29 January 2020

News Flash

कुतूहल : डाल्टनचा अणू

१८०८ मध्ये डाल्टनचा अणुसिद्धांतावर लिहिलेला ‘ए न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी’ हा ग्रंथही प्रसिद्ध झाला.

जॉन डाल्टन (१७६६- १८४४)

जुन्या काळात अणूचे अस्तित्व हे फक्त वैचारिकदृष्टय़ा व्यक्त केले गेले होते. प्रयोगांतून काढलेल्या निष्कर्षांद्वारे अणूचे अस्तित्व दर्शवणारा पहिला संशोधक म्हणजे इंग्लंडचा जॉन डाल्टन! डाल्टनची अणूची कल्पना ही जोसेफ लुई-प्राउस्ट, गे-ल्युझ्ॉक आदींनी अठराशे सालाच्या आसपास केलेल्या रासायनिक अभिक्रियांच्या अभ्यासावर आधारलेली होती. खुद्द जॉन डाल्टननेही यासाठी अनेक प्रयोग केले. या सर्व प्रयोगांतून डाल्टनचा अणुसिद्धांत जन्माला आला. यातला एक प्रयोग म्हणजे गे-ल्युझ्ॉकने अभ्यासलेली नायट्रोजनच्या ऑक्साइडची निर्मिती. या निर्मितीत नायट्रोजनचे तीन वेगवेगळे ऑक्साइड तयार होतात. यातील एक ऑक्साइड बनण्यासाठी जितक्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो, त्या तुलनेत दुसऱ्या प्रकारचा ऑक्साइड बनण्यासाठी दुप्पट, तर तिसऱ्या प्रकारचा ऑक्साइड बनण्यासाठी चौपट प्रमाणात ऑक्सिजन लागतो. कार्बनचे ऑक्सिजनबरोबर संयुग होऊन त्याचेही दोन प्रकारचे ऑक्साइड तयार होतात. (आजच्या भाषेत कार्बन मोनोक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड.) यातील दुसऱ्या ऑक्साइडसाठी लागणारे ऑक्सिजनचे प्रमाण हे पहिल्या ऑक्साइडसाठी लागणाऱ्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे.

या प्रयोगांचे स्पष्टीकरण शोधताना, जॉन डाल्टनने एका निरीक्षणाचा आधार घेतला. सर्वच वायू पाण्यात सारख्या प्रमाणात विरघळत नाहीत. कार्बन डायऑक्साइड वायू हा नायट्रोजनपेक्षा पाण्यात अधिक प्रमाणात विरघळतो. यातून डाल्टनला सुचले की, वायू किती विरघळायला हवा- हे वायूतील कणांच्या वजनावर आणि स्वरूपावर अवलंबून असायला हवे. इथेच डाल्टनला अणूंच्या अस्तित्वाची जाणीव झाली. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रिया होताना त्यांचे प्रमाण किती हवे- हे त्या मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांच्या वजनानुसार ठरायला हवे. वजनामुळेच या कणांना स्वतचे अस्तित्व प्राप्त होते.

यावरूनच डाल्टनने आपला पाच मुद्दय़ांचा अणुसिद्धांत मांडला : ‘प्रत्येक पदार्थ हा अणूंपासून तयार झालेला असून, तो अणूपेक्षा अधिक विभागता येत नाही. एका ठरावीक मूलद्रव्याचे सर्व अणू सारखेच असतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू हे वेगवेगळ्या वजनाचे व वेगवेगळ्या आकारांचे असतात. संयुगे ही या अणूंच्या पूर्णाक संख्येच्या एकत्रित येण्यातून निर्माण होतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे संयुगांतील विविध अणूंची पुनर्रचना.’ जॉन डाल्टनचे हे निष्कर्ष ‘लिटररी अ‍ॅण्ड फिलॉसॉफिकल सोसायटी ऑफ मँचेस्टर’ने १८०५ साली प्रकाशित केले. त्यानंतर १८०८ मध्ये डाल्टनचा अणुसिद्धांतावर लिहिलेला ‘ए न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी’ हा ग्रंथही प्रसिद्ध झाला.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

 

First Published on August 16, 2019 4:23 am

Web Title: atomic theory by john dalton zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : भीती
2 कुतूहल – प्राचीन अणू
3 मेंदूशी मैत्री : स्पर्धाग्रस्त पालक
Just Now!
X