मनाने घेतलेलं असतं. त्यामुळे त्यांच्याकडून त्याच प्रकारे हिंसक कृती होते. परंतु ही साखळी केव्हातरी मोडायला पाहिजे आणि त्याची सुरुवात आताच्या पिढीतल्या आई-बाबांनी करायला पाहिजे.

contact@shrutipanse.com

First Published on March 6, 2019 12:55 am

Web Title: article on support is needed