ओले रूमर हे खरे तर डॅनिश खगोलशास्त्रज्ञ. आपली खगोलीय साधने आणि उपकरणे यांच्यावर तापमानाचा काय परिणाम होतो, हे तपासण्याकरता, त्यांनी १७०१ मध्ये, दोन स्थिर बिंदूंचा उपयोग करून पाऱ्याची पहिली प्रमाणित मापनश्रेणी विकसित केली. म्हणूनच ‘रूमर मापनश्रेणी’ला ऐतिहासिक महत्त्व आहे.

ओले ख्रिस्टीनसन रूमर यांचा जन्म १६४४ मध्ये झाला. कोपनहेगन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी थॉमस आणि रासमुस बार्थोलिन ह्य़ा मार्गदर्शकांबरोबर पाच-सहा वर्षे काम केले. त्यानंतर १६७१ मध्ये ते कोपनहेगनजवळच्या बेटावरील वेधशाळेमध्ये रुजू झाले.

फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जीन पीकार्ड यांना साहाय्य करता करता त्यांच्याबरोबर पॅरिसला आले. पॅरिसच्या १४व्या लुईने त्यांच्यावर आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सोपवली. तसेच व्हर्सायच्या राजवाडय़ातील नेत्रदीपक कारंजी उभारण्याच्या कामातही त्यांचा सहभाग होता. १६७२ मध्ये ‘फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’चे पहिले विदेशीय सभासदत्व त्यांना बहाल करण्यात आले.

१६७७च्या सुमारास त्यांनी कोपनहेगन युनिव्हर्सिटीमध्ये खगोलशास्त्रीय अध्यापन सुरू केले. खगोलशास्त्रीय निरीक्षण आणि संशोधनासाठी लागणारी वेगवेगळी उपकरणे विकसित केली. त्याविषयी भरपूर नोंदीही केल्या. परंतु दुर्दैवाने १७२८ मध्ये, कोपनहेगनमधल्या कुप्रसिद्ध आगीत त्यांचे सर्व लिखाण भस्मसात झाले. १६८३ साली डेन्मार्कमध्ये, राष्ट्रीय पातळीवर पहिली वजने आणि मापे त्यांनी सुरू केली. लांबी व आकारमान मोजण्यासाठी त्यांनी तयार करून घेतलेली मानके Standard एकदम अचूक होती. एवढेच नव्हे तर स्थळकाळाच्या पलीकडे जाऊन खगोलशास्त्रीय स्थिरांक आणि घडय़ाळाचा लंबक यांच्या साहाय्याने लांबी व आकारमानाचे मापन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ताऱ्यांचे स्थान मोजण्यासाठी आवश्यक साधनांची निर्मिती केली. रूमर यांच्या खगोलीय निरीक्षणांमुळेच पुढे प्रकाशाच्या वेगाची गणना करणे सोपे गेले.

रूमर हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. कोपनहेगन शहराच्या जडणघडणीत त्यांचे योगदान वादातीत आहे. रस्त्यावरील दिवे (तेलाचे) सर्वप्रथम त्यांनीच सुरू केले. शहराचे पोलीसप्रमुख  म्हणूनही त्यांनी कारभार सांभाळला. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण पद्धतीत सुधारणा केली. घरबांधणीचे नवीन नियम तयार केले.

ओले रूमर यांच्या योगदानाची दखल म्हणून डेन्मार्कमध्ये चलनी नोटांवर त्यांचे चित्र आहे. काही रस्ते, टेकडी तसेच एका वेधशाळेलाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.

अनुपमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

राजेंद्र शाह यांची काव्यसंपदा

प्रतिभावंत, समृद्ध भावविश्वाचा कवी म्हणून राजेंद्र शाह यांना अर्वाचीन गुजराती कवितेत मानाचे स्थान आहे. विल्सन कॉलेजात शिकत असताना कॉलेज-नियतकालिकात १९३३ मध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. विविध मासिकांतून अनेक वर्षे त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. सुमारे १८ वर्षांनी १९५१ मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह ‘ध्वनी’ प्रकाशित झाला आणि गुजराती साहित्य विश्व ढवळून निघाले. या संग्रहाला युगांतरकारी म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर ‘आंदोलन’ (१९५२), ‘श्रुती’ (१९५७), ‘क्षण जे चिरंतन’ (१९६८), ‘मध्यमा’ (१९७८), ‘पत्रलेख’ (१९८१), ‘पंचकर्म’ (१९८३), ‘अनामिक’ (१९८७), ‘अरण्यक’ (१९९२) असे २४ काव्यसंग्रह आणि गीतसंग्रह प्रकाशित झाले . दोन बालकविता संग्रह व काही इंग्रजी, बंगाली, संस्कृत कवितांचे अनुवादही प्रसिद्ध आहेत. १९५७ मध्ये त्यांनी ‘कवी लोक’ हे  गुजराती मासिक सुरू केले.

निसर्गसौंदर्य, प्रेम, ईश्वर हे त्यांच्या काव्य लेखनाचे खास विषय. शिवाय सामाजिक, कोळी लोकांचे आयुष्य, आधुनिक जीवनस्वरूप, राजकारण, ग्रामीण जीवनातील सौंदर्य या साऱ्यांचे सुरेख दर्शन त्यांच्या काव्यात दिसते. सौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय अनेकाविध रूपात दिसतो. पण गीत आणि सुनीतसदृश काव्यरूप आणि छंदोबद्ध दीर्घ काव्यरचना ही त्यांची खास वैशिष्टय़े. एकीकडे अशा प्रकारच्या संस्कृत वृत्तातील छंदोबद्ध रचना केल्या; तशाच त्यांनी ओठावर रेंगाळणाऱ्या गीत रचनाही केल्या. गेयता हा त्यांच्या काव्यरचनेचा प्रमुख गुण आहे.

राजेंद्र शाह यांची मूळ कविप्रकृती विद्रोही असली, तरी त्यांच्या विद्रोहात हळुवारपणे दृढता व्यक्त झालेली दिसते. गांधी युगाच्या प्रभावामुळे, कोमलतेतून दृढता व्यक्त करण्याची त्यांची खास शैली आहे. ‘निरुद्देश्य’ या कवितेत ते म्हणतात -‘नही किसी का लिया पंथ मैं चलकर राह बनाऊँ’ हा त्यांच्या कवितेचा स्वैर अनुवाद असला, तरी त्यांच्या कवितेला एक गुजराती लय आहे. केवळ आपल्या पूर्वीच्या गुजराती कवितेपासूनच नव्हे तर भारतीय कवितेपासून त्यांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या गीतरचनेतही लयबद्धतेतील वैविध्य पाहिल्यावर जाणवतं, की त्यांनी राजस्थान ते बंगालच्या लोकगीतांची लयदेखील समजून घेतली आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com