News Flash

नवदेशांचा उदयास्त : तिमोर.. पोर्चुगलची वसाहत!

सुमारे १५ हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या तिमोर लेस्टमध्ये मुख्य प्रदेशाशिवाय शेजारची दोन छोटी बेटेही समाविष्ट आहेत.

‘पोर्चुगिज तिमोर’चा ध्वज

सुनीत पोतनीस

अगदी अलीकडे, म्हणजे २००२ साली एक स्वतंत्र देश म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारा तिमोर लेस्ट! सामान्य माणसाच्या पार खिजगणतीतही नसलेला, नावही कधी कानावरून न गेलेला आग्नेय आशियातला हा एक छोटा देश. तिमोर लेस्ट हा तिमोर या बेटाचा पूर्वेकडचा हिस्सा. सुमारे १५ हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या तिमोर लेस्टमध्ये मुख्य प्रदेशाशिवाय शेजारची दोन छोटी बेटेही समाविष्ट आहेत.

विशेष म्हणजे, आज २१ व्या शतकातही तिमोर या बेटाचे नाव आपल्याला फारसे परिचित नसताना, १६ व्या शतकाच्या सुरुवातीला- म्हणजे पाचशे वर्षांपूर्वी दूरवरून येऊन पोर्चुगिजांनी तिथे व्यापार सुरू केला, व्यापारी ठाणेदेखील निर्माण केले! १६ व्या शतकाच्या मध्यावर तिमोर बेटावर पोर्चुगलची वसाहतही वसली! पुढे पोर्चुगिजांचे युरोपीय प्रतिस्पर्धी डच हे तिमोर बेटावर आले आणि त्यांचा पोर्चुगिजांशी संघर्ष झाला. या संघर्षांतून पोर्चुगिजांनी तिमोर बेटाचा पश्चिमेकडचा अर्धा भाग डचांना दिला. पूर्व तिमोरमध्ये पोर्चुगिजांनी ‘दिली’ हे शहर वसवून त्यास आपल्या तिमोर वसाहतीची राजधानी केले. सध्याच्या स्वायत्त तिमोर लेस्टची राजधानी दिली हेच आहे.

तिमोर लेस्टमध्ये पोर्चुगिजांचा एकछत्री अंमल असल्यामुळे १९ व्या शतकात या प्रदेशाचे नाव ‘पोर्चुगिज तिमोर’ असेच झाले! पोर्चुगिजांनी तिमोर हे व्यापारी ठाणे म्हणून विकसित केले होते, तरी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तिमोरकडे त्यांनी विशेष लक्ष दिले नाही. तिमोर लेस्टचे वैशिष्टय़ म्हणजे हा सर्व डोंगराळ प्रदेश आहे आणि सर्व डोंगरांवर चंदनाच्या झाडांची अमाप वाढ आहे, तसेच या प्रदेशात कॉफीचे विपुल पीक येते. चंदनी लाकूड आणि कॉफीची मोठी निर्यात येथून होते. २० व्या शतकाच्या सुरुवातीस काही कारणांनी पोर्चुगलची अर्थव्यवस्था कोलमडली आणि पोर्चुगलच्या सर्व वसाहतींमधून संपत्तीचा ओघ सक्तीने पोर्चुगलकडे वळविण्यात आला.

तिमोर लेस्टच्या सर्व चंदन आणि कॉफीच्या उत्पादनाचा लाभ पोर्चुगलला झाला आणि त्याचे गंभीर परिणाम तिमोरी जनतेला भोगावे लागले. आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू लागली आणि या काळात पोर्चुगिज सरकारबद्दल असंतोषाची ठिणगी पडली. तिमोरी जनतेत सरकारविरोधी कट शिजू लागले.

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 12:08 am

Web Title: article on timor a colony of portugal abn 97
Next Stories
1 कुतूहल : अविभाज्य संख्या*
2 नवदेशांचा उदयास्त : किम जोंग उनचा उत्तर कोरिया
3 कुतूहल : अविभाज्य संख्या
Just Now!
X