या आठवडय़ात ५ जून रोजी- म्हणजे जागतिक पर्यावरण दिनी वटपौर्णिमादेखील आहे. वटपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी सत्यवान-सावित्रीची पौराणिक कथा सगळ्यांना माहीत आहेच. विवाहित स्त्रीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी, अशी प्रथा आहे. परंपरेच्या या प्रवाहात या वृक्षाप्रति ऋण आणि आदर व्यक्त करावा, या अपेक्षेचाही एक धागा असावा. परंतु शहरीकरणाचा- अर्थात सिमेंटची जंगले उभी करण्याचा सपाटा वाढला, तसे विशेषत: शहरी भागांमध्ये एक विचित्र प्रथा रूढ झाली. वडाच्या फांद्या तोडून घरीच त्यांची पूजा करण्याचा पायंडा पडला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वटपौर्णिमेच्या दोन-तीन दिवस आधीपासूनच वडाच्या तोडलेल्या फांद्यांचे भारे बाजारात विकायला ठेवलेले दिसतात. असंख्य स्त्रिया या फांद्या घरी घेऊन जातात.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

फांद्या हा कोणत्याही झाडाचा महत्त्वाचा अवयव असतो. जेव्हा फांद्या खूप जास्त प्रमाणावर तोडल्या जातात आणि तेही अशास्त्रीय पद्धतीने, तेव्हा त्या झाडाला निश्चितच इजा होते. असे करून या झाडाकडून फुकट मिळणारा, पण अतिशय मौल्यवान प्राणवायू, त्याचप्रमाणे बाष्प, थंडावा आदी गोष्टींना आपण मुकतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करता येईल का, याचा विचार केला पाहिजे. शक्यतो प्रत्यक्ष वडाच्या झाडाचीच पूजा करणे रास्त ठरेल. पण अगदीच अशक्य असेल, तर वडाच्या झाडाच्या प्रतिमेची पूजा करता येईल. असे पर्यावरणपूरक पर्याय हे कुठल्याही परंपरेचा प्रवाह वाहता ठेवण्यास साहाय्यकच ठरतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

परंतु वडाच्या झाडाची पूजा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, योग्य रीतीने रस्त्यांच्या कडेला किंवा उपलब्ध जागी वडाच्या रोपांची लागवड करणे आणि किमान पुढील वर्षीच्या वटपौर्णिमेपर्यंत या रोपांची नियमित देखभाल करणे हा असायला पाहिजे. अगदी प्राचीन काळापासून ज्ञात असलेला, अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख असलेला हा वृक्ष इतर झाडांच्या तुलनेत अधिक प्राणवायू बाहेर सोडतो. तसेच त्याचे औषधी व इतर उपयोगही अनेक आहेत. परंतु सध्या हवा प्रदूषणाच्या, तापमानवाढीच्या काळात वातावरणात भरपूर प्राणवायू, बाष्प, थंडावा देणाऱ्या झाडांची संख्या वाढवण्याची गरज पाहता; त्यादृष्टीने अधिक उपयुक्त असलेल्या वडाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला तरच खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वारसा सांगणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकी’ होता येईल!

– संगीता जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org