14 December 2017

News Flash

वाहनाचा गतिमापक

 जेव्हा वाहनाचा अक्ष फिरतो तेव्हा त्याबरोबर गतिमापक तारही फिरते आणि त्याला जोडलेला चुंबकही  फिरतो.

लोकसत्ता टीम | Updated: October 13, 2017 3:01 AM

दुचाकी किंवा चारचाकी तसेच त्याहूनही अधिक चाकांच्या स्वयंचलित वाहनांचा वेग मोजण्यासाठी गतिमापक या साधनाचा उपयोग केला जातो. वाहनाच्या अक्षावर बसवलेल्या यंत्रणेच्या साहाय्याने एक लवचीक तार बसवली जाते. या तारेच्या दुसऱ्या टोकाला एक चुंबक बसवलेला असतो. तार फिरली की हा चुंबकही फिरतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे या चुंबकाच्या भोवती अल्युमिनियमसारख्या धातूचे एक पसरट भांडे असते. त्याला गतीकप म्हणतात. या गतीकपाच्या दुसऱ्या टोकाला एक काटा बसवलेला असतो जो तबकडीवर आपल्याला वेग दर्शवतो. गतीकपाला एक स्प्रिंग जोडलेली असते.

जेव्हा वाहनाचा अक्ष फिरतो तेव्हा त्याबरोबर गतिमापक तारही फिरते आणि त्याला जोडलेला चुंबकही  फिरतो. फिरणाऱ्या चुंबकामुळे एक फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि या फिरत्या चुंबकीय क्षेत्रामुळे गतीकपात आवर्त प्रवाह (एडी करंट) निर्माण होतो. या आवर्ती प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिपीडक परिबलामुळे (टर्शनल मोमेंट) हा गतीकप त्याच्या अक्षाभोवती किंचित फिरतो. कप फिरल्याने त्याला जोडलेला काटाही फिरतो आणि तबकडीवर आपल्याला वाहनाची गती किती आहे ते दिसते. वाहनाचा अक्ष फिरायचा थांबला की चुंबक फिरायचा थांबतो आणि कपावरील परिबल शून्य होते. अशा परिस्थितीत कपाच्या अक्षाला जोडलेली स्प्रिंग काटा पुन्हा मूळपदाला आणते आणि आपल्याला वाहनाची गती शून्य दिसते.

गतीकपाचे त्याच्या अक्षाभोवती होणारे विचलन हे वाहनाच्या अक्षाच्या फिरण्याच्या समप्रमाणात होते आणि आपल्याला वाहनाची गती बरोबर दर्शविली जाते. या गतीमापकाच्या तबकडीचे इयत्तीकरण (कॅलिब्रेशन) चाकाला लावलेल्या टायरच्या व्यासानुसार केले जाते. आपल्याला जर गतिमापन अचूक हवे असेल तर त्यासाठी त्या वाहनासाठी प्रमाणित असलेलेच टायर वापरायला हवेत आणि त्यात हवेचा योग्य तोच दाब ठेवायला हवा.

सन १९१० पासून प्रत्येक वाहनामध्ये हे गतिमापक बसवले गेले. गाडी किती वेगाने चालली आहे हे चालकाला दाखवणारे, वेगमर्यादेच्या आत गाडीचा वेग ठेवून सुरक्षित प्रवासाला मदत करणारे हे उपकरण आता नवीन इलेक्ट्रॉनिक अवतारातसुद्धा मिळू लागले आहे.

शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

डी. जयकान्तन (साहित्य, सन्मान)

शालेय शिक्षण अध्र्यावर सोडून, जयकान्तन भारती कम्युनिस्ट पक्षात जाण्यासाठी चेन्नईला आले. तेथे त्यांच्यावर कम्युनिस्ट लेखकांचा प्रभाव पडला. त्यातून त्यांनी कम्युनिस्ट नियतकालिकांसाठी लेखन सुरू केले.

‘सोवाबारियावथी’ या नियतकालिकात त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. १९५० च्या दशकात त्यांच्या कथा असलेल्या साप्ताहिकाची वाचक आतुरतेने वाट पाहत असत. १९६० च्या सुमारास ते ‘आनंदविकटन’ या साप्ताहिकात लिहीत होते. समाजातील वंचित वर्गाच्या व्यथा मांडणारे त्यांचे लेखन वाचकप्रिय होते. ‘तामिळ लेखकांच्या विचार करण्याच्या पद्धतीतच त्यांनी बदल घडवला,’ असे श्रीलंकेचे समीक्षक के. शिवथंबी यांनी मत व्यक्त केले आहे. जयकान्तन यांच्या भाषेने तमिळ भाषेला समृद्ध केले, ज्या विषयावर कधी कुणी लिहिले नाही, ते त्यांनी हाताळले, हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़.

आतापर्यंत त्यांच्या ४० कादंबऱ्या, जवळपास २०० कथा आणि १५ निबंध संग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘सिला नेरंगलील मनिथरगल’ ही त्यांची गाजलेली कादंबरी. त्यांच्या दहा साहित्यकृतींवर आधारित चित्रपट तयार झाले. तसेच तीन साहित्यकृती छोटय़ा पडद्यावर आल्या आहेत. दोन चित्रपटांचे ते निर्माते होते.  ‘उदयम’, ‘युगसंधी’, ‘देवन वरुवरा’, ‘जयकान्तन शिक्षकदैग’ इ. त्यांचे प्रमुख कथासंग्रह असून, ‘केविलुंग’, ‘प्रत्ययम’, ‘रिपीमूलम’ इ. प्रमुख लघुकादंबऱ्या व ‘उन्नैष्णोल’, ‘ओरू मानिरन’, ‘महायज्ञम’,   ‘जय जय शंकर’, ‘औरूवन’ इ. त्यांच्या प्रमुख कादंबऱ्या आहेत.

जनतेच्या या लाडक्या लेखकाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९७२- साहित्य अकादमी पुरस्कार, १९७८- तामिळनाडू सरकारचा उत्तम कथा पुरस्कार, १९७८- सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, १९८६- तामिळनाडू सरकारचा उत्तम कादंबरी पुरस्कार, १९८६- तामिळ विश्वविद्यालयाचा राजराजन पुरस्कार, १९८८-भारतीय भाषा परिषद पुरस्कार, २००२- ज्ञानपीठ पुरस्कार, २०११- रशियन ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप, १९७९- तामिळनाडू सरकारचा श्रेष्ठ तमिळ चित्रपट पुरस्कार, २००९- पद्मश्री.

२००२ चा ज्ञानपीठ पुरस्कार जयकान्तना जाहीर झाला. त्या वेळी ते खूप आजारी असल्याने फारसे काही बोलू शकले नाहीत. त्या वेळी ते म्हणाले, ‘हा मान तमिळ भाषेला दिला जातोय आणि मी केवळ निमित्तमात्र आलेलो आहे.. ’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on October 13, 2017 3:01 am

Web Title: articles in marathi on vehicle speedometer