– डॉ. यश वेलणकर

माणसाला होणारे अनेक शारीरिक आजार मानसिक तणावामुळे होतात. मधुमेह, हृदयविकार, अर्धशिशी, आम्लपित्त, तोंडात/आतडय़ात जखमा, सततचा थकवा, हायपरटेन्शन, थायरॉइडचे विकार.. अशा अनेक आजारांचे मूळ कारण मानसिक तणाव हे असू शकते. मात्र, असा आजार असलेल्या व्यक्ती त्यांच्यावर कोणताही तणाव नसल्याचे सांगतात. समुपदेशन करताना त्यांना त्यांच्या भूतकाळात घडून गेलेल्या त्रासदायक प्रसंगाविषयी बोलते केले, की असे काहीना काही प्रसंग त्यांना आठवतात. प्रेमभंग, अपघात, परीक्षेतील अपयश, मारहाण, दंगा, जाळपोळ, मृत्यू असे काहीना काही घडलेले असते. पण- ‘त्याचा आता कोणताही तणाव नाही, मी त्यामधून बाहेर पडलो आहे,’ असे ती व्यक्ती सांगत असते. ते खरेही असते. हा शारीरिक आजार सोडला, तर त्या व्यक्तीला कोणताही मानसिक त्रास नसतो. ती तिच्या यशस्वी आयुष्यात सुखी असते.

असा आजार असलेल्या व्यक्तींकडून सत्त्वावजय चिकित्सेत विशिष्ट ध्यान करून घेतले जाते. शरीरातील संवेदना जाणून त्यांचा स्वीकार करण्याचा साक्षीध्यानाचा सराव किमान दोन महिने झाल्यानंतर हे कल्पनादर्शन ध्यान करून घेतले जाते. त्यामध्ये भूतकाळातील प्रसंग आत्ता घडतो आहे अशी कल्पना करून तो पाहायला प्रेरित केले जाते. असे ध्यान ती व्यक्ती करू लागली, की तिला शरीरावर लक्ष न्यायला सुचवले जाते. अशा वेळी तिला छातीवर किंवा डोक्यात भार, धडधड, पोटात गोळा किंवा रडू येणे अशा संवेदना जाणवू लागतात. त्या कुठे आहेत, हे उत्सुकतेने पाहण्याची आठवण केली जाते. काही वेळा या संवेदना खूप त्रासदायक असू शकतात. त्या स्वीकारापलीकडे असतील, तर दीर्घ श्वसनाने त्यांची तीव्रता कमी होते.

तणाव नाही असे आपण म्हणत असलो, तरी आपल्या शरीरमनात या घटनांचा परिणाम साठवलेला आहे, हे त्या व्यक्तीच्या लक्षात येते. मानसिकदृष्टय़ा त्या आघातावर मात केलेली असली, तरी सुप्त मनात त्या जखमा राहिलेल्या असतात. त्यामुळे शरीरात युद्धस्थितीतील रसायने पाझरत राहतात. त्यांच्यामुळे शरीरात बदल होत असले, तरी संवेदनांकडे लक्ष देण्याचे ध्यान केलेले नसल्याने त्या संवेदना जागृत मनाला जाणवत नाहीत. मात्र त्या रसायनांमुळे शरीरात जे बदल होतात, त्यातील एखादा बदल आजार म्हणून व्यक्त होतो. वरील ध्यानाने शरीरमनात साठलेला कचरा स्वच्छ होऊन शारीरिक आजाराचा त्रास कमी होऊ शकतो.

yashwel@gmail.com