बाएफच्या प्रयत्नांमुळे आज वेगवेगळ्या राज्यांत सात हजारहून अधिक महिला स्वयंसहायता गटात काम करीत आहेत. महिलांचे श्रम कमी व्हावेत यासाठी त्यांना पिण्याच्या पाण्याची व जळणाची उपलब्धता, सुधारित चुली, त्याचे प्रशिक्षण यावर बाएफने भर दिला. स्वयंसहायता गटातील महिला छोटे-छोटे उद्योग यशस्वीपणे चालवितात. या गटांना कौशल्यवृद्धीसाठी गावपातळीवरच एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे.
विकास कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकांना सहभागी करून त्याची व्याप्ती कशी वाढविता येईल, या विचारातून बाएफने गावागावातून स्थानिक लोकांच्या संघटना (पाणी वाटप संस्था) स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या संघटनांनी कोणत्याही स्वरूपाच्या बाह्य मदतीशिवाय स्वयंस्फूर्तीने विकासाचे काम चालू ठेवावे तसेच त्यांच्या कौशल्यगुणांना वाव मिळावा, यासाठी त्यांच्याकरिता प्रशिक्षण व कौशल्यवृद्धी कार्यक्रम राबविले. आज या स्थानिक संस्था स्वबळावर गावपातळीवर यशस्वीपणे कार्यरत आहेत.
 बाएफच्या बहुद्देशीय व बहुआयामी कार्यक्रमाची व्याप्ती आता देशभरातील १६ राज्यांमध्ये वाढली आहे. प्रत्येक राज्यात बाएफची एक सहयोगी संस्था कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टिकोनातून समाज कल्याणकारी कार्यक्रम गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी बाएफचे प्रयत्न असतात. बाएफचे चार हजारहून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जात संघभावनेने ग्रामीण भागात काम करीत आहेत.
 भविष्यात आपल्या कामातील वैविध्य वाढवून त्यात समन्वय साधण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा संस्थेचा मनोदय आहे. तंत्रज्ञान पुरविणारी संस्था म्हणून प्रभावीपणे काम करावे, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या पाणी वाटप संस्था, तरुण मंडळे यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणातील बदलांना तोंड देऊ शकतील अशा पिकांच्या वाणांचे जतन, संवर्धन व प्रचार तसेच सुधारित पशुपालन, मेंढीपालन व लोकांच्या सहभागातून गायरान विकास कार्यक्रमाचे प्रयत्न चालू आहेत. समविचारी व समान कार्यक्रम असलेल्या संस्थांचे जाळे उभारून तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यावर संस्थेचा भर राहील, जेणेकरून संस्थेच्या उपलब्ध वेळेचा व शक्तीचा परिणामकारक उपयोग विकास कार्यक्रमासाठी होईल.
गिरीश सोहनी (पुणे)    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत  : २ एप्रिल
१८८२ > प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक असा नावलौकिक कमावणारे डॉ. पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म. अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी संस्कृत, प्राकृत व आधुनिक देशी भाषा यांचा तौलनिक अभ्यास मांडणारा ‘अ‍ॅन इंट्रोडक्शन टु कम्पॅरेटिव्ह फायलॉलॉजी’ हा ग्रंथ लिहिला. ‘मराठी भाषेचा काल-निर्णय’ आणि ‘अपभ्रंश भाषेतील वाङ्मय’ हे दीर्घ लेख, युरोपचे प्रवासवर्णन तसेच ‘जर्मनीतील लोकशिक्षण’ हे स्वतंत्र पुस्तकही त्यांनी  लिहिले.
१९२६ > ‘त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का’ या गाण्याचे कवी सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म.  ‘सावली’, ‘पान-फूल’, ‘छुमछुम’ (बालकविता) हे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह.
१९८८ > आगरकरांच्या विवेकवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या लेखिका, विदूषी मनू गंगाधर नातू यांचे निधन. विवेकाची गोठी, वेदनेचा वेध हे लेखसंग्रह त्यांचे असून आगरकर वाङ्मयाच्या तीन  खंडांच्या त्या सहसंपादक होत्या.
२००५ > वाङ्मयातील ‘मराठी स्त्री’वर प्रबंध (१९५७) लिहिणारे, पुढे ‘साहित्य संमेलने आणि साहित्यिक प्रश्न’ या ग्रंथासह ६ पुस्तके लिहिणारे समीक्षक दुर्गादास काशीनाथ संत यांचे निधन.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : दातांचे विकार : उपचार
दातांकरिता काही विशेष कार्य केले असे ठामपणे सांगू शकतात, असे आमचे सदाचे मित्र, प्रसिद्ध दंतवैद्य माधवराव शेंडय़े यांना ‘तु. ह.’ म्हणजेच तुत्थ हरितकी किंवा बालहरितकी आम्ही किलोंनी बनवून देत असू. ते फक्त दाताकरिता वापरतात. आम्ही जत्रूध्र्व सर्व विकारांत, सूज कमी करण्याकरिता, मग ती सूज कान, नाक, घसा, डोळा, कसलाही असो, वापरतो. पायरीन, फियरीन’ अ‍ॅलोपॅथी गोळय़ांपेक्षा तुत्थ हरितकी हजारपट बरी. या औषधाचे मूळ बालहरितकी पाठात आहे. गु. वै. भा. वि. गोखले यांनी हा पाठ जामनगरहून प्रचारात आणला. माधवरावांनी तो उचलला व आम्ही तो बनविला. हिरडाचूर्ण व मोरचूद यांचा हा पाठ दातांची सूज, ठणका यावर विलक्षण काम करतो. सूज असेपर्यंतच जपून दोन-दोन गोळय़ा, दोन वेळा दोन दिवसच घ्याव्यात. सूज ओसरल्यावर बंद कराव्यात. यावर उतारा लिंबू सरबत आहे.
दातांच्या आरोग्याकरिता अनेक मंजन बाजारात आहेत. त्यातलेच एक ‘स्वस्तिक दंतमंजन’. दातांच्या स्वास्थ्याकरिता सांगितलेली व सहज मिळणारी गेरू, कापूर, तुरटी, सैंधव, हळद, कात, बाभूळशेंग, त्रिफळा, बाभूळसाल, जांभूळसाल, बकुळसाल, कडुनिंबसाल, खैरसाल अशी औषधे जाणीवपूर्वक या मंजनात वापरली आहेत. गेरू हे प्रधान द्रव्य आहे.  स्वस्तिक हे नाव ठेवण्याचे कारण, परकीय रेड क्रॉस हे नाव घेऊन आपण भारतीयांनी वैद्यकात मिरवण्यापेक्षा ‘स्वस्ति’ कल्याणकारक असे भारतीय संस्कृतीचिन्ह वैद्यकात सर्वत्र असावे अशी माझी धारणा. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्याप्रमाणे हरि परशुराम औषधालयाची औषधे नोंदवताना पहिल्या औषधाला जाणीवपूर्वक ‘स्वस्तिक’ दंतमंजन हे नाव दिले. हे मंजन रोज ब्रशऐवजी बोटाने, सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना वापरावे.
 अनेकांच्या दातांना कीड लागलेली असते, त्यांच्याकरिता वरील घटकद्रव्यांव्यतिरिक्त आघाडाचूर्ण, सुंठ, मिरे, िपपळी व दालचिनीचूर्णयुक्त मयूर दंतमंजन वापरावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : गर्वहरण / घात
मागच्या प्रकरणात उल्लेख केलेले माझे गर्वहरण १९६१ मध्ये झाले. असली गोष्ट एकदम होत नाही. ती शिजत होते. तसेच झालेही; परंतु त्याआधीचे इन्टर्नशिपचे वर्ष मी एका अर्थाने भग्नावस्थेतच घालविले होते. भग्नावस्था अशासाठी की परीक्षेतल्या यशाने मी हुरळलो कारण इतके यश कधी मिळाले नव्हते आणि दुसऱ्या बाजूला मन संपूर्णपणे पुढच्या आयुष्याच्या विचाराला मुकले होते. आणखी एक गोष्ट अशी होती की, माझे परीक्षेतले यश आणि इतर अवांतर गोष्टीतली चमक यामुळे मी एका झोतात वावरत होतो. त्या काळात या तिन्ही गोष्टींची जाणीव नव्हती. नोकरी सुरू होते तेव्हा पहिल्यांदा हाऊसमॅनशिप करावी लागते. त्याच्या वरती सहा डॉक्टर असतात. त्यातला सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक असतो. इतक्या लोकांच्या देखरेखखाली काम कधी केलेच नव्हते आणि असे काम करावे लागणार आहे, याचा विचार आणि पूर्वतयारी नव्हती. त्या काळात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांच्या मल-मूत्र आणि रक्त यांची चाचणी आदल्या संध्याकाळी करण्याची जबाबदारी हाऊसमनवर असे. ते करणे अशक्य तर होतेच, पण अन्यायकारकही होते. कारण असली चाचणी करण्याचा अनुभवच मुळी विद्यार्थ्यांना नसे. अशक्य होते कारण जर ही चाचणी खरेच करायची म्हटले तर जे सात-आठ रुग्ण दाखल होत असत त्यांच्यावर प्रत्येकी अर्धा तास खर्च करावा लागला असता. अर्थात या चाचण्या कोणीच करीत नसे. नाहीतर चार तास यातच गेले असते. रक्त काढायचे; पण न तपासता आकडे लिहावयाचे, अशीच पद्धत रुळली होती. मीही तेच करीत होतो; परंतु एका रुग्णाचे रक्त काढण्याचे विसरलो आणि तरीही अहवाल लिहून मोकळा झालो आणि एक मत्सरी दबा धरून बसलेल्या हितशत्रूला बळी पडलो. त्याने तक्रार केली. रुग्णांची जबानी घेण्यात आली आणि मला घेरण्यात आले.
त्या घेऱ्यातल्या तीन गोष्टी स्पष्ट आठवतात. एक तर मी चूक कबूल केली. हे असेच अनेक वर्षे चालले आहे, असा बचाव मी केला नाही आणि माझा गणवेश (अ‍ॅप्रन) उतरवून मी राजीनामा देतो आहे, असे सांगून मोकळा झालो.
या प्रकरणावर पडदा पडला. चौकशी केली आणि मला आणखी चेचले तर मी या चाचण्यांचा पडदा टरटरून फाडेन, हे स्पष्ट होते. खरे तर माझ्या राजीनाम्याने सगळेच अवाक झाले. मी गयावया करीन, असे त्यांना वाटले असणार, पण तरुणपणी माणूस बेदरकार असतो. तसेच माझे वागणे होते. गणवेश उतरविणे सोपे असते. त्यानंतरचा वनवास सहन करणे अवघड असते; परंतु वनवास आणि अस्थिरता आणि संघर्ष मला नवे नव्हते. लहानपणापासून हेच चालले होते. त्या वनवासाबद्दल पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते –  rlthatte@gmail.com