12 December 2017

News Flash

रंग माझा वेगळा!

‘गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले’.

लोकसत्ता टीम | Updated: September 29, 2017 4:37 AM

‘गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले’. बाकी बाब बोरकरांच्या या सदाबहार गीतानं मन झंकारत असतानाच एक सवालही छळत राहतो. गडद म्हणजे किती गडद? आपल्याला एकच एक रंग माहिती असतो. पण त्याच्या किती छटा असतात, हे साडीसाठी मॅचिंग ब्लाऊजपीस घ्यायला गेलं की कळतं. त्या दुकानातल्या साठ-सत्तर छटांपकी नेमकी निवडणं सेल्समनच्या तयार नजरेला लीलया जमतं. म्हणजे मग गडद किंवा फिका समजण्यासाठी अशी तयार नजरच असायला हवी का? खरं तर हो. कारण रंग ही आपल्या नजरेची किमया! तो काही पदार्थाचा उपजत गुणधर्म नाही. त्याच्यावरून परावíतत होणारी प्रकाशलहर आपल्या संवेदनांना चाळवत रंगाची अनुभूती देते. म्हणूनच तर रंगाचं मोजमाप वैज्ञानिक त्या प्रकाशलहरीच्या गुणधर्माच्या अनुषंगानंच करतात.

लहर म्हटलं की तिला माथा असतो. तिथून घसरून ती पायथ्याकडे पोचते. तिथून परत वर झेपावत माथ्याकडे. असाच तिचा प्रवास चालू राहतो. शेजार-शेजारच्या दोन माथ्यांमधलं, किंवा पायथ्यांमधलंही, अंतर म्हणजे त्या लहरीची तरंगलांबी. जितकी ही मोठी तितक्या कमी लहरी एका सेकंदात पुढून पसार होतात. आणि जितकी ही कमी तितक्या अधिक. एका सेकंदात वावरणाऱ्या लहरींची संख्या ही तिची कंपनसंख्या किंवा वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) होते. कंपनसंख्या आणि तरंगलांबी यांचं एकमेकींशी नातं हे असं

व्यस्त प्रमाणात असतं. प्रत्येक लहरीची ओळख तिच्या तरंगलांबीवरूनच होते.  ते त्या लहरीचं आधारकार्डचं म्हणा ना!

इंद्रधनुष्यात तानापिहिनिपाजा असे सातच रंग असल्याचं आपण मानतो. वास्तविक त्या वर्णपटात ३५० ते ७०० नॅनोमीटर तरंगलांबीच्या अनेक लहरी असतात. कंपनसंख्या सांगायची तर ७७० ते ४३० टेराहर्ट्ज इतकी. एक हर्ट्ज म्हणजे एका सेकंदात एक कंपन आणि टेरा म्हणजे एकावर बारा शून्य.

तांबडय़ाच्या पलीकडे अवरक्त आणि जांभळ्याच्या पलीकडे जंबूपार अशाही लहरी आहेत आणि त्यांच्याही पलीकडे इतर! पण आपल्या डोळ्यांना दिसतात त्या फक्त तानापिहिनिपाजा या मर्यादित पट्टय़ातल्याच लहरी. त्यांच्याही स्वतंत्र छटा पाहायच्या तर नजर तयार व्हावी लागते. नाही तर आहेच आधार त्यांच्या आधारकार्डाचा. पण पुढच्या खेपेला मॅचिन्ग ब्लाऊजपीस घ्यायला जाताना जर हव्या त्या रंगछटेची कंपनसंख्या किंवा तरंगलांबी सांगितलीत, तर तो बिचारा सेल्समन गोंधळूनच जाईल. त्याला त्याच्या सराईत नजरेनंच काम करू द्यावं हे उत्तम.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

इंदिरा गोस्वामी यांचे कथालेखन

इंदिरा गोस्वामींच्या लेखनाची सुरुवात कथालेखनाने झाली, त्यावेळी त्या १३ वर्षांच्या होत्या. चिनाकी मरम (परिचित प्रेम) हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९६२ मध्ये प्रकाशित झाला. त्यांनी दोन हजाराहून अधिक कथा लिहिल्या आहेत. त्यानंतर कइना (१९६६), हृदय एक नदीर नाम (१९९०), निर्वाचित गल्प (१९९८) आणि प्रिय गल्प (१९९९) असे पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. यातील बहुतेक कथा इंग्रजी, हिंदीत उपलब्ध आहेत.

आसाममधील गोलयाकडा येतील सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून थोडे दिवस कार्यरत होत्या. त्या दिवसात त्यांनी अनेक कथा लिहिल्या. नियतकालिकात प्रसिद्धही झाल्या. त्यानंतर त्या दिल्ली विद्यापीठात आल्या. तीन दशकाहून अधिक काळ त्या तिथल्या उच्चभ्रू आणि बुद्धिवंतांच्या समाजात राहत होत्या, पण त्यांना त्या जीवनशैलीचे, शहरी जीवनाचे कधीच आकर्षण वाटले नाही. कधीच त्यांच्या लेखनात ते दिसलं नाही. त्यापेक्षा त्यांना आसामधील त्यांचं ग्रामीण भागातील वास्तव्यच अधिक खुणावत राहिलेलं दिसतं. इथे दिल्लीतही त्यांनी अनेक कथा लिहिल्या.

त्यांच्या अपत्य या कथेचा इंग्रजी अनुवाद इंडियन लिटरेचरच्या अंकात गुजरातीचे प्रसिद्ध लेखक गुलाबदास ब्रोकर यांच्या वाचनात आला आणि त्यांनी इंदिराजींना याविषयी कळवले. मी आपली अपत्य ही कथा काळजीपूर्वक वाचली त्यात ठासून भरलेल्या शक्तीची मला जाणीव झाली. कथेच्या शेवटात मन उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. वर्षांनुवर्षे विसरता येणार नाही अशी ही कथा आहे. इंदिराजींच्या कथा वैशिष्टय़पूर्ण आहेत. संस्कार, मोहभंग, पशु इ. सर्व कथांमधून त्यांनी अवतीभवतीच्या सामान्य माणसाच्या दुखाला वाचा फोडली आहे.

एक अविश्वसनीय यात्रा ही कथा एका आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाची कथा आहे. या कुटुंबातील एकमेव तरुण आतंकवादाचा आश्रय घेतो. आपल्या बहिणीच्या पोटात एका भारतीय सैनिकाचं मूल वाढतेय अशी शंका घेऊन तिच्या पोटावर लाथ मारतो. वशंवेल या कथेत आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी नाईलाजाने ती शरीर विक्रय करते. पण त्या शरीरात कुणा खालच्या जातीच्या व्यक्तीचे बीज वाढवणे तिला मंजूर नाही. अशा स्त्रीच्या अगतिकतेची ही कहाणी आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on September 29, 2017 4:35 am

Web Title: articles in marathi on light