– डॉ. यश वेलणकर

माणूस आणि अन्य प्राणी यांच्यात कोणते फरक आहेत, हे स्पष्ट झाले आहे. माणूस स्वत:च्या इच्छेने लक्ष कुठे द्यायचे हे ठरवू शकतो. आपण जे काही करीत आहोत ते का करीत आहोत, असा प्रश्न तो स्वत:ला विचारू शकतो. हा हेतू तो अन्य माणसांना सांगू शकतो. हे सांगताना तो खुणा करतो, तशीच विकसित भाषा वापरतो. अन्य प्राण्यांचीही भाषा असते; पण तिला खूप मर्यादा आहेत. ते नवीन शब्द तयार करू शकत नाहीत. जगभरातील सारे कावळे कावकाव करतात, पण त्यानुसार त्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत नाहीत. माणूस समोर जे काही नसेल त्याचा – म्हणजे अमूर्त – विचार करू शकतो. काय असायला हवे याच्या कल्पना करू शकतो. त्याचमुळे तंत्रज्ञान विकसित करू शकतो. हे करताना त्याला कार्यकारणपरंपरेचा विचार करावा लागतो. जे काही घडले ते का झाले असावे, याचे आडाखे तो बांधतो. त्यानुसार एखादी समस्या सोडवतो. गंमत म्हणजे, माणसाच्या खालोखाल ही क्षमता कावळ्यात आहे असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मडक्यातील पाण्याची पातळी वाढावी म्हणून त्यामध्ये खडे टाकणारा कावळा खरा असू शकतो! मात्र तो त्याचे तंत्रज्ञान विकसित करू शकत नाही.

ही कार्यकारणपरंपरा शोधणे म्हणजेच विज्ञान; ती माणसाचीच निर्मिती आहे. विज्ञान आदिम काळापासून आहे. त्याचमुळे माणूस अन्य प्राण्यांना आपल्या अंकित करू शकला. रेडे, घोडे, हत्ती यांना पाळीव प्राणी करून शेतीसाठी, वाहतुकीसाठी, जड सामान ओढण्यासाठी वापरू लागला. अन्य प्राणी आणि माणसात सर्वात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे, अन्य प्राणी स्वत:ला स्वत:च्या प्रेरणेने प्रशिक्षण देऊ शकत नाहीत. त्यांना माणसाने प्रशिक्षण दिले की त्यांचा स्वभाव बदलू शकतो. पण ‘मी आता शांत होणार आहे’ असे मारका बैल किंवा रागीट कुत्रा ठरवू शकत नाही.

माणूस मात्र असे ठरवू शकतो आणि प्रयत्नपूर्वक स्वत:ला बदलवू शकतो. त्या हेतूने स्वत:च्या मेंदूला प्रशिक्षण देऊ शकतो. हे माणसाला शक्य होते, कारण प्रतिसाद निवडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. अन्य सर्व प्राण्यांच्या प्रतिक्रिया ते निवडू शकत नाहीत. कारण ते स्वत:कडे साक्षीभाव ठेवून पाहू शकत नाहीत. हेतू म्हणजेच मूल्यविचार, लक्ष्य निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अंध प्रतिक्रिया न करण्याचा सराव हे माणसाला माणूसपण देते.

yashwel@gmail.com