सर्वसाधारणपणे ग्राहकपेठा किंवा बाजारपेठा या सर्वसामान्य ग्राहकांच्या दैनंदिन तसेच प्रासंगिक गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करत असतात. परंतु भूपृष्ठीय तसेच जलीय परिसंस्थांमध्ये आढळणाऱ्या आणि ‘वन्यजीव’ म्हणून वर्गीकृत करण्यात आलेल्या विविध प्राणी व वनस्पतींना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ‘असामान्य’ ग्राहकांकडून प्रचंड मागणी आहे. ही मागणी प्रामुख्याने वनस्पती व प्राण्यांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मासाठी, सौंदर्य प्रसाधनांसाठी, रुचकर मांसासाठी, अंधश्रद्धेपोटी, विविध प्रकारच्या वस्त्रे-आभूषणे-पिशव्या घेऊन ‘मिरवण्यासाठी’ आहे.

‘ट्रॅफिक’ (ट्रेड रेकॉर्ड अ‍ॅनालिसिस ऑफ फ्लोरा अ‍ॅण्ड फौना इन कॉमर्स) ही वन्यजीव गुन्हेगारी आणि अवैध व्यापारावर सातत्याने देखरेख ठेवून अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदैव कार्यरत असलेली अशासकीय संस्था आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी प्रसिद्ध होत असलेल्या माहितीनुसार, या ‘असामान्य’ ग्राहकांचे फाजील चोचले पुरविण्यासाठी शार्क माशाचे पर (फिन्स), वाघ-सिंह-बिबटय़ांची कातडी, नखे आणि नुसते डोके, अस्वलाचे पित्त (बाइल), खवल्या मांजराचे मांस आणि अंगावरचे खवले, हत्तीचे सुळे, गेंडय़ांची शिंगे, जिराफाची कातडी, हरीण-काळविटांची कातडी व शिंगे, जिवंत ‘दुतोंडय़ा’ साप (रेड सॅण्ड बोआ), जिवंत गोरिला, विविध प्रजातींच्या सापांची कातडी, मगरी-सुसरींची कातडी, असंख्य रंगीबेरंगी पोपट व इतर विविध प्रकारचे पक्षी, ऑर्किड व इतर दुर्मीळ वनस्पती, चंदन, साग, खैर, देवदार, चिनार यांसारख्या वृक्षांचे ओंडके ही व अशी विपुल वनसंपदा अफाट किमतीला विकणाऱ्यांच्या अनेक सशस्त्र टोळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय आहेत. हा सगळा व्यवहार अर्थातच बेकायदेशीर, अवैध मार्गाने चालतो. अब्जावधी अमेरिकी डॉलर्सची उलाढाल असलेल्या या व्यवहारात चीनची बाजारपेठ सर्वात आघाडीवर आहे. भारतात या वनसंपदेसाठी असे ‘व्यापारी’ लाखो-करोडो रुपयांचे व्यवहार करत असतात. गेल्याच वर्षी मध्य प्रदेशात दुतोंडय़ा सापाची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पकडण्यात आले. त्या सापासाठी बोली लावली होती १.२५ कोटी रुपयांची! ठाण्यातून, कोकणातून खवल्या मांजरांच्या, पाण्यातील कासवांच्या तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ ड्रग्स अ‍ॅण्ड क्राइम, इंटरपोल, जागतिक बँक, वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेशन आणि सीआयटीईएस या संस्था ‘इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑन कॉम्बॅटिंग वाइल्डलाइफ क्राइम’अंतर्गत एकत्रितरीत्या अशा गुन्हेगारीला आळा घालण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतात. परंतु निव्वळ कायद्यावर विसंबून न राहता याबाबत लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणे, वन्यजीवांपासून तयार केलेल्या वस्तू व आभूषणे वापरू नयेत यासाठी जनमत तयार करणे आवश्यक आहे.

– संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org