सुनीत पोतनीस

साप, नाग, मोठे सरडे, मगरीसारखे सरपटणारे प्राणी यांच्या जोपासनेचा आगळावेगळा छंद जोपासणारे रोम्युलस व्हिटेकर या अमेरिकन माणसाने सुमारे ५० वर्षांपूर्वी स्थापन केलेले चेन्नई येथील सर्पोद्यान हे भारतातील बहुधा पहिले असावे. अमेरिकेतील मायामी सर्पेटेरियममध्ये साप, मगर वगैरे प्राण्यांच्या जोपासनेचे शिक्षण घेऊन आलेल्या रोम्युलस यांनी चेन्नईच्या उपनगरात १९७० साली पाच एकरांमध्ये हे सर्पोद्यान उभं केलंय. तामिळनाडूत साप पकडून ते विकणे हा परंपरागत व्यवसाय करणारी इरूला ही जमात आहे. सरकारने साप विक्री व्यवसायावर बंदी आणल्यामुळे हे लोक बेकार झाले. रोम्युलस यांनी यावर तोडगा काढून या लोकांकडून त्यांनी साप, नागांची खरेदी सुरू करून त्यांचे संवर्धन, संकर आणि त्यांचे विष काढून ते औषधी कंपन्यांना पुरवण्याचे केंद्र सुरू केले.

मद्रास स्नेक पार्कला मिळालेला प्रतिसाद पाहून रोम्युलस यांनी त्याशेजारी साडेआठ एकरांत १९७६ साली मद्रास क्रोकोडाइल बँक (एम.सी.बी.) सुरू केले. साप, नाग आणि सरडे यांच्याबरोबरच मगरींबद्दल संशोधन, संवर्धनासाठी हे केंद्र होते. सुरुवातीस १४ जातींच्या १४ मगरी असलेल्या त्यांच्या क्रोकोडाईल बँकेत आता त्यांची संख्या २००० हून अधिक झाली आहे. मगरींची घडियाल (सुसर) ही प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भारतात केवळ दीडशे सुसरी जीवित आहेत. त्यासाठी रोम्युलसनी घडीयाल क्रॉक संकर, संवर्धन केंद्र स्थापन केलंय. रोम्युलस यांच्या या कार्याबद्दल भारत सरकारने २०१८ साली त्यांचा ‘पद्मश्री’ने गौरव केला तसेच त्यांच्या पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल त्यांना रोलेक्स अ‍ॅवॉर्ड आणि व्हिटले अ‍ॅवॉर्ड मिळाले आहेत. या सर्व पुरस्कारांच्या पशांतून त्यांनी कर्नाटकात सापडणाऱ्या किंग कोब्रा या नाग प्रजातीवरील संशोधन केंद्र स्थापन केले. रोम्युलस यांनी वन्य प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल अनेक माहितीपट तयार केल्या आहेत. आता पंचाहत्तरी झालेले रोम्युलस दक्षिण चेन्नईत पत्नी जानकी, मुले, आपला आवडता एमू आणि कुत्रा यांच्यासमवेत आपल्या फार्म हाउसमध्ये राहतात. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवले आहे.

sunitpotnis@rediffmail.com