09 March 2021

News Flash

कुतूहल : संयुक्त राष्ट्रे आणि पर्यावरण

१९६८ साली स्वीडनमध्ये होत असलेल्या आम्लपर्जन्यामुळे जलीय परिसंस्था आणि वनांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले

संग्रहित छायाचित्र

 

१९४५ साली दुसरे जागतिक महायुद्ध संपले. जगातल्या जवळपास सर्वच राष्ट्रांमध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा प्रमुख आघाडय़ांवर प्रचंड उलथापालथ झाली होती/ होत होती. खूप मोठय़ा प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर शांतता, सलोखा व सौहार्द राखणे आणि सुरक्षाव्यवस्था निर्माण करणे, त्याचप्रमाणे सामाजिक प्रगती, मानवी अधिकारांचे, मूल्यांचे रक्षण करणे अशा विविध उद्देशांनी १९४५ साली अमेरिका, भारत, इंग्लंड, यांच्यासह एकूण ५१ देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रांची (युनायटेड नेशन्स) स्थापना केली.

जागतिक महायुद्धाच्या काळात ढासळत्या पर्यावरणाचा विचार कोणी करणे अर्थातच अशक्य होते. या महायुद्धाची एक ‘देणगी’ मानवाला लाभली, ती म्हणजे ‘डीडीटी’ नावाचे अत्यंत प्रभावी कीटकनाशक. या युद्धादरम्यान जंगलात फिरणाऱ्या सैनिकांचे डास व इतर चावऱ्या कीटकांपासून आणि या कीटकांमार्फत फैलावल्या जाणाऱ्या रोगजंतूंपासून संरक्षण करण्यासाठी याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला गेला. युद्ध संपल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकावर पडणाऱ्या किडीचा नाश करण्यासाठी डीडीटीचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले. १९५० च्या दशकात अमेरिका, युरोप या खंडांमध्ये या डीडीटीचे स्थानिक पशू-पक्षी आणि एकूणच सजीवांवर अतिशय गंभीर, घातक परिणाम दृश्य स्वरूपात जाणवू लागले. यावर राशेल कार्सन या अमेरिकी वन्यजीवशास्त्रज्ञ महिलेने संशोधन करून १९६२ साली ‘सायलेंट स्प्रिंग’ हे ऐतिहासिक पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाने अमेरिकेतच नव्हे, तर जगभर खळबळ माजवली.

दरम्यान, १९६८ साली स्वीडनमध्ये होत असलेल्या आम्लपर्जन्यामुळे जलीय परिसंस्था आणि वनांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले. या आम्लपर्जन्याला कारणीभूत ठरणारा सल्फर डायऑक्साइड हा वायू शेजारील युरोपीय राष्ट्रांच्या कारखान्यांमधून येत असल्याचे निदर्शनास आले.

या दोन प्रमुख घटनांचे गांभीर्य लक्षात आल्यावर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने जगातील ढासळत्या पर्यावरणाचा आढावा घेणे आणि त्यावर सदस्य राष्ट्रांच्या सहकार्याने प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी विचारविनिमय करणे, यासाठी १९७२ साली ५ जून ते १६ जूनदरम्यान ‘मानव आणि पर्यावरण’ अशी मध्यवर्ती संकल्पना घेऊन स्वीडनमध्येच स्टॉकहोम या शहरात एक जागतिक परिषद भरवली. १३० देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केवळ पर्यावरणाच्या विचारविनिमयासाठी भरवण्यात आलेली जगाच्या इतिहासातील ही पहिली परिषद! त्यामुळे या घटनेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:07 am

Web Title: article on united nations and the environment abn 97
Next Stories
1 मनोवेध : ध्यान चिकित्सा
2 कुतूहल : हवा प्रदूषण आणि करोना महासाथ
3 मनोवेध : तत्त्वज्ञानाची चौकट
Just Now!
X