ब्रिटिश वसाहत असलेल्या बहामाज बेटांवर दुसऱ्या महायुद्धानंतर लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण होऊन स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले. मोठमोठय़ा ऊसमळ्यांचे मालक हे आता राजकीय शक्ती म्हणून उदय पावले आणि त्यातून दोन राजकीय पक्ष तयार झाले. त्यापैकी प्रोग्रेसिव्ह लिबरल पार्टी हा बहुसंख्यांक आफ्रो-बहामियन लोकांचा, तर युनायटेड बहामियन हा ब्रिटिश-बहामियनांचा असे वंशवार पक्ष तयार झाले. लोकांच्या इच्छेला मान देऊन ब्रिटिश वसाहत सरकारने बहामाला अंतर्गत प्रशासकीय स्वायत्तता देऊन लिंडेन पिंडिलग यांची १९६८ मध्ये पंतप्रधानपदी नियुक्ती केली. पुढे १९७३ साली बहामाला पूर्ण स्वायत्तता देण्याच्या प्रश्नावरून ब्रिटिश संसदेत मतदान घेण्यात आले. तेथील हाऊस ऑफ लॉर्डसने स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने कौल दिल्यावर प्रिन्स चार्ल्स यांनी १० जुलै १९७३ रोजी बहामा द्वीपसमूहाला ब्रिटिश वसाहतीतून मुक्त करून पूर्ण स्वातंत्र्य देत असल्याचे जाहीर केले. स्वातंत्र्यानंतर या नवजात देशाला राष्ट्रकुल परिषदेचे सदस्यत्व देऊन ब्रिटिश महाराणीस औपचारिक राष्ट्रप्रमुखपद देण्यात आले. राणीचे प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलची नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीपासून बहामाजमध्ये एकलगृह संसदीय लोकतांत्रिक संवैधानिक राजेशाही पद्धतीची राजकीय व्यवस्था आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले ह्युबर्ट मिनीस हे सध्या बहामाजचे पंतप्रधान आहेत. नासाऊ हे या देशाच्या राजधानीचे शहर तेथील न्यू प्रोव्हिडन्स या प्रमुख बेटावर स्थित आहे.

अमेरिका खंडातील समृद्ध, श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या बहामाजची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी आहे ती प्रामुख्याने तेथील पर्यटन व्यवसायामुळे. इथले निळेशार समुद्रकिनारे आणि पर्यटनाच्या मूलभूत सुविधा युरोपियन पर्यटकांना आकर्षित करतात. या देशाला मिळणाऱ्या कृषिउत्पन्नात साखर, कांदा, संत्री, रताळी यांचा प्रमुख वाटा आहे. येथील चार लाख लोकसंख्येपैकी ९० टक्क्यांहून अधिक लोक आफ्रिकन कृष्णवर्णीय वंशाचे आणि पाच टक्के लोक श्वेतवर्णीय, युरोपीय वंशाचे आहेत. पैकी ७० टक्के लोक ख्रिस्ती असून, ज्यू, मुस्लीम, हिंदू या धर्माचेही लोक इथे राहतात. आणि इंग्लिश ही भाषा सर्वत्र बोलली जाते.

– सुनीत पोतनीस – sunitpotnis94@gmail.com