साध्या वाइंिडग मशीनमध्ये हाताने केल्या जाणाऱ्या क्रिया जसे पहिल्या बॉबीनचे सूत संपले की, नवीन बॉबीन लावणे, नवीन बॉबीनचे सूत आणि कोनवरील सूत जोडणे आणि मशीन पुन्हा सुरू करणे, कोन पूर्ण भरल्यावर तो कोन काढून तिथे रिकामा कोन बसवणे इत्यादी कामे स्वयंचलित मशीनमध्ये यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करून केली जातात.
एक िरग बॉबीन लावून ठेवण्याऐवजी चार ते पाच िरग बॉबीन राहतील अशी व्यवस्था स्वयंचलित मशीनवर केलेली असते. पहिल्या बॉबीनचे सूत संपले की, ती बॉबीन बाजूला करून दुसऱ्या बॉबीनचे सूत घेऊन जोडले जाते. सूत जोडण्यासाठी बारीक गाठी मारणारा नॉटर मशीनवर उपलब्ध असतो. सूत जोडण्याच्या दुसऱ्या पद्धतीत पहिल्या बॉबीनच्या सुताचे शेवटचे टोक आणि नवीन बॉबीनचे सुरुवातीचे टोक यांच्यावरील पीळ तात्पुरता थोडा कमी करून ही टोके एकमेकांना जोडली जातात. मग पुन्हा नेहमीचा पीळ सुताला देऊन मशीन चालू केली जाते. यामुळे सुताला एकसारखेपणा येतो.
त्याचप्रमाणे सुतामधील गुठळ्या, जाड गाठी यांचा शोध घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक क्लिअररचा वापर केला जातो. सेन्सरच्या साहाय्याने गाठ, गुठळी ओळखली जाते. त्या दोषाचे निराकरण करून यांत्रिक रचनेचा उपयोग करून सूत पुन्हा जोडले जाते. हे असे तयार झालेले सूत कमीत कमी दोष असलेले असते. याचा फायदा पुढील प्रक्रियेला होतोच, शिवाय यापासून विणले जाणारे कापडही दोषविरहित राहायला मदत होते. उत्पादनात वाढ होतेच, शिवाय सुताचा दर्जा चांगला मिळतो. हा फायदा बहुतांश सर्वच आधुनिक मशीनपासून मिळतो.
याखेरीज बनियन/टी शर्ट यांच्या गुंफाईसाठी (निटिंग) जे सूत वापरतात, त्याला मेण लावले जाते. त्यायोगे गुंफाई यंत्रावर घर्षण कमी होते. मेणाची (पॅराफिन वॅक्स) एक वडी सुताच्या मार्गामध्ये वाइंिडग मशीनवर लावलेली असते. ही वडी फिरत असते व एक पीन सुताला मेणावर काही सेकंद दाबून धरते, त्यामुळे सुताला मेण व्यवस्थित लागते. जेव्हा सूत विणाईकरिता वापरले जाणार असते त्या वेळी मेणाच्या वडीच्या जागी स्टीलच्या चकत्या लावल्या जातात. पूर्ण भरलेला कोनही यांत्रिक क्रियेद्वारे काढून तिथे रिकामा कोन बसवला जातो. या सर्वामुळे उत्पादनात वाढ होते, शिवाय दर्जाही चांगला मिळतो.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२