डॉ. यश वेलणकर

सकाळी वेळेत डबा करण्याचे दडपण अनेक गृहिणींवर येते. हे दडपण कमी करायचे असेल तर वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य विकसित करावे लागते. वेळ सर्वाना सारखाच असतो, पण काहीजण तेवढय़ाच वेळात अधिक काम करू शकतात. कारण वेळेचे व्यवस्थापन हे खरे म्हणजे स्वत:चे व्यवस्थापन असते. कामांचे योग्य नियोजन केले, कोणते काम स्वत: करायचे आणि कोणती कामे दुसऱ्याकडून करून घ्यायची, हे ठरवता आले तर थोडय़ा काळात अधिक कामे करता येतात. आपला रोजचा वेळ चार प्रकारे कसा जातो, ते पाहू या..

काही कामे तातडीची आणि महत्त्वाची असतात. अशी कामे जेवढी जास्त, तेवढा तणाव अधिक असतो. काही कामे महत्त्वाची असतात, पण तातडीची नसतात. लगेच नाही केली तरी चालण्यासारखे असते. वेळेच्या दडपणाचा तणाव कमी करण्यासाठी अशा कामांसाठी वेळ काढला, तर तातडीची कामे कमी येतात. हा वेळ पुढील दोन प्रकारच्या कामांतील काळ कमी करून काढता येतो. तिसऱ्या प्रकारची कामे तातडीची असतात, पण महत्त्वाची नसतात. अशी कामे दुसऱ्याकडून करून घेता येतात. चौथ्या प्रकारची कामे ही खरे म्हणजे कामे नसतातच. तो वाया घालवलेला वेळ असतो. तो टीव्हीवरील मालिका पाहण्यात वा समाजमाध्यमांवर घालवलेला असू शकतो, फोनवरील किंवा प्रत्यक्ष गप्पाटप्पा करण्यात गेलेला असू शकतो. मनोरंजन गरजेचे आहे, नातेसंबंध जपण्यासाठी गप्पा मारणेही आवश्यक आहे; पण ते किती वेळ करायचे याचे भान ठेवायला हवे. ते वेळेचे बंधन पाळून केले तर महत्त्वाच्या- पण तातडी नसलेल्या कामांच्या यादीत जाईल. व्यायाम,  ध्यान,  ज्ञानवर्धक वाचन ही महत्त्वाची- पण तातडी नसलेली, म्हणजे नाही केली तरी चालते अशी कामे आहेत. पण म्हणूनच त्यांना वेळ द्यायला हवा. व्यायामाला वेळ दिला तर आजारपणात आणि दवाखान्यात जाणारा वेळ वाचतो. ध्यानाच्या सरावाने सजगता अधिक राहू लागल्याने विनाकारण विचारांत वाया जाणारा वेळ वाचतो आणि कामे अधिक वेगाने होतात.

त्यामुळे वेळेच्या दडपणाचा तणाव कमी करण्यासाठी वेळेचे नियोजन करण्यासाठी वेळ द्यायला हवा. ते तातडी नसलेले, पण महत्त्वाचे काम आहे!

yashwel@gmail.com