डॉ. यश वेलणकर

मेंदू शरीराचा कर्ताकरविता आहे. त्याचा मज्जातंतू शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो, तेथील माहिती घेतो. मग मेंदू त्याचा अर्थ लावतो आणि कोणती कृती करायची हे ठरवून तसे आदेश देतो. ज्ञानेंद्रियांनी भवतालाची माहिती घेऊन त्याचाही अर्थ लावतो. या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेतून विचार जन्म घेतात. म्हणजे शरीरात काही तरी जाणवते, त्याचा मेंदू अर्थ लावतो आणि ही भूक आहे, काही खाल्ले पाहिजे असा विचार निर्माण होतो. अगदी छोटी मुले असा अर्थ लावू शकत नाहीत; शरीरात जे काही जाणवते त्याने ती अस्वस्थ होतात आणि रडू लागतात.

मेंदूच्या पेशी म्हणजे न्युरॉन्स या शरीरातील अन्य पेशींपेक्षा वेगळ्या असतात, हे १८३७ साली स्पष्ट झाले होते. त्यांच्यात विद्युतधारा असते, हे १८७५ मध्ये सिद्ध झाले. मात्र मेंदूतील ही विद्युतधारा आणि मनातील विचार यांचा संबंध डोनाल्ड हेब यांनी १९४९ मध्ये त्यांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ बिहेविअर’ या ग्रंथात स्पष्ट केला.

माणूस कोणताही अनुभव घेतो, त्या वेळी त्याच्या मेंदूतील ठरावीक न्युरॉन्स विद्युतधारा निर्माण करतात आणि ते एकमेकांना जोडले जातात. अशा एकमेकांना जोडल्या गेलेल्या न्युरॉन्सना त्यांनी ‘असेम्ब्ली’ म्हटले. त्या विचार निर्माण करतात. म्हणजेच मेंदू त्या अनुभवाचा अर्थ लावतो. कानावर पडलेला आवाज माणसाचा की गाडीचा आहे, हे तो ओळखतो. अशा विविध गोष्टी ओळखण्याची क्षमता म्हणजेच ‘बुद्धी’ होय. मेंदूत अशा जेवढय़ा अधिक असेम्ब्ली असतील, तेवढी ती व्यक्ती अधिक बुद्धिमान असते. लहान मुलाला जेवढे अधिक अनुभव मिळतात, तशी त्याची बुद्धी विकसित होते. त्यामुळे मुलांना ज्ञानेंद्रियांनी आणि कृतींनी विविध अनुभव द्यायला हवेत, हे हेब यांचे मत अजूनही ग्राह्य़ मानले जाते. हे सिद्ध करून दाखवण्यासाठी त्यांनी उंदरांवर प्रयोग केले. उंदराच्या काही पिल्लांना त्यांनी चाकोरीबद्ध वातावरणात ठेवले आणि काही पिल्लांना आवाज, चवी, गंध, कृती यांचे विविध अनुभव दिले. ज्या पिल्लांना असे अनुभव मिळाले, ते तुलनेने अधिक बुद्धिमान झाले. ते पिंजऱ्यातील चक्रव्यूह अधिक लवकर ओळखू शकतात, हे हेब यांनी दाखवून दिले.

माणूस मोठा झाल्यानंतरदेखील चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याऐवजी विभिन्न अनुभवांना सामोरे गेला; नवीन जागा, नवीन माणसे यांचा अनुभव घेत राहिला, तर न्युरॉन्सच्या नवीन जोडण्या तयार होतात आणि त्याची बुद्धी विकसित होऊ शकते.

yashwel@gmail.com