News Flash

हास्याचे मजले

ओठातल्या ओठात किंवा मिशीतल्या मिशीत म्हणा हवं तर,

हास्याचे मजले

ओठातल्या ओठात किंवा मिशीतल्या मिशीत म्हणा हवं तर, उमटणारं स्मितहास्य ते शरीराची इमारत गदगदून टाकणारं सात मजली हास्य, अशा हसण्याच्या पायऱ्यांची कल्पना आपण करतो. खरं तर ती आपल्याला पुरते. पण जपानी शास्त्रज्ञांचं तेवढय़ावर समाधान होईना. म्हणून तर त्यांना त्या हास्याचंही मोजमाप करण्यासाठी एक यंत्रच बनवण्याचा अव्यापारेषु व्यापार करण्याची गरज भासली असावी. वास्तविक काही वर्षांपूर्वी जेव्हा विनोदाच्या अंगाची चाचपणी करण्यासाठी एक जागतिक प्रयोग इंटरनेटवरून केला गेला, तेव्हा जपानी मंडळींना हसवणं महामुष्किल असल्याचं उघडकीस आलं होतं. तेव्हा ज्यांच्या ओठाची महिरप विस्कटतही नाही अशा मंडळींनी हा उद्योग करावा हाच खरं तर मोठा विनोद आहे. पण हसणं हे एक प्रभावी औषध असल्याचं ध्यानात आल्यानंतर ते किती रामबाण आहे, याचं मोजमाप करण्याची गरज निर्माण झाली होती. म्हणूनच कन्साई विद्यापीठातील जपानी वैज्ञानिकांनी ती लाफोमीटर बनवण्याची मोहीम हाती घेतली.

आपण जेव्हा हसतो तेव्हा आपला चेहरा, छाती आणि उदरभाग इथले स्नायू कार्यरत होतात. छाती आणि पोट यांच्यामध्ये जो पडदा असतो तो तर चांगलाच हदकळतो. या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणापायी विद्युतस्पंदन निर्माण होतात. त्याला बायोइलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं. तर या जपानी मंडळींनी ती विद्युतधारा मोजण्यासाठी काही संवेदक या स्नायूंना जोडून दिले. हसतानाच्या एका सेकंदात तब्बल तीन हजारवेळा ही विद्युतधारा मोजण्याची सोय त्या यंत्रात केली होती.

एखादा पदार्थ आम्ल आहे की अल्कली आहे हे मोजण्यासाठी पीएच (स्र्ऌ) या एककाचा वापर केला जातो. त्याचंच शेपूट पकडून हसण्याच्या या मोजपट्टीला त्यांनी एएच असं नाव दिलं आहे. अगदी खरंखुरं खळखळाट करणारं हसू सर्वसाधारणपणे ५ एएच इतकं असतं. पण एखाद्याचा पीजे ऐकून तो नाउमेद होऊ नये म्हणून आणलेलं खोटंखोटं हसू शून्य एएचच्या वर जायला तयार नसतं. हसण्याचं औषध किती परिणामकारक आहे याचं निदान करण्यासाठी या मोजपट्टीचा वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त  केली असली, तरी आपण हास्याचे मजले किती हे निश्चित आकडेवारीत सांगता येण्यासाठी ती वापरायला काय हरकत आहे?

-डॉ. बाळ फोंडके

 

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

रवीन्द्र केळेकर- साहित्य

केळेकरांनी अधिकतर गद्यलेखनच केले असून, सुमारे ७० पुस्तके प्रकाशित झाली असून, यापैकी अर्धी कोकणी भाषेत, तर अर्धी हिन्दी, मराठी, गुजराती, इंग्रजी भाषेतील आहेत. १९५५ मध्ये त्यांचे कोंकणी भाषेतील पहिले पुस्तक ‘सत्याग्रह’ व ‘अशें  गांधींजी’ (१९६०) ही गांधी विचारांबद्दलची पुस्तके आहेत. गांधी आणि काकासाहेब कालेलकर या दोघांची जीवनचरित्रे हिन्दी भाषेतून लिहिलेली खूप गाजली. गांधीचरित्राने तर विक्रीचे विक्रम केले आहेत. ‘वेळे वयल्यो घुलो’ हे त्यांचे रोजनिशीवर आधारित पुस्तक म्हणजे कोंकणी साहित्यातील पहिली रोजनिशी म्हणता येईल. ‘पांथस्थ’ व ‘सर्जकाची आंतरकथा’ या आत्मकथेच्या वाटेने जाणाऱ्या दोन संग्रहात त्यांच्यातील ललित लेखक सर्वार्थाने फुलून येतो. ‘सर्जकाची आंतरकथा’मध्ये त्यांनी ‘स्वशोध’ घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मी का लिहितो? कोणाकरता लिहितो? कोणामुळे लिहितो? कसं लिहितो? माझ्यावर नक्की केव्हा, कोणाचा, कसा-कसा प्रभाव पडला, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यात रवीन्द्रनाथ टागोर, राममनोहर लोहिया, विनोबा, शंकराचार्य , पंडित जवाहरलाल नेहरू, खलिल जिब्रान, बा. भ. बोरकर, कालेलकर इ. विषयी ज्या ज्या आठवणी जशा-जशा लहानपणापासून ते आतापर्यंत आठवल्या त्याविषयी लिहिले आहे. ‘सांगाती’मध्ये जीवनात केलेली चिंतने वाचकांसमोर मांडली आहेत. ‘ओथांबे’, ‘आशिक कुशीक’मध्ये लेखकाला जीवनात भेटलेल्या व्यक्ती, पुस्तकांचे विश्व यावर लिहिलेले आहे. जीवनातील सत्य कुणाचीही पर्वा न करता सडेतोडपणे ते मांडत असत. सामाजिक जीवनातील घडणाऱ्या घटनांवर, बदलत्या मानसिकतेवर ते आग्रहाने मते मांडत असत. तसेच, जाती व्यवस्थेतील गुणदोष, स्त्रीमुक्ती, शिक्षणव्यवस्थेतील गुणदोष, आधुनिक शिक्षणपद्धती, इंग्रजीची गरज, भाषेच्या विकासाची गरज, गोव्याचे औद्योगिकीकरण व विकासाचे मार्ग, भारतातील विविधता, सध्याचे नेतृत्व, लहानांच्या, तरुणांच्या, वृद्धांच्या समस्या अशा अनेक विषयांवर केळेकरांनी विपुल लेखन केले आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 2:57 am

Web Title: articles in marathi on measuring laughter
Next Stories
1 रवींद्र केळेकर- कोकणी (२००६)
2 कुतूहल : रागाचा पारा
3 कुतूहल : लाज वाटे..!
Just Now!
X