News Flash

बेडे ग्रिफिथ

शिक्षण पूर्ण झाल्यावर अ‍ॅलन आणि त्यांच्या दोन मित्रांनी एक अभिनव प्रयोग केला.

बेडे ग्रिफिथ हे जन्माने ब्रिटिश असलेले बेनेडिक्टीन रोमन कॅथलिक ख्रिश्चन पंथाचे तपस्वी आणि धर्मप्रचारक पुढे दक्षिण भारतात येऊन ख्रिश्चन आश्रम चळवळीचे एक महत्त्वाचे भाग बनले. पुढे दयानंद या नावाने ओळखले जाणारे बेडे ग्रिफिथ एक महान विचारवंत, तत्त्वज्ञ, मठाधिपती आणि योगी होते. हिंदू धर्मग्रंथ आणि परंपरांचा अभ्यास करून स्वामी दयानंद यांनी हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीयांमध्ये समन्वय साधण्याचे महान काम केले.

इंग्लंडच्या सरे या परगण्यातील वॉल्टन या गावी १९०६ मध्ये जन्मलेल्या बेडे ग्रिफिथ यांचे मूळ नाव आहे अ‍ॅलन रिचर्ड ग्रिफिथ. अ‍ॅलनच्या लहानपणी वडिलांना धंद्यात मोठे अपयश आल्यामुळे त्यांच्या आईनेच किरकोळ कामे करून मुलांचे पालनपोषण केले. आईने अ‍ॅलनला ख्राइस्ट हॉस्पिटल स्कूल या अत्यंत गरीब मुलांसाठी असलेल्या शाळेत दाखल केले. इतर शाळांमधली मुले या शाळेतल्या मुलांना ‘ब्ल्यू कोट बॉइज’ या नावाने हिणवत असत. इंग्रजी साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची उपजत आवड आणि हुशारी यांच्या पाठबळावर अ‍ॅलनने ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवली. पुढे अ‍ॅलन ऑक्सफर्ड विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ऑक्सफर्डचे सी.जे. लुईस या मार्गदर्शकामुळे अ‍ॅलनची तात्त्विक बैठक मजबूत झाली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर अ‍ॅलन आणि त्यांच्या दोन मित्रांनी एक अभिनव प्रयोग केला. शहराच्या बाहेर एक अगदी साधे झोपडीवजा बठे घर भाडय़ाने घेऊन निसर्गाशी निगडित, साधी भारतीय आश्रम पद्धतीची जीवनशैली स्वीकारून ते तिथे सामूहिक जीवन पद्धतीने राहू लागले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी गाई पाळल्या आणि त्यांचे दूध विकून उपजीविका करू लागले. बायबल आणि इतर धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करताना त्या तिघांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे प्रेषित आणि संतांच्या शिकवणीत आणि नैसर्गिक घटना यांमध्ये एक प्रकारचा गूढ समन्वय आहे! अशा पद्धतीने हे तीन मित्र केवळ एक वर्षभर राहिले, पण अ‍ॅलनच्या मनावर त्या काळातल्या तत्त्वचिंतन आणि आश्रमीय राहणीचा खोल ठसा उमटला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:37 am

Web Title: bede griffiths
Next Stories
1 कुतूहल : बहुरंगी क्रोमिअम
2 जे आले ते रमले.. : एडिथ ब्राऊन
3 कुतूहल  : क्रोमिअम : रंगांची दुनिया
Just Now!
X