19 October 2019

News Flash

कुतूहल : तंबाखूवरचा रोग

रशियातही १८९२ साली याच रोगाने तंबाखूच्या पिकाची मोठय़ा प्रमाणात नासाडी केली

(संग्रहित छायाचित्र)

 डॉ. रंजन गग्रे

इ.स. १८८६ मध्ये हॉलंड आणि जर्मनी येथे तंबाखूच्या पिकाची एका रोगामुळे खूपच नासाडी झाली. या रोगात तंबाखूच्या पानांवर पिवळसर ठिपके निर्माण होतात. यामुळे या रोगाला ‘मोझॅक रोग’ म्हटले जाते. जर्मन कृषीतज्ज्ञ अ‍ॅडॉल्फ मायेर याच्या लक्षात आले, की या रोगट पानांचा पेशीरस जर निरोगी पानांत टोचला तर निरोगी झाडालासुद्धा तोच रोग होतो. मात्र हाच रस जर ५५ अंश सेल्सियसपर्यंत तापवून मग निरोगी झाडाला टोचला तर मात्र ते झाड निरोगीच राहते. या निरीक्षणांनंतरही अ‍ॅडॉल्फ मायेर, या रसातील रोगकारक जंतू कुठल्या प्रकारचे आहेत ते मात्र सांगू शकला नाही.

रशियातही १८९२ साली याच रोगाने तंबाखूच्या पिकाची मोठय़ा प्रमाणात नासाडी केली. यावर संशोधन करताना, रशियन संशोधक दिमित्री इवानोव्स्की याने  ‘चेम्बरलँड गाळणी’  नावाची चिनी मातीची गाळणी वापरली. या गाळणीची छिद्रे इतकी सूक्ष्म होती की जिवाणूसुद्धा (बॅक्टेरिया) या चाळणीतून पार होऊ शकत नव्हते. इवानोव्स्की याने तंबाखूच्या रोगट पानांना पाण्यात कुस्करून ते द्रावण चेम्बरलँड गाळणीतून गाळले. यातून मिळालेला द्रव त्याने निरोगी पानांत टोचला. काही काळानंतर त्या निरोगी पानांनाही मोझॅक रोगाची लागण झाली. परंतु रोगजंतूंचे स्वरूप मात्र अनाकलनीयच राहिले. डच संशोधक मार्टनिस बायजेरिक याने तंबाखूवरील रोग हा जिवाणूंमुळे नव्हे, तर या गाळणीतून पार होऊ शकणाऱ्या कुठल्या तरी अतिसूक्ष्म जिवांमुळे – ‘विषाणूं’मुळे (व्हायरस)  – होत असल्याचे मत मांडले.

अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ वेंडेल स्टॅन्ली याने १९३०च्या दशकात, रोगट पानांच्या रसावर प्रक्रिया करून त्यातील हे विषाणू स्फटिकाच्या स्वरूपात वेगळे केले. अतिसूक्ष्म प्रमाणातील हे स्फटिकदेखील तंबाखूच्या रोपास रोगकारक ठरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर अल्पकाळातच मोझॅक विषाणू हा प्रथिनांचा बनलेला असून त्यात रिबोन्युक्लिइक आम्ल (आरएनए) असल्याचे सिद्ध झाले. विषाणूंच्या या शोधासाठी १९४६ सालच्या नोबेल पुरस्काराने वेंडेल स्टॅन्ली याला सन्मानित करण्यात आले. विषाणू हे स्वत प्रजननक्षम नसले तरी ते पेशींत शिरकाव करतात व त्यानंतर त्यांचे पुनरुत्पादन होऊ शकते. अनेक व्याधींना कारणीभूत ठरणाऱ्या, विविध प्रकारच्या विषाणूंचा अभ्यास करणारी व्हायरोलॉजी ही सूक्ष्मजीवशास्त्रातील महत्त्वाची शाखा ठरली आहे.

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on May 8, 2019 12:09 am

Web Title: article on tobacco disease