वन्यजीव म्हणजे खुल्या नैसर्गिक अधिवासात, विविध प्रकारच्या परिसंस्थांमध्ये आढळणारे सर्व प्रकारचे सजीव. यामध्ये लक्षावधी प्रकारचे सूक्ष्म जीव, विविध प्रकारच्या लहान-मोठय़ा वनस्पती, कीटक, लहान-मोठे पक्षी, प्राणी यांचा समावेश करण्यात आला आहे. माणसाने ‘पाळलेले’ किंवा ‘माणसाळलेले’ सजीव सोडल्यास इतर सर्व सजीव हे वन्यजीवनाचा अविभाज्य घटक आहेत. हे वन्यजीवन भारतात एके काळी अतिशय समृद्ध होते. परंतु ब्रिटिश राजवटीत विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांची, त्याचप्रमाणे वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आणि वन्यजीवांच्या विविधतेवर याचे गंभीर परिणाम झाले. यात स्वातंत्र्यपूर्व काळात निव्वळ मनोरंजनासाठी राजे-महाराजे व इतर हौशी शिकारी वन्यप्राण्यांच्या जिवावर उठलेच होते. परिणामी वन्यजीवांचा मोठय़ा प्रमाणात विनाश होऊ लागला.

नाही म्हणायला, ब्रिटिश राजवटीतच १९३६ साली उत्तर प्रदेशात (आताचा उत्तराखंड) विशेषत: धोकादायक स्थितीत असलेल्या वाघाच्या ‘रॉयल बेंगाल टायगर’ या प्रजातीच्या संरक्षणासाठी हॅली राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. १९५५-५६ च्या दरम्यान याचे नामकरण जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले. अर्थात, पुढे ब्रिटिश राजवट संपून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीदेखील मोठय़ा प्रमाणात वन्यप्राण्यांच्या शिकारी होतच होत्या. परिणामी अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले, अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर जाऊन पोहोचले, तर काही नामशेष झाले. याचे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय किंवा आशियाई चित्ता. अतिशय देखणा, रुबाबदार, चपळ असा हा प्राणी भारतात मोठय़ा प्रमाणात आढळत असे. परंतु अमर्यादित शिकारींमुळे आणि काही नैसर्गिक कारणांमुळे यांची संख्या कमी होत गेली. भारतात १९४८ साली शेवटचा चित्ता आढळल्याची नोंद आहे, तर १९५२ साली भारतातून चित्ता हा प्राणी कायमचा लुप्त झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ साली ‘भारतीय वन्यजीव मंडळा’ची स्थापना करण्यात आली. १९५६ साली भारतातील खास शिकारींसाठी म्हणून जी जंगले राखीव होती, त्यांतील वन्यप्राण्यांना खास संरक्षण देण्यासाठी या मंडळाच्या अधिकारात अशा राखीव जंगलांना अभयारण्ये/ राष्ट्रीय उद्याने असा दर्जा देण्यात आला. १९६० च्या दशकात वन्यप्राण्यांची मोठय़ा प्रमाणावर अवैध शिकार आणि चोरटी निर्यात होत असल्याचे उघडकीस आले. पुढे १९७२ मध्ये भारत सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला आणि सप्टेंबर २००३ मध्ये भारतीय वन्यजीव मंडळाचे रूपांतर ‘राष्ट्रीय वन्यजीव मंडळ’ या वैधानिक संस्थेत करण्यात आले.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org