16 July 2020

News Flash

मनोवेध : मनातील कचरा

आपल्या घरात कचरा तयार होतो, तसाच मनातदेखील तयार होतो.

डॉ. यश वेलणकर

‘जागृत मन’ म्हणजे आपल्या मनात येणारे, आपल्याला जाणवणारे विचार असतात. आपण अशी कल्पना करू की, आपले मन हे घरासारखे आहे. त्यातील पाहुण्यांची बसायची व्यवस्था असते ती बाहेरील खोली म्हणजे ‘जागृत मन’ होय. आपण ती खोली व्यवस्थित ठेवतो. धुण्याचे कपडे, बाजारातून आणलेल्या वस्तू या आतील खोलीत ठेवतो, तसे ‘सुप्त मन’ असते. बाह्य़ मनात येणारे जे विचार/भावना आपण नाकारतो, त्यांना पापी, नकारात्मक असे लेबल लावतो; ते सुप्त मनात साठत राहतात. आपल्या घरात कचरा तयार होतो, तसाच मनातदेखील तयार होतो.

आपल्या घराची आतील खोली स्वच्छ केलीच नाही तर? तेथील कचरा कुजेल आणि त्याची दुर्गंधी बाहेरील खोलीतदेखील येऊ लागेल. मनात असेच घडते, तेव्हा चिंतारोग, पॅनिक अटॅक, मन्त्रचळ, औदासीन्य, त्रासदायक मानसिक तणाव असे त्रास जाणवू लागतात. असे त्रास होऊ लागले, की मानसोपचार आवश्यक असतातच.

पण कचरा सर्वाच्याच मनात तयार होतो. काही प्रमाणात तो निसर्गत: असतो. कारण आपला मेंदू नकारात्मकतेकडे झुकणारा आहे. त्याच्यात वाईट, भीतीदायक स्मृतींना अधिक जागा असते. तसे होते म्हणूनच आपले पूर्वज लाखो वर्षे जंगलात तग धरू शकले, धोकादायक जागा आणि प्रसंग टाळू शकले. आपला मेंदू नकारात्मकतेकडे झुकणारा आहे, हा अनुभव तुम्ही काहीही न करता शांत बसलात, की येऊ लागतो. ‘रिकामे मन सतानाचे घर’ ही म्हण याच अनुभवातून आली आहे. त्याचसाठी माणूस सतत स्वत:ला कामात, नाही तर करमणुकीत गुंतवून ठेवत असतो. पण असे करणे म्हणजे मनाची आतील खोली सतत बंद ठेवण्यासारखे आहे. ती स्वच्छ करण्यासाठी त्या खोलीत जायला हवे. मनोविश्लेषण पद्धतीमध्ये त्यासाठी माणसाला त्याच्या मनात येणारे विचार सतत बोलत राहायला सांगितले जायचे. मात्र असे बोलतानादेखील तो काही विचार लपवीत असतो.

संमोहित अवस्थेत त्याचे विचार त्याला जाणवत नाहीत. त्यामुळे सुप्त मन स्वच्छ होत नाही. एकाग्रता, ध्यान हे मनाची आतील आणि बाहेरील खोली यांमध्ये पक्की तटबंदी बांधण्यासारखे आहे. त्यामुळे आतील कचरा दिसणार नाही, त्याचा त्रास तात्पुरता कमी होईल; पण तो कचरा स्वच्छ होणार नाही. मनात येणाऱ्या सर्व विचारांना प्रतिक्रिया न करता जाणणे म्हणजे विचारांचा साक्षीभाव सुप्त मनातील कचरा साफ करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2020 12:11 am

Web Title: article on waste of mind abn 97
Next Stories
1 कुतूहल : फुलपाखरांचे प्रजनन  
2 कुतूहल : स्वच्छ खाडी अभियान
3 मनोवेध : वडय़ाचे तेल वांग्यावर !
Just Now!
X