स्पेनमधील तिसरे मोठे शहर बार्सलिोनाचे भौगोलिक स्थान आणि आसपासचा परिसरही वैशिष्टय़पूर्ण आहे. एका बाजूला भूमध्य समुद्र, दुसरीकडे उंच पहाडाची खडी भिंत आणि उत्तरेस असलेल्या डोंगराचे उंचच उंच सुळके यामुळे नसíगकरीत्या संरक्षित असे वसलेले हे बार्सलिोना शहर. बार्सलिोना शहराच्या स्थापनेविषयी एक दंतकथा आजही स्पेनमध्ये सांगितली जाते. हक्र्युलिस हे शक्तीचे ग्रीक दैवत भूमध्य सागरातून आपल्या खलाशांसह नऊ जहाजांमधून जात होते. वादळातून जाताना शेवटचे नववे जहाज एका खडकापाशी फुटले. त्या खडकाजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर वाचलेले सर्व प्रवासी हक्र्युलिसला भेटले. त्या ठिकाणच्या सुंदर परिसराने त्यांना इतके मोहात टाकले की ते सर्व जण त्या प्रदेशातच स्थायिक झाले. त्या प्रदेशाचे आणि वस्तीचे नाव त्यांनी ठेवले ‘बार्सा नोना’. ग्रीक भाषेत याचा अर्थ होतो नववे जहाज! इ.स.पूर्व पहिल्या शतकात रोमन लोक इथे आले. पाचव्या शतकापर्यंत रोमन साम्राज्यात असलेल्या या वस्तीला बार्सनिो हे नाव होते. गेल्या दोन हजार वर्षांत अनेक वेळा आक्रमणे आणि सत्तांतरे अनुभवलेल्या बार्सलिोनावर पाचव्या शतकात व्हिसगॉथ या जमातीचे राज्य होते. बार्सलिोना तेव्हा स्पेनची राजधानी होती. आठव्या शतकात इथे अरबांचे राज्य होते तर नवव्या शतकात फ्रेंच राजा लुई द पायसने बार्सलिोना घेतले. १३ व्या आणि १४ व्या शतकात येथे कॅटालोनिया आणि अरेगान या राज्यांची राजधानी होती. अठराव्या शतकाच्या अखेरीस बार्सलिोनाच्या परिसरात लिग्नाइट या इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या खनिजाचे साठे सापडल्यामुळे बार्सलिोनाच्या बंदराचे महत्त्व वाढले आणि त्याच काळात शहरात औद्योगिकीकरण वाढले. १९३६ साली स्पेनमध्ये बंडखोरी आणि यादवी युद्धामुळे अराजक माजले. १९३८ साली बार्सलिोनावर तीन दिवस बॉम्बहल्ले चालू होते. या तीन दिवसांत १ हजार लोक मारले गेले. १९३९ मध्ये बार्सलिोना हे हुकूमशहा फ्रँकोच्या बंडखोर गटाच्या हातात पडले. १९७५ साली फ्रँकोच्या मृत्यूनंतर स्पेनमध्ये संविधानिक राजेशाही स्थापन झाली.

सुनीत पोतनीस 

sunitpotnis@rediffmail.com

 

मँजियम

वृक्षशेतीसाठी ज्या निवडक वृक्षाची शिफारस केली जाते, त्यापकी एक म्हणजे मँजियम. लेग्यूम कुलामधील हा वृक्ष   Acacia mangium या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. हा ऑस्ट्रेलियन निवासी आता भारतात चांगलाच रुळला आहे. हा वृक्ष साधारण ३० मीटपर्यंत सरळ उंच वाढतो. त्याच्या वरच्या अर्धा भागावरील छत्रीच्या आकाराचा डेरेदारपणा अतिशय देखणा असतो. खालच्या फांद्या काटकोनात, मधल्या फांद्या तिरकस आणि वरच्या सरळ उंच वाढतात. त्यावरील हरितसंभारामुळे वृक्षसौंदर्यात वेगळीच भर पडते. याची फिकट तांबूस रंगाची फुले गुच्छामध्ये येतात. शेंगाचा आकार चक्राकार असतो. या वृक्षाची निर्मिती बियांपासून होते. बी रुजली की नवीन आलेली पाने देठाच्या टोकापासून गळून पडतात, त्यामुळे देठांचेच पानांमध्ये रूपांतर होते. यास ‘फायलोड’ असे म्हणतात. थोडक्यात, मँजियम वृक्षाची दिसणारी पाने मुळात पाने नसून देठाचे पानामध्ये झालेले रूपांतर आहे. मँजियमची वाढ खूप वेगाने होते. पहिल्या आठ वर्षांत तो २० ते २२ मीटपर्यंत वाढतो, म्हणूनच तो साग या वृक्षाला पर्याय समजला जातो. वृक्ष जवळजवळ लावल्यास सरळसोट वाढतात. हा वृक्ष जमिनीमध्ये मोठय़ा प्रमाणात नत्राचे स्थिरीकरण करतो. आद्र्रता आणि पाऊस यांना सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या या वृक्षाची कोकण आणि कोल्हापूर भागात अनेक शेतकरी शेती करतात. या वृक्षाचे लाकूड सागापेक्षा गुणवत्तेत थोडे हलके पण टिकाऊ असते, म्हणूनच याचा उपयोग शेतीची अवजारे, हलके फíनचर, काडेपेटी, फळ्या, हलक्या वजनाच्या क्रिकेटच्या बॅट, लाकडी खेळणी आणि कागदनिर्मितीत होतो. या वृक्षाच्या लगद्यापासून तयार केलेल्या जाड कागदी पिशव्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय आहे. आंब्याच्या मोसमामध्ये आंबे ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेटय़ा तयार करण्यासाठी पश्चिम घाटातील अनेक वृक्ष प्रतिवर्षी धारातीर्थी पडतात यावर मँजियम उत्तम पर्याय आहे.

आम्लधर्मी, नापीक जमिनीमध्ये हा वृक्ष जोमाने वाढतो. जमिनीमध्ये नत्र साठवण्याबरोबरच हा वृक्ष हवेमधील कर्बवायू वेगाने शोषण करून लाकडामध्ये कार्बन ठेव म्हणून राखून ठेवतो, म्हणूनच डोळ्यांना सुखावह वाटणारा आणि सावली देणाऱ्या या विदेशी पाहुण्यास वृक्षशेतीबरोबरच शहरातील वृक्षारोपणामध्ये सन्मानाचे स्थान मिळणे गरजेचे आहे.

 

डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org