सुनीत पोतनीस

दुसऱ्या महायुद्धातील जेते अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांचा १९४५ साली कोरियावर अंमल सुरू झाला. परंतु लवकरच या पूर्णपणे विरोधी राजकीय विचारसरणीच्या देशांमध्ये मतभेद वाढून दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. अखेरीस १९५० साली या कोरियन युद्धाला तोंड फुटले. सोव्हिएत रशियाच्या मदतीला चीन आला, तर अमेरिकी आघाडीत दोस्तराष्ट्रांचे सैन्य सामील झाले. १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे हे युद्ध कोरियन भूमीवर लढले गेले. या युद्धकाळात लाखो कोरियन नागरिक मारले गेले. कोरियाच्या अनेक शहरांचा या युद्धाने मोठा विध्वंस झाला, सव्वा लाख सैनिक आणि नागरिक युद्धबंदी होऊन त्यांना कोरियाजवळच्या एका छोटय़ा बेटावर पाठविण्यात आले.

अखेरीस या कोरियन युद्धाचा कोणताही निर्णय न होता, १९५३ मध्ये दोन्ही आघाडय़ांमध्ये युद्धबंदी तह होऊन युद्ध समाप्त झाले. युद्धबंदीनंतर अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांमध्ये कोरियाची फाळणी करून दोन स्वतंत्र सरकारे स्थापन करण्याचे ठरले. तत्पूर्वी १९४८ साली सोव्हिएत संघ व अमेरिका यांनी उत्तर आणि दक्षिण कोरियात हंगामी सरकारे बनवली होतीच व त्यांच्या राजधान्याही त्या वेळी प्याँगयांग आणि सेऊल येथे नक्की केल्या होत्या.

१९५३ मध्ये झालेल्या तहान्वये कोरियाची फाळणी करून उत्तर आणि दक्षिण कोरिया असे दोन तुकडे करण्यात आले. हे दोन तुकडे ३८ रेखांशाला धरून करण्यात आले. उत्तर कोरिया व दक्षिण कोरियात विभाजन रेषा आणि सरहद्द म्हणून ३८ रेखांशाला धरून चार किलोमीटर रुंद आणि २४० किलोमीटर लांबीचा जमिनीचा पट्टा सैन्यविरहित क्षेत्र म्हणून राखून ठेवण्यात आला.

अशा प्रकारे कोरिया (संयुक्त) या देशाची फाळणी होऊन उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन नवीन देशांची निर्मिती झाली. दोन्ही देशांमधील सरकारे अगदी विरोधी राजकीय विचारसरणीची. त्यामुळे या दोन्ही नवजात देशांमध्ये आजपर्यंत राजनैतिक आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झालेले नाहीत.

sunitpotnis94@gmail.com