– सुनीत पोतनीस

सार्वभौम मोझांबिक अस्तित्वात आल्यावर सुरू झालेले गृहयुद्ध १५ वर्षे चालले. १९९२ साली राष्ट्राध्यक्षपदावर आलेले जोआकिम चिसॅनो यांनी आमूलाग्र शासकीय बदल करून मोझांबिकमध्ये राजकीय स्थैर्य आणले व सामाजिक विकासाच्या दिशेने पावले टाकली. त्यांनी तत्पूर्वीचे माक्र्सवादी सरकार बदलून तिथे भांडवलशाही सरकार आणले. तसेच नवीन राज्यघटना लागू करून, बहुपक्षीय लोकशाहीवादी राज्यपद्धती आणून सर्व प्रतिस्पर्धी राजकीय संघटनांमध्ये सुसंवाद राखला.

President Erdogan of Turkey
तुर्कस्तानात धर्मवादी राजकारणाला शहरी मतदारांनी नाकारले? अध्यक्ष एर्दोगान यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांत अपयश कशामुळे?
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
Russia Ukraine War PM Narendra Modi
पुतिन, झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा; लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण
Dr Madhav Kinhalkar
अशोक चव्हाण – डॉ. माधव किन्हाळकर तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र!

प्रजासत्ताक मोझांबिकमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक १९९४ मध्ये होऊन, फ्रेलिमो पक्षाचे जोआकिम चिसॅनो बहुमत मिळवून राष्ट्राध्यक्षपदी निर्वाचित झाले. या निवडणुकीमुळे तिथे राजकीय स्थैर्य आलेले पाहून यादवी युद्धाच्या काळात जे सतरा लाख मोझांबिकी परदेशांत आश्रयाला गेले होते ते मायदेशी परतले. फ्रेलिमो म्हणजे मोझांबिक लिबरेशन फ्रंट या संघटनेच्या राजकीय पक्षाला मोझांबिकमध्ये झालेल्या पुढच्या बहुतेक सार्वत्रिक निवडणुकांत बहुमत मिळाले. २०१५ साली झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले फ्रेलिमोचे फिलीप न्यूसी (छायाचित्र पाहा) हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले.

सार्वत्रिक निवडणुका जरी खुल्या वातावरणात झाल्या तरी प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पक्ष फ्रेलिमो आणि विरोधी पक्ष रेनॅमो यांच्यात आरोप-प्रत्यारोप, हिंसक चकमकी सुरूच असतात. साधारणत: २०१५पासून ‘इस्लामिक स्टेट’च्या (‘आयसिस’ या अतिरेकी संघटनेच्या) दहशतवादी कारवाया मोझांबिकच्या उत्तरेकडील भागांत सुरू झाल्या आहेत. २०२०मध्ये त्यांनी मोझांबिकच्या हिंदी महासागरातील काही बेटांवर कब्जाही केला. २०२०च्या निवडणुकीतही फिलीप न्यूसी हेच फ्रेलिमोतर्फे निर्वाचित होऊन सध्या मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष आहेत. संयुक्त राष्टे्र, आफ्रिकन युनियन, अलिप्त राष्ट्र संघटना वगैरे आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य असलेला हा देश जगातील अत्यंत गरीब आणि अविकसित देशांपैकी एक आहे.

तीन कोटी लोकसंख्येच्या मोझांबिकमध्ये ख्रिश्चनधर्मीय सर्वाधिक म्हणजे साठ  टक्के, अठरा टक्के मुस्लीम आणि बाकी आफ्रिकन पारंपरिक धर्म पाळणारे आहेत. चार शतकांच्या पोर्तुगीज सत्तेखाली राहिल्याने मोझांबिकची राजभाषा पोर्तुगीज असली तरी लोकांमध्ये अधिक प्रचलित आहे ती स्वाहिली भाषा. राजधानी मापुतो हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर मोझांबिकचे औद्योगिक व व्यावसायिक केंद्र आहे.

sunitpotnis94@gmail.com