17 December 2017

News Flash

आक्रमित अंतर दर्शक

वाहनात चालकाच्या समोरच्या दर्शकफलकावर (डॅशबोर्ड) गतिमापक बसवलेला असतो.

लोकसत्ता टीम | Updated: October 12, 2017 4:15 AM

वाहनात चालकाच्या समोरच्या दर्शकफलकावर (डॅशबोर्ड) गतिमापक बसवलेला असतो. या गतिमापकातच आणखी एक दर्शक दिसतो. हा दर्शक आपले वाहन या क्षणापर्यंत किती अंतर चालले आहे,  ते किलोमीटरमध्ये दर्शवितो.

यांत्रिक पद्धतीने चालणाऱ्या या आक्रमित अंतर दर्शकाची (Odometer) रचना संपूर्णपणे दंतचक्रांवर म्हणजेच गिअरवर आधारित असते. गाडीच्या अक्षाने एक आवर्तन पूर्ण केले म्हणजेच तो एकदा पूर्ण गोल फिरला की गाडी किती पुढे जाणार हे चाकाच्या व्यासावर अवलंबून असते. जेवढा चाकाचा व्यास जास्त, तेवढे पार केलेले अंतर जास्त. त्यामुळे चाकाच्या व्यासानुसार या दर्शकाच्या दंतचक्रांचे गुणोत्तर ठरलेले असते.

तीन भ्रमी दंतचक्रांच्या (वर्म गिअर) मालिकेच्या साहायाने हे आक्रमित अंतर दाखवले जाते. यासाठी दर्शक फलकापासून चाकाच्या अक्षापर्यंत पोहोचणारी घट्ट स्प्रिंगच्या रूपात असलेली लवचीक तार वापरलेली असते. चाकाच्या व्यासावर असलेले एक छोटे दंतचक्र या तारेला तिच्या अक्षाभोवती फिरवते. तारेचे दुसरे टोक दर्शकफलकावर असलेल्या आक्रमित अंतर दर्शकाच्या अक्षाला जोडलेले असते. दंतचक्रांचे गुणोत्तर असे ठेवलेले असते की, गाडी एक किलोमीटर अंतर चालल्यानंतर दर्शकावरची सर्वात उजव्या बाजूची तबकडी एक अंक पुढे फिरविली जाते. असे दहा अंक फिरल्यानंतर त्याच्या शेजारची डाव्या बाजूची तबकडी एक अंक पुढे जाते आणि ही अशीच प्रक्रिया डावीकडच्या सर्वात शेवटच्या तबकडीपर्यंत चालू राहते आणि वाहन किती अंतर चालले आहे. ते आपल्याला दिसत राहते. (दुचाकी वाहनात सर्वात उजव्या तबकडीवरचा अंक वाहन एक किलोमीटर ऐवजी १/१० किलोमीटर म्हणजे शंभर मीटर चालल्यानंतर पुढे सरकतो).

आजकालच्या वाहनांमध्ये अशा यांत्रिक आक्रमित-अंतर दर्शकाच्या ऐवजी संगणकावर आधारित दर्शक असतो. यामध्ये दंतचक्रांची यंत्रणा नसते. यामध्ये गाडीच्या अक्षाबरोबर फिरणारे दातेरी चक्र असते आणि त्यासमोर एक स्थिर चुंबक बसवलेला असतो. फिरताना चक्राचा प्रत्येक दात जेव्हा चुंबकासमोरून जातो तेव्हा एक विद्युतस्पंद निर्माण होतो. हे विद्युतस्पंद संगणकाला पुरवले जातात. त्यापासून गणित करून गाडी किती अंतर चालली हे दर्शकफलकावर एका छोटय़ाशा पडद्यावर दाखवले जाते. काही वाहनांमध्ये चुंबकाच्याऐवजी दातेरी चक्र आणि प्रकाश संवेदकाचा वापर केलेला असतो. अशा या संगणकीकृत आक्रमित अंतर दर्शकामध्ये एका फेरीत किती किलोमीटर अंतर काटले गेले हेसुद्धा दर्शवले जाऊ शकते.

शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

 

डी. जयकान्तन  (२००२)

तामिळ साहित्यातील अग्रणी कथा, कादंबरी, पटकथालेखक, पत्रकार, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते- तसेच प्रभावी वक्ते, दण्डपाणी जयकान्तन यांना भारतीय साहित्यातील १९८२-२००१ या कालावधीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी २००२चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जयकान्तन यांचा जन्म २४ एप्रिल १९३४ रोजी तामिळनाडूतील दक्षिण अरकोट जिल्ह्य़ातील कुड्डल्लूर या गावी झाला. १३व्या वर्षीच शाळा अर्ध्यावर सोडून, वामपंथी शिबिरामध्ये  जयकान्तन यांनी मानवाच्या उन्नतीसाठी जी आदर्श वाट निवडली होती, त्यावरून चालताना ते इतके ठाम राहिले की, वादळवाऱ्यातही त्यांनी आपल्या ध्येयाला आणि आदर्शाना कधी तिलांजली दिली नाही.  मानवाच्या विजयाची त्यांना प्रचंड आस्था होती. तामिळ समाजातील विभिन्न वर्गाचे प्रतिनिधित्व करताना लाखो वाचकांचे आराध्य दैवत असूनही जयकान्तन सामान्य माणसासारखेच राहत. आपल्या साहित्यातून त्यांनी झोपडपट्टीतील सामान्य माणसांची सुख-दु:खे, समस्या जाणून घेतल्या. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. तामिळ जनतेमध्ये जे. के. नावाने प्रसिद्ध असलेले जयकान्तन लेखकांचे लेखक तर होतेच, पण जनतेचे लेखकही होते.

द्राविडियन चळवळीच्या ते विरोधात होते. पण राजकीय नेत्यांनी त्यांच्या विरोधात काही केले नाही. नेहरूप्रणीत समाजवाद त्यांना आवडत होता व त्यांना इंदिरा गांधी यांच्याविषयी आदर होता. नंतर ते तामिळ देशीय काटची या ए.व्ही.के. संपथ यांच्या पक्षात गेले. तर सरतेशेवटी काँग्रेसवासी झाले. काँग्रेसचे ‘नवशक्ती’ नावाचे त्या काळचे वृत्तपत्र ते संपादित करीत असत. समाजातील सत्यावर बोट ठेवताना प्रवाहाविरुद्ध जाण्याची पर्वा त्यांनी कधीही केली नाही. प्रत्येक माध्यमातून सडेतोडपणे आपली मते मांडली. ज्या नियतकालिकातून त्यांच्या कथा छापल्या जात त्यांच्याविरुद्धचा सात्त्विक संताप ते मंचावरून व्यक्त करीत असत. कोणात्याही विषयावर आपली प्रतिक्रिया स्पष्ट शब्दात, तर्कपूर्ण ढंगाने, धाडसाने, खुलेपणाने व्यक्त करीत असत. हलक्या दर्जाची आवड असणाऱ्यांना त्यांच्या मनात कोणतेही स्थान नव्हते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on October 12, 2017 4:15 am

Web Title: articles in marathi on odometer