सुनीत पोतनीस

तिमोर लेस्ट म्हणजे तिमोर पूर्व हे इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये असलेले एक बेट. हे बेट पोर्तुगलचे एक व्यापारी ठाणे आणि वसाहत होते. जनतेत हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोर्तुगिजांविरोधी चळवळ, कारवाया इथे सुरू झाल्या. दुसऱ्या महायुद्ध काळात जपानी साम्राज्याने तिमोर लेस्टचा ताबा मिळवला. प्रथम पोर्तुगीज आणि नंतर जपानी शासकांनी केलेल्या अत्याचारी कारभारामुळे त्रस्त झालेल्या तिमोरी जनतेत असंतोष पसरून त्यांनी दोस्त राष्ट्रांच्या मदतीने जपानी सैन्यावर गनिमी हल्ले सुरू केले. जपान्यांनी सुमारे ४० हजार तिमोरींची हत्या करून बंडखोरांना शांत केले. परंतु तेवढय़ातच महायुद्धात जपानचा पराभव होऊन पुन्हा एकदा तिमोरचा ताबा पोर्तुगिजांनी घेतला. पोर्तुगिजांच्या कारभारावरही तिमोरी स्वातंत्र्यवादी संघटना असंतुष्ट होत्या. त्यांच्या स्वातंत्र्यवादी आघाडीच्या नेत्यांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये पोर्तुगलचा अंमल झुगारून स्वतंत्र तिमोर लेस्ट स्थापन करीत असल्याची घोषणा केली. याआधी दोन महिने पोर्तुगिजांनी तिमोरमधला कारभार आवरता घेतला होता.

पोर्तुगिजांचा तिमोर लेस्टवरचा अंमल संपल्यावर तिथे कम्युनिस्टांचे सरकार येईल या भीतीने पश्चिमेकडचा शेजारी देश इंडोनेशियाने १९७५च्या डिसेंबरमध्ये आपले लष्कर पाठवून तिमोर लेस्टवर हल्ला केला. इंडोनेशियाने तिमोर लेस्टवर कब्जा करत १९७६ मध्ये तिमोर इंडोनेशियात समाविष्ट करून तो आपला २७ वा प्रांत असल्याचे जाहीर केले. इंडोनेशियाने तिमोरवर बसवलेला अंमल पुढे १९९९ पर्यंत टिकला. हा दोन दशकांहून अधिकचा काळ इंडोनेशियन सरकार व तिमोरी स्वातंत्र्यवादी क्रांतिकारी संघटना यांच्यातील संघर्षांचा होता. इंडोनेशियाचे लष्कर व तिमोरी बंडखोर संघटनांच्या सशस्त्र चकमकी आणि त्यातून सुमारे एक लाख तिमोरींचा मृत्यू यामुळे तिमोरी जनता पिचून गेली.

अखेरीस संयुक्त राष्ट्रांनी तिमोरी लोकांनी याबाबत सार्वमत घेऊन निर्णय घ्यावा असे सुचवले. सार्वमत इंडोनेशियाच्या विरोधात व तिमोर लेस्टच्या स्वातंत्र्याला अनुकूल मिळून २० मे २००२ रोजी तिमोर लेस्ट हा स्वतंत्र, सार्वभौम देश अस्तित्वात आल्याची घोषणा झाली. सध्या ‘डेमोकॅट्रिक रिपब्लिक ऑफ ईस्ट तिमोर’ हे एक ख्रिस्ती राष्ट्र असून बहुतांश जनता रोमन कॅथॉलिक आहे. २१व्या शतकात निर्मिती झालेला हा पहिला देश. मात्र अनेक वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढय़ामुळे तिमोर लेस्टची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे.

sunitpotnis94@gmail.com