‘‘Earth has enough for everyone’s needs, but not for everyone’s greed!’’ महात्मा गांधींचे हे अजरामर वाक्य आजच्या जगासाठी अधिकच समयोचित झाले आहे. गरजेपुरती ऊर्जा वापरणे, बेजबाबदार उधळपट्टीच्या जीवनशैलीला आवर घालणे हे आता मानवाच्या जीवनसंघर्षांसाठी अटळ झाले आहे. औद्योगिक क्रांती, कोळसा, तेल, नैसर्गिक वायू यांचा वापर, वीजनिर्मिती आणि तिचा वापर यांसारख्या तंत्रज्ञानातील प्रगतीपासून सुरू झालेला विकासाचा आलेख विसाव्या शतकातील आधुनिकीकरण, जागतिकीकरण अशा लाटांवर स्वार होऊन वाढतच राहिला. ऊर्जेच्या वाढत्या गरजेमुळे जगभरात कोळसा, गॅस, पेट्रोल, डिझेल यांसारखी खनिज इंधने वापरण्याचे प्रमाण अनिर्बंधपणे वाढू लागले. या विकासाच्या घोडदौडीत सूर्य, वारा यांसारख्या नैसर्गिक ऊर्जा मिळवण्याच्या कित्येक शतकांपासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धती मागे पडू लागल्या आणि सगळे जग खनिज इंधनापासून मिळालेल्या ऊर्जेलाच पारंपरिक ऊर्जा म्हणू लागले! विकासाच्या या आधुनिक संकल्पनेच्या जोरापुढे मानवी उपस्थिती, पर्यावरण संतुलन, सामाजिक न्याय या गोष्टी दुर्लक्षित राहिल्या.

खनिज इंधनाच्या ज्वलनाने वातावरणात प्रदूषणकारक वायू सोडले जातात. यांच्यामुळे हवेचे तापमान वाढू लागते. विसाव्या शतकाच्या आधी आठशे वर्षे या वायूंचे प्रमाण २८० पीपीएम (पार्टिकल्स पर मिलियन- कण प्रति दशलक्ष कणांत) इतके स्थिर होते. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून या वायूंचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आणि ते प्रमाण ३८० पीपीएमपर्यंत गेले. अनेक शास्त्रज्ञांच्या मते, हे प्रमाण ४०० पीपीएमपलीकडे गेले, तर त्यामुळे हवामानात निर्माण होणारी अस्थिरता कल्पनेपल्याडची धोकादायक असू शकते.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चिमात्य जगाला यामुळे जाग येऊ लागली. खनिज इंधनाच्या ज्वलनाने हवामानात झालेला विपरीत बदल, या इंधनाच्या वाढत्या किमती, घटत चाललेला साठा या गोष्टींची जाणीव होऊन जगभरातल्या विचारवंतांच्या, शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागला. नुसता विकास नाही, तर ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना उदयास आली. खनिज इंधनाच्या वापराविरुद्ध, सौरऊर्जेसारख्या नैसर्गिक ऊर्जा स्रोतांच्या वापरासाठी, हवेच्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जगभरातील विविध व्यासपीठांवरून चळवळी सुरू झाल्या. संयुक्त राष्ट्रांनीही याची दखल घेतली आणि विकासाच्या खनिज इंधनावर आधारित अमर्याद वेगाला, पर्यावरणीय संतुलनाचा लगाम घालण्यास सुरुवात झाली.