सुनीत पोतनीस

युगांडा.. ‘द पर्ल ऑफ आफ्रिका’ या नावाने संबोधला गेलेला हा देश मध्यपूर्व आफ्रिका खंडात आहे. इतर बहुसंख्य आफ्रिकी देशांप्रमाणे यादवी युद्धांनी खदखदणाऱ्या, गांजलेल्या या देशाच्या सीमा केनिया, सुदान, टांझानिया, कांगो गणराज्य आणि रवांडा या देशांच्या सीमांना भिडलेल्या आहेत. आफ्रिका खंडातल्या युगांडाच्या या परिसरात परकीय लोक पोहोचले ते इतर प्रदेशांपेक्षा फार उशिरा. गुलाम आणि हस्तिदंत मिळवण्यासाठी १८४० साली प्रथम अरब व्यापारी इथे आले.

९ ऑक्टोबर १९६२ हा युगांडाचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी युगांडा या स्वायत्त, सार्वभौम देशाची निर्मिती झाली. खरे तर हा युगांडाचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणायला हवा! सामान्यत: देश, प्रदेश पारतंत्र्यात जातात आणि स्वातंत्र्य मिळवतात ते परकियांपासून. युगांडाचे वैशिष्टय़ म्हणजे हा देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला आणि पुन्हा १९७१ मध्ये पारतंत्र्यात गेला. परंतु या वेळी हा देश पारतंत्र्यात गेला तो त्यांचाच लष्करी अधिकारी असलेला हुकूमशहा इदी अमिन याच्या! त्याच्या तावडीतून युगांडाच्या जनतेची सुटका झाली ती नऊ वर्षांनी- १९७९ मध्ये!

‘युगांडा’ हे नाव त्या प्रदेशाला मिळाले ते पूर्वी तिथे असलेल्या ‘बुगांडा’ या राजवटीमुळे. प्राचीन काळात बांटू भाषा बोलणारे लोक मध्यपूर्वेतून युगांडाच्या दक्षिण भागात येऊन स्थायिक झाले. या लोकांनी पुढे तीन राज्ये स्थापन केली, त्यातील सर्वात प्रबळ राज्य होते बुगांडा. पुढे या प्रदेशालाच लोक युगांडा म्हणू लागले. १९ व्या शतकाच्या मध्यावर अरब व्यापाऱ्यांची हस्तिदंताच्या शोधात इथे ये-जा वाढली. पुढे १८६० ते १८७० या दशकभरात अरब व्यापाऱ्यांबरोबरच काही ब्रिटिश नवीन प्रदेशाच्या शोधात आले. हे युगांडात आलेले पहिले युरोपीय. याच काळात जर्मन, ब्रिटिश, इटालियन लोकांच्या आफ्रिका खंडात नवनवीन प्रदेशांवर आपले बस्तान बसवून तिथे वसाहती स्थापण्याच्या खटपटी सुरू झाल्या होत्या.

प्रथम इथे जर्मनांनी आपली वसाहत करायचे ठरवले होते, परंतु त्यांचे या परिसरातील स्वारस्य कमी होऊन पुढे ब्रिटिश राजवटीने त्यात लक्ष घातले. १८८६ साली ब्रिटिश आणि जर्मन साम्राज्यांमध्ये वाटाघाटी होऊन एक करार करण्यात आला. त्यानुसार युगांडाच्या दक्षिणेतील व्हिक्टोरिया सरोवराच्या पलीकडील काही भाग वगळता बाकी युगांडातील आपले लक्ष जर्मनांनी काढून घेतले.

sunitpotnis94@gmail.com