डॉ. यश वेलणकर

ध्यानाचे परिणाम मेंदूत दिसून येतात हे स्पष्ट झाल्याने मानसोपचारात त्याचा उपयोग अधिकाधिक होऊ लागला. सिग्मंड फ्रॉइड यांच्यानंतर मानसोपचार पद्धतीच्या तीन लाटा आल्या असे मानले जाते. पहिली लाट ही वर्तनचिकित्सेची होती. माणसाच्या केवळ वर्तनाला महत्त्व देणाऱ्या या उपचार पद्धतीच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर चिंतनचिकित्सेची दुसरी लाट आली. त्यामध्ये वर्तनाबरोबर भावना आणि विचार यांनाही महत्त्व दिले गेले. त्यानंतरची तिसरी लाट म्हणजे ध्यान, अटेन्शन यांनाही महत्त्व देणाऱ्या मानसोपचार पद्धती विकसित झाल्या.

तिसऱ्या लाटेतील सर्वात पहिली उपचार पद्धती म्हणजे- द्वंद्वात्मक वर्तन (डायलेक्टिकल बिहेव्हिअर) चिकित्सा! त्रासदायक भावना आणि विचार बदलता येणे शक्य असेल तर बदलायचे; पण ते बदलत नसतील तर त्यांचा स्वीकार करायचा, अशी ही पद्धती आहे. त्यामुळे तिला ‘द्वंद्वात्मक’ असे नाव आहे. मार्शा लिन्हान यांनी ही उपचार पद्धती सुरू केली. चिंतनचिकित्सक अनेक वेळा त्यांच्या क्लायंटच्या मनातील विचार बदलवण्याचा प्रयत्न करताना थकून जातात, असे लिन्हान यांना दिसून आले. अशा वेळी ते विचार बदलवण्याचा आग्रह न धरता, त्यांचा आणि त्यांच्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा स्वीकार करण्याचे तंत्र परिणामकारक ठरते, असे त्यांच्या लक्षात आले. आत्महत्येचे विचार वारंवार मनात येणाऱ्या व्यक्तींवर त्यांनी प्रथम ही मानसोपचार पद्धती वापरली.

या पद्धतीच्या पाच पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीवर असलेल्या व्यक्तीला स्वत:च्या त्रासाची जबाबदारी स्वीकारायची नसते. ती दुसऱ्या व्यक्तींना वा परिस्थितीला जबाबदार मानत असते. समुपदेशनातून त्या व्यक्तीस- ‘स्वत:चा त्रास स्वत:च कमी करू शकतो, अन्य व्यक्ती नाही,’ हे मान्य झाले की ती दुसऱ्या पायरीवर येते. आता तिला स्वत:च्या मनातील विचार आणि भावना यांच्याकडे लक्ष द्यायला शिकवले जाते. म्हणजे या क्षणी मनात कोणत्या भावना आणि विचार आहेत त्यांचे साक्षीभाव ठेवून निरीक्षण करायचे, त्या विचारांना कोणतेही लेबल लावायचे नाही; पण त्या विचारांनुसार कृतीही करायची नाही.

हे शक्य होण्यासाठी ध्यानाचा सराव आवश्यक असतो. तो होऊ लागला की, थेरपिस्ट क्लायंटला त्याचे विचार आणि भावना लिहून काढायला, शब्दांत मांडायला प्रेरित करतो. स्वत:च्या भावना आणि विचार तटस्थपणे पाहता येणे शक्य होण्यासाठी या वेळी थेरपिस्टचा आधार महत्त्वाचा असतो. आत्महत्या करायची नाही वा रागाच्या भरात भांडायचे नाही, असे ध्येय ठेवून पुढील वाटचाल ठरवली जाते.

yashwel@gmail.com