– सुनीत पोतनीस

१८१४ साली फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यामध्ये पॅरिस येथे झालेल्या तहान्वये सेशल्स द्वीपसमूहाचा ताबा ब्रिटिशांकडे आला. पुढे १९०३ मध्ये ब्रिटिशांनी सेशल्स ही त्यांची एक स्वतंत्र वसाहत (क्राऊन कॉलनी) असल्याचे जाहीर करून तशी व्यवस्था लावून दिली. ब्रिटिशांनी अनेक ठिकाणांहून गुलामांना मुक्त करून सेशल्समध्ये वसविले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणचे तडीपार केलेले राजकीय कैदी इथे आणले. त्यामुळे झांजिबार, इजिप्त, सायप्रस वगैरे ठिकाणचे राजकीय कैदी पुढे सेशल्समध्येच स्थायिक झाले. या कारणाने आजही सेशल्सच्या जनतेत वांशिक वैविध्य दिसून येते.

१९४८ साली ब्रिटिशांनी सेशल्सची वसाहत ब्रिटिश राजवटीपासून वेगळी काढून त्यांना दिलेल्या काही सवलती रद्द केल्या. ब्रिटिशांच्या या कृत्यामुळे सेशल्सच्या जनमानसात ब्रिटिशविरोधी मतप्रवाह निर्माण होऊन स्वातंत्र्याची मागणी करत काही राजकीय पक्षसंघटना बांधल्या गेल्या. या काळात युरोपियन राष्ट्रांच्या अनेक वसाहतींनी स्वातंत्र्य मिळवले होते. सेशल्समधील राजकीय पक्षांशी बोलणी करून ब्रिटिशांनी त्यांची सेशल्सची वसाहत बरखास्त करताना २६ जून १९७६ रोजी सेशल्स हा स्वतंत्र, स्वायत्त देश अस्तित्वात आल्याची घोषणा केली. त्याच दिवशी प्रजासत्ताक सेशल्स हा देश संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) या संघटनांचा सदस्य झाला. जेम्स मानचान हे प्रजासत्ताक सेशल्सचे पहिले अध्यक्ष झाले. परंतु एकच वर्षात या सरकारविरोधी उठाव होऊन अल्बर्ट रेन यांचे एकपक्षीय सरकार सत्तेवर आले. हे सरकार २००४ पर्यंत सर्व निवडणुका जिंकून सत्तेवर टिकून राहिले. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत सेशल्स नॅशनल पार्टीचे वेवेल रामकलावन हे विजयी झाले व सध्या त्यांचे सरकार कार्यरत आहे.

आफ्रिका खंडातील भक्कम अर्थव्यवस्था असलेल्या केवळ दोन देशांपैकी सेशल्स हा एक आहे. सेशल्सियन रुपया हे त्यांचे चलन. त्यांचे अर्थकारण प्रामुख्याने नारळ, व्हॅनिला, रताळी, दालचिनी ही शेती उत्पादने आणि मासे यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. एक लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या सेशल्समध्ये ९४ टक्के ख्रिस्तीधर्मीय लोक असून, तीन टक्के हिंदू आहेत. व्हिक्टोरिया हे या देशाचे राजधानीचे शहर. सांस्कृतिकदृष्ट्या फ्रेंच प्रभावाखाली असलेल्या या देशाच्या राजभाषा इंग्लिश आणि फ्रेंच आहेत.- सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com