09 March 2021

News Flash

मनोवेध : स्वभावाला औषध

व्यक्तिमत्त्व विकृती म्हणजे विशिष्ट स्वभाव त्या माणसाला त्रासदायक वाटतोच असे ना

(संग्रहित छायाचित्र)

– डॉ. यश वेलणकर

व्यक्तिमत्त्व विकृतीची तीव्रता वेगवेगळी असते. स्वत:च्या करमणुकीसाठी दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्याची वृत्ती सौम्य प्रमाणात असलेली माणसे त्यांच्या आयुष्यात यशस्वी आणि अधिकारपदावर जाऊ शकतात. हीच विकृती तीव्र असेल तर त्यांना सायकोपॅथ म्हटले जाते. कारण गंमत म्हणून ही माणसे खून किंवा बलात्कारही करतात. २००५ मध्ये बेलिंडा बोर्ड यांनी इंग्लंडमधील विविध कंपन्यांतील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आणि त्याच वेळी गुन्हेगारांची व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली. त्या वेळी स्वत:च्याच प्रेमात असणे, दुसऱ्या माणसांना वापरून घेणे आणि मंत्रचळपणे कृती या तीन विकृती गुन्हेगारांपेक्षा अधिकाऱ्यांत अधिक आढळल्या!

व्यक्तिमत्त्व विकृती म्हणजे विशिष्ट स्वभाव त्या माणसाला त्रासदायक वाटतोच असे नाही. तो त्रास त्याच्या सहवासातील माणसांना होत असतो. त्या माणसाला त्याचा त्रास होत नसेल तर स्वत:चा स्वभाव बदलवण्याचा म्हणजे विकृती दूर करण्याचा प्रयत्न केला जात नाही. व्यक्तिमत्त्व विकृतीमध्ये त्या व्यक्तीलाही त्रास होत असेल तर मानसोपचार उपयोगी ठरतात. तीव्र उदासी, भीती ही लक्षणे कमी करण्यासाठी औषधेही दिली जातात. ‘स्वभावाला औषध नाही’ हे खरेच; कारण औषधांनी मेंदूत रचनात्मक बदल फारसे होत नाहीत. मात्र आपले लक्ष शरीरातील संवेदना आणि मनातील विचार यावर ठेवून त्यांचा साक्षीभावाने स्वीकार करण्याचा सराव न्युरोप्लास्टीनुसार मेंदूत रचनात्मक बदल घडवू शकतात. त्यामुळे लंडन येथील आयएमबीटी (इंटिग्रेटेड माइंडफुलनेस बेस्ड थेरपी) सारखी अनेक केंद्रे व्यक्तिमत्त्व विकृती दूर करण्यासाठी कार्यरत आहेत. ‘बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी’मध्ये स्वत:ला इजा करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याने अशा व्यक्तींना उपचारांसाठी नेले जाते त्यामुळे त्याचे निदान अधिक प्रमाणात होते. मात्र अन्य स्वभावविकृती माणसाची कार्यक्षमता आणि आयुष्याच्या गुणवत्तेवर (क्वॉलिटी ऑफ लाइफ) दुष्परिणाम करीत असल्याने हे स्वभावदोष कमी करण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक माणसात काही ना काही स्वभावदोष असतो. जवळच्या नातेवाईकाला जो दोष वाटेल तो त्या व्यक्तीला वाटेलच असेही नाही. कुणीही दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव बदलवू शकत नाही. समुपदेशकदेखील, विचार बदलण्याचे किंवा त्यांना साक्षीभाव ठेवून स्वीकार करण्याचे कौशल्य दुसऱ्या माणसाला शिकवू शकतो; पण कुटुंबात योग्य वातावरण मिळाले तर हे अधिक सोपे जाते. याचसाठी मानसोपचारात कुटुंब चिकित्सा (फॅमिली थेरपी) ही संकल्पना लोकप्रिय होत आहे.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:07 am

Web Title: article on temperamental medicine abn 97
Next Stories
1 कुतूहल : फुलपाखरांचे आभासी रंग
2 मनोवेध : व्यक्तिमत्त्वातील विकृती
3 कुतूहल : झेपावण्याआधी..
Just Now!
X