निसर्गातील ऋतुचक्रानुसार परिसरातील हवेचे तापमान, आद्र्रता, सूर्यप्रकाश आणि पाण्याची उपलब्धता.. या व अशा अजैविक घटकांमध्ये बदल होत असतात आणि या अनुषंगाने सजीवांच्या दिनचर्येत, त्यांच्या अस्तित्वात, त्यांच्या वागणुकीतदेखील बदल होतात. उदाहरणार्थ, अनेक सूक्ष्मजीव, बुरशी, भिंतीवरील मॉस, बेडूक यांसारख्या प्रजाती फक्त पावसाळ्यातच विपुल प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे वनस्पतींच्या अनेक प्रजाती ठरावीक मोसमात उगवतात आणि नंतर नाहीशा होतात. कीटक आणि अनेक प्रकारचे प्राणी व स्थलांतरित पक्षी यांचे जीवनचक्र आणि कायमचे वा तात्पुरते अस्तित्व हे या बदलांवर अवलंबून असते. या सर्व नोंदी जैवविविधता नोंदवहीत घेतल्या गेल्या पाहिजेत, तरच ती परिपूर्ण होईल. यासाठी किमान एक वर्षांचा पूर्ण कालावधी असायला हवा. भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यात आले.

या प्रकल्पांमध्ये जैवविविधतेबद्दल आस्था असणाऱ्या व परिपूर्ण अभ्यास असणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. या माहितीचे महत्त्व व उपयुक्तता याबद्दल सजग असलेल्या कार्यकर्त्यांना आणि गावागावांमधील पर्यावरणप्रेमींना प्रयत्नपूर्वक यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षण व सर्वेक्षणाचे कामही सुरू झाले. परंतु ते अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही.

या सर्वेक्षणासाठी निवडलेल्या परिसरातील जैविक संसाधनांच्या उपलब्धतेनुसार स्थानिक उद्योगधंद्यांना उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल म्हणून, तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी या संसाधनांचा वापर करताना जैविक संसाधनांचे संवर्धन व जतनदेखील होईल यासाठी पद्धतशीर नियोजन करून त्यासाठीची यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. या जैविक संसाधनांच्या अशा वापरामुळे होणारा आर्थिक लाभ त्या परिसरातील जैवविविधता व्यवस्थापन समित्या आणि स्थानिक नागरिकांना अधिक सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी वापरता येतो.

विशिष्ट प्रकारच्या नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींसाठी विशेष योजना बनवून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाला या जैवविविधता नोंदवही प्रकल्पाचा मोठा फायदा होऊ शकतो. म्हणूनच जैवविविधता नोंदवही बनविण्याचा प्रकल्प हा सर्व सहभागींच्या प्रयत्नांतून पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहणे आवश्यक आहे.

– प्रा. विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org