14 October 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : अवास्तवता

अवास्तव अपेक्षा - इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणं म्हणजे स्वत:वर ओझं घेणं आणि इतरांवर मानसिक - भावनिक ओझं लादणं.

(संग्रहित छायाचित्र)

 डॉ. श्रुती पानसे

‘आसपासच्या माणसांशी योग्य पद्धतीने व्यवहार करता येणं,’ ही आहे डॅनियल गोलमन यांनी सांगितलेल्या भावनिक बुद्धिमत्तेतली चौथी पायरी. ‘योग्य’ व्यवहारासाठी टाळायला हवी ती अवास्तवता! म्हणजे काय-काय?

अवास्तव अपेक्षा – इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणं म्हणजे स्वत:वर ओझं घेणं आणि इतरांवर मानसिक – भावनिक ओझं लादणं. अशा अपेक्षा करण्याने सगळेच दु:खी होतात. कारण इतरांची वैचारिक जडणघडण केवळ आपल्या सांगण्यामुळे बदलू शकत नाही. एकाकडून दुसऱ्याच्या कामाची अपेक्षा कशी काय करणार? केवळ आपल्याला असे असे बदल हवेत, म्हणून कोणत्याही माणसात कधीच बदल होत असतात.

अवास्तव वैर – काही व्यक्ती एखाद्याविषयी दीर्घ काळ मनात भिंत बांधून ठेवतात. ते क्षमा करू शकत नाहीत आणि विसरूही शकत नाहीत. त्यांच्या मनातली ही भावना शरीरावर दुष्परिणाम करते. विशेषत: मेंदूवर आणि हृदयावर अशा वागण्याचा चांगला परिणाम होतो. आपल्या मनोवस्थेचा फार जवळचा संबंध शारीरिक अवस्थेशी असतो. त्यामुळे जुन्या हेव्यादाव्याच्या गोष्टी दूर करायला हव्यात. जी माणसं क्षमाशील असतात, त्यांची तब्येत खरोखरच ठणठणीत असते. मनातला वैरभाव दूर झाला की हलकं वाटतं. मोकळं वाटतं.

अवास्तव सूचना – ‘तुला व्यवहारज्ञान नाही’,  ‘कायम तंद्री लागलेली असते,’ असं एखाद्याला रोज रोज सांगितलं तर त्यालाही ते खरं वाटू लागतं. इतरांशी व्यवहार करताना हे कायमच लक्षात ठेवायला हवं की या पद्धतीने आपण कोणाशी बोलत नाही ना? तितकंच महत्त्वाचं म्हणजे, दुसरं कोणी आपल्याशी बोलत नाही ना ? दोन्ही गोष्टी चूकच. आपण दुसऱ्याला दिलेल्या सूचना आणि दुसऱ्यांनी आपल्याला दिलेल्या सूचना नकारात्मक नकोत.

अवास्तव स्व-प्रेम –  स्वत: सोडून इतर कोणाहीसाठी काहीही करताना जे मनात समाधान नांदतं, त्याला तोडच नाही. त्यातून आपण खरेखुरे आनंदी होत असतो.  स्व-प्रेमात बुडालेल्या माणसांना इतरांची पर्वा नसते. त्यांच्यातली ‘स्व-जाणीव’ अहंकाराकडे झुकते. म्हणून स्वत:विषयीची रास्त, परखड आणि प्रामाणिक जाणीव हवी. पण अतिरेकी  स्व -प्रेम मात्र भावनिक बुद्धिमान बनू देत नाही. म्हणून आपल्याच भावनांशी आपल्याला त्रयस्थपणे ‘चतुराईने व्यवहार’ करता आला पाहिजे.

contact@shrutipanse.co

First Published on May 14, 2019 12:05 am

Web Title: article on unrealism