02 July 2020

News Flash

कुतूहल – सीता अशोक

मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो.

बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक.
मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो. साराका असोका (पूर्वीचं साराका इंडिका) हे शास्त्रीय नाव असलेली ही वनस्पती सिसालपिनेसी म्हणजे गुलमोहोराच्या उपकुळातली आहे. भारतात अशोक, रक्तअशोक, रक्तपल्लव या नावांनी हा वृक्ष ओळखला जातो.
हिंदू-बौद्ध धर्मात अशोक वृक्ष पवित्र मानला जातो. अशोकाच्या सुंदरतेची आणि औषधी गुणधर्माची अनेक वर्णने संस्कृत श्लोकांमधून केलेली असली, तरी हे झाड तितकंसं परिचित झालेले दिसत नाही. साधारण ९-१० मीटर इतकी उंची असलेल्या अशोक वृक्षाचे खोड धुरकट तपकिरी रंगाचे असते. पसरलेल्या फांद्यांमुळे आणि दाट पर्णसंभारामुळे तो लहानसा पण सुडौल दिसतो. अशोक वृक्षाचा पानांचा बहरही देखणा असतो. पाने संयुक्त असून गर्द हिरव्या पर्णिका साधारण आंब्याच्या पानांसारख्या दिसतात. कोवळ्या असताना लालसर रंगाच्या लोंबत्या पर्णिका आतिशय सुंदर दिसतात. आदिवासी बायका त्या आवडीने केसात माळतात.
अशोकाचे खरे वैभव म्हणजे त्याची फुले. फुलांचा बहर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येतो. हा बहर विशेषच असतो. मंद सुगंधी फूल चार गोलाकार पाकळ्यांचे असून लांब-लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर आलेले असतात. फुले उमलताना पिवळ्या रंगाची, मग केशरी आणि शेवटी गडद नािरगी-लाल रंगाची होतात. एकाच गुच्छात या सर्व छटांची फुले दिसतात. झाडाच्या खोडाला अगदी जमिनीलगतच्या बुंध्यापासून ते फांद्यांवर, शेंडय़ापर्यंत हळदीकुंकवाच्या रंगाच्या फुलांचे गुच्छ लगडतात. ते पाहणं म्हणजे विलक्षण नेत्रसुखच.
याचं आणखी वेगळेपण म्हणजे, संपूर्ण झाड फुलांनी लगडलेले असलं तरी लांबट आकाराच्या शेंगा मात्र पानांच्या टोकालाच लागतात. प्रत्येक शेंगेत साधारण ५-६ काळसर राखाडी बिया असतात. त्यातली एखादीच बी पक्व असते.
अशोक वृक्षाचे औषधी उपयोग अनेक आहेत. विशेषत: सालीचा उपयोग गर्भाशयाच्या विकारावर होत असल्याने या सालीला औषधनिर्मिती उद्योगाकडून मागणी आहे. फुलांचा उपयोग हगवण थांबवण्यासाठी करतात.
– चारुशीला जुईकर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

नगराख्यान – न्यूयॉर्क शहर प्रशासन
न्यूयॉर्क शहराचा जसजसा औद्योगिक आणि व्यापारी विकास होत गेला तशी लोकसंख्यावाढ होऊन मूलभूत नागरी सुविधांचीही आवश्यकता भासू लागली. १८११ साली न्यूयॉर्क शहरासाठी नगररचना आराखडा (कमिशनर्स प्लॅन) तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ब्रुकलीन शहर, मॅनहटन आणि आसपासचा काही प्रदेश जोडून त्याचे ग्रेटर न्यूयॉर्क तयार झाले. १९०४ आणि १९११ या दोन वर्षी न्यूयॉर्कमध्ये आगी लागून मोठी मनुष्यहानी झाली. १९०४ साली लागलेल्या आगीत एक हजार, तर १९११ साली १४६ माणसांचा बळी गेला. त्यानंतर न्यूयॉर्क शहर अग्निशामक दल स्थापन झाले, इमारतींना क्रमांक दिले गेले, कारखान्यांसाठी सुरक्षा नियम तयार केले गेले. १८९८ साली ब्रुकलीन, क्वीन्स, मॅनहटन, द ब्राँक्स आणि स्टेटन आयलँड या पाच बरोंमध्ये न्यूयॉर्क म्युनिसिपल कॉर्पोरेशनची प्रशासकीय विभागणी झाली. न्यूयॉर्क शहराचे प्रशासन न्यूयॉर्क सिटी चार्टरच्या नियंत्रणाने केले जाते. या प्रशासनाचा प्रमुख मेयर आणि त्याचे ५१ सदस्यांचे सल्लागार मंडळ आहे. मेयरची निवड मतदानातून चार वर्षांसाठी केली जाते. शहरात तीन शहर न्यायालये आणि न्यूयॉर्क स्टेटची तीन न्यायालये आहेत. प्रशासकीय व्यवस्थेसाठी न्यूयॉर्क स्टेटची विभागणी ६२ काऊंटींमध्ये झाली आहे. त्यापकी न्यूयॉर्क शहरात पाच काऊंटीज अंतर्भूत आहेत. २०१४ साली झालेल्या खानेसुमारीत न्यूयॉर्क शहराची लोकसंख्या ८५ लक्ष होती. न्यूयॉर्क शहराचे क्षेत्रफळ ७९० चौ.कि.मी. आहे. न्यूयॉर्क शहरांतर्गत वाहतुकीवर मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्टेशन अ‍ॅथॉरिटी (एमटीए) या सरकारी संस्थेचे नियंत्रण आहे. एमटीएतर्फे सबवे रेल्वे आणि बससेवा चालवली जाते. न्यूयॉर्क शहराचे वैशिष्टय़ म्हणजे इथे राहणाऱ्या नागरिकांपकी निम्म्याहून अधिक लोकांकडे स्वत:ची वाहने नाहीत, ते सार्वजनिक वाहनानेच प्रवास करतात. यातील अधिकतर प्रवासी सबवे रेल्वेने प्रवास पसंत करतात. रोज ४३ लक्ष प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एमटीए सबवेचे २६ मार्ग असून, १२८० किमी लांबीचे रेल्वेमार्ग आहेत. रोज चार लक्ष प्रवासी एमटीए बससेवेच्या ८१ मार्गावरून १२२८ बसगाडय़ांमधून प्रवास करतात.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 1:01 am

Web Title: ashoka tree
टॅग Navneet
Next Stories
1 न्यूयॉर्कची भरभराट
2 न्यूयॉर्क, अमेरिकेची राजधानी
3 न्यूयॉर्कची वसाहत
Just Now!
X