12 December 2017

News Flash

तापमान मापनाचा इतिहास – १

लोहयुगाच्याही आधीपासून ‘अग्नी’ गरम आणि ‘बर्फ’ थंड आहे  याची मानवाला जाण होती.

लोकसत्ता टीम | Updated: October 2, 2017 4:36 AM

लोहयुगाच्याही आधीपासून ‘अग्नी’ गरम आणि ‘बर्फ’ थंड आहे  याची मानवाला जाण होती. किंबहुना गरम किंवा थंड या मानवाच्या मूलभूत जाणिवा. परंतु तापमानाचे मापन करणारे उपकरण शोधणे, हे एक आव्हानच होते. तापमान या मूलभूत राशीचे मापन तुलनात्मक केले जाते. बऱ्याच वेळा ते वस्तूतील उष्णता ऊर्जेच्या अस्तित्वाशी निगडित असते. पाण्याला उष्णता ऊर्जा दिली की ते गरम होते. गरम पाण्याचे तापमान थंड पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एखाद्या पदार्थावर किंवा वस्तूवर होणाऱ्या उष्णता ऊर्जेच्या परिणामाचा अभ्यास, निरीक्षण करून अप्रत्यक्ष रीतीने तापमानाचे मोजमाप केले जाते.

जगातले सर्वात आधी तापमान मापन कोणी आणि कुठे केले याबद्दल ठोस पुरावा उपलब्ध नाही. इसवीसनाच्या पहिल्या शतकात ‘हेरॉन ऑफ अलेक्झांड्रिया’ या ग्रीक गणितज्ञ तंत्रज्ञाने केलेल्या अनेक प्रयोगांनी हे सिद्ध केले की, हवेला गरम केले असता ती प्रसरण पावते व ती थंड झाली की आकुंचन पावते.

दुसऱ्या शतकात ‘गॅलेन’ यांनी पाण्याचा उत्कलन बिंदू आणि बर्फाचा द्रवणांक यांच्या आधाराने तापमानाचे तुलनात्मक मोजमाप केल्याचे इतिहास सांगतो. परंतु मध्ययुग संपेपर्यंत त्यात फारशी प्रगती झाल्याचे दिसत नाही.

१६व्या शतकाच्या शेवटी संशोधकांनी काटा किंवा मापनश्रेणी नसलेला तापमापक बनवला खरा, परंतु हा तापमापक प्रामुख्याने तापमानातील फक्त फरक दर्शवत होता. म्हणजे वस्तू कमी गरम की जास्त थंड आहे हे कळत असे; पण एखाद्या एककात तापमानाचे अचूक मापन करता येत नव्हते. ‘गॅलिलिओ गॅलिली’ यांनी या तापमापकामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. तापमानातील बदल दर्शवणारी उपकरणे त्यांनी तयार केली. तापमानातील बदल दर्शवणारी ही उपकरणे थर्मोस्कोप नावाने ओळखली जात.

मापनपट्टी असलेले पहिले तापमापक, १६१२ साली इटालियन शास्त्रज्ञ ‘सँटेरिओ सँटोरी’ यांनी बनवले.  पेशाने डॉक्टर असलेल्या या शास्त्रज्ञाने अचूक रोगनिदान करण्यासाठी शरीराचे तापमान मोजण्याचे महत्त्व जाणले होते. त्यांनी एका काचेच्या नळीत काही द्रव बंदिस्त केला. ही नळी गरम केली की आतील द्रव प्रसरण पावे आणि नळीमध्ये वर सरके. या नळीशेजारी त्यांनी मापनपट्टी लावली. नळीतील द्रवाच्या उंचीच्या निरीक्षणावरून तापमान किती कमी किंवा किती जास्त झाले, हे कळू लागले.

-अनुपमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

डॉ. इंदिरा गोस्वामी – कादंबरीलेखन

आपल्या कादंबऱ्यांसाठी इंदिराजींनी नेहमी अनुभवलेले विषयच निवडले. रामायणाच्या अभ्यासानिमित्त त्या वृंदावनात राहिल्या होत्या. या वास्तव्यात धर्मस्थळांच्या ठिकाणी चालणारे गैरप्रकार, स्त्रियांवर, विशेषत: विधवा स्त्रिया – राधेश्यामीवर होणारे अत्याचार, धर्माच्या, परंपरांच्या नावाखाली स्त्रीचे होणारे शोषण त्यांनी पाहिले आणि त्याबद्दल आपले परखड मत व्यक्त करणारी ‘नीलकण्ठी ब्रज’ ही त्यांची पहिली कादंबरी १९७२ मध्ये प्रकाशित झाली.

त्यानंतर १९७२ मध्ये ‘चिनाबार स्रोत’, ‘अहिरनं’ (१९८०), ‘मामरे धारा तरोवाल’ (१९८०), ‘दाताल हातीर उने खोवा हावदा’ (१९८०), ‘छिन्नमस्ता’ (२०००) इ. कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या.

‘अहिरन’ कादंबरीत मध्य प्रदेशातील अहिरन नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या पाश्र्वभूमीवरील आहे, तर उत्तर प्रदेशातील रायबरेलीजवळील ‘सुईना’ नदीवर होणाऱ्या पुलाच्या पाश्र्वभूमीवरील कादंबरी आहेत. मात्र ‘मामरे धारा तरोवाल’ (गंजलेली तलवार) – या कादंबरीला १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. यामध्ये एक चलाख मजूर नेता आणि गरीब मजूर यांच्यामध्ये झालेल्या संघर्षांचे चित्रण आहे. ही कादंबरी लिहिण्यासाठी लेखिका सहा महिने ग्रामीण भागात जाऊन राहिली होती. जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीच्या काठी राहून अनुभवलेल्या दिवसांवर ‘चिनाबार स्रोत’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. एकूणच या सगळ्या बांधकाम प्रकल्पावरील मजुरांची भयावह स्थिती, संघटना नसल्याने होणारी पिळवणूक इ.चे हृदयस्पर्शी चित्रण या कादंबऱ्यांत आहे.

‘तेज आरु धुलि धुसदिन पृष्ठ’  ही कादंबरी १९८४ च्या दंगलीवर आधारित असून, लेखिका या दंग्याची प्रत्यक्षदर्शी आहे. ‘दाताल हातीर उने खोवा हावदा’ या कादंबरीला साहित्य अकादमीने ‘क्लासिक’ कादंबरीचा दर्जा दिला आहे. यावर आसामी भाषेत एक चित्रपटही निघाला असून, त्याला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आसाममधील वैष्णव आश्रमातील अनेक गैरप्रकार इंदिराजींनी यात शब्दबद्ध केले आहेत. यात आसाममधील मठ परंपरेची कथा सांगितली असून हौद्याला मठरूपी हत्तीच्या ऱ्हासाचे प्रतीक बनवले आहे. इंदिराजींच्या ‘छिन्नमस्ता’ या कादंबरीत कामाख्य मंदिरातील पशुबळी प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on October 2, 2017 4:36 am

Web Title: articles in marathi on temperature measurement